24 C
Panjim
Monday, September 28, 2020

भारतातील वृक्षविशेष

  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

उपयुक्तता, सौंदर्य आणि पर्यावरणाचे संवर्धन ही त्रिगुणात्मक शक्ती झाडामध्ये आहेच; शिवाय ते सृजनात्मकतेचे प्रतीकही आहे. आपल्या दररोजच्या जीवनशैलीत आणि सांस्कृतिक संचिताच्या चलन-वलनात वडा-पिंपळाला जी प्रतिष्ठा आहे ती अन्य कोणत्याही वृक्षांना नाही.

डॉ. अनिल अवचट हे सामाजिक जाणिवेने लेखन करणारे उत्तम लेखक आहेत, तसेच ते उत्कृष्ट चित्रकार आहेत. काहीकाळ ते फक्त झाडांचीच चित्रे काढत होते. ‘झाडं’ या ललित निबंधात त्यांनी ‘झाडं नसती तर हे जग कसं दिसलं असतं याची कल्पनाही करवत नाही’ असे म्हटले आहे. इथे त्यांचे सौंदर्यसाक्षी अन् संवेदनशील मन प्रकट झाले आहे. पण त्याचबरोबर आपल्या मनात असाही प्रश्‍न उपस्थित होतो की झाडं नसती तर आपण कसे जगलो असतो?
वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे आकार पाहून त्यांना अनेक कल्पना सुचतात. त्यांनी म्हटले आहे, ‘‘प्रत्येक झाडाच्या पानांचा घुमट वेगवेगळा असतो. आंब्याच्या घुमटाला उभ्या लांबट पानांमुळे वेगळे टेक्श्‍चर असते, तर वडापिंपळाचे आणखीच वेगळे. पानांच्या आकारांमध्ये डार्क रंगाच्या सावल्या असतात, त्यांच्याकडे कितीही वेळ पाहिलं तरी समाधान होत नाही. या गर्द हिरव्या गुहा- अगदी न संपणार्‍या आहेत असं वाटू लागतं. घुमटही सलग एक नसतो.’’
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा वस्तुजाताकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा. तो ज्याने त्याने आपल्या मनःपिंडानुसार, संवेदनशीलतेनुसार घडविलेला. पु. ल. देशपांडे एके ठिकाणी काय म्हणतात बघा ः
‘‘वृक्षसेवा म्हणजेच समाजसेवा आहे. वृक्षसंस्कृतीऐवजी आज यंत्रसंस्कृती वाढू लागल्यामुळे आता आपली भाषासुद्धा बदलेल.’’
आजकाल आपण झाडवाटा डोळ्यांआड केल्यामुळे कोणता अनर्थ संभवेल याविषयीचे भाकित पु.लं.नी अचूकपणे केले आहे. ‘महाजनेन येन गतः स पंथः|’ ही उक्ती लक्षात घेऊन आपल्याला भारतीय वृक्षविशेषांचे अवलोकन करायचे आहे.

झाड ही संकल्पनाच मनाला आल्हाद देणारी आहे. प्रत्यक्षातील झाड तर पाठ टेकायला आधार, सावली देणारे आहे. फलधारी असेल तर फळ देणारे आहे. भारतीय वनश्री ही वृक्षांनी गजबजलेली सृष्टी आहे. उपयुक्तता, सौंदर्य आणि पर्यावरणाचे संवर्धन ही त्रिगुणात्मक शक्ती झाडामध्ये आहेच; शिवाय ते सृजनात्मकतेचे प्रतीकही आहे. आपल्या दररोजच्या जीवनशैलीत आणि सांस्कृतिक संचिताच्या चलन-वलनात वडा-पिंपळाला जी प्रतिष्ठा आहे ती कोणत्याही वृक्षांना नाही. पारंब्या पसरून विस्तारलेला वटवृक्ष हा एकत्र कुटुंबातला वडीलधारा, परिणतप्रज्ञ आणि वत्सल आजोबाप्रमाणे असतो. संस्कृतिचिंतनात हमखास त्याचा उल्लेख निरंतर वर्धिष्णू स्वरूप असलेला महावृक्ष म्हणूनच येतो. त्याचे प्रतीक अनेक ठिकाणी योजले जाते.

प्रतिभावंतांना वेळोवेळी त्यातून अन्वर्थक संज्ञा सुचतात. सळसळणारा भव्य पिंपळवृक्ष असाच आनंददायी. चिंतनशीलतेला आणि प्रतिभेला त्याच्या दर्शनाने नवे नवे धुमारे फुटतात. त्याचा पिळदार बुंधा सुंदर, शाखा-उपशाखा सुंदर, टोकदार पाने त्याहून सुंदर आणि त्याच्या बहराच्या वेळची पोपटी लालस पालवी? तिचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? मंगेश पाडगावकर जेव्हा ः
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्‍व तरावे
असे म्हणतात तेव्हा ते अपार्थिवतेच्या लेण्याचे वर्णन वाटते. पिंपळाला ‘अश्‍वत्थवृक्ष’ का म्हणतात याचे रहस्य उमगते.

वड-पिंपळवृक्षाचे जिथे अस्तित्व असते त्या वातावरणाला भारदस्तपणा येतो तो त्यांच्या शाखाविस्तारामुळे. मग तो वनप्रदेश असो अथवा गावाच्या सीमेलगतचा प्रदेश असो. वटवृक्षाची फळे लालबुंद आणि आकर्षक दिसतात. त्यांचा आधार घेणारे कित्येक प्रकारचे पक्षी, पाकोळ्या, वटवाघुळे, खारी आणि काही कीटक यांना ही फळे फार आवडतात. या फळांच्या बिया कुठेही पडतात. रुजतात. त्यांची वाढ झपाट्याने होते. ही झाडे दुसर्‍या झाडाचा आधार घेतात, पण त्या झाडापासून अन्न घेत नाहीत; आपल्या मुळांवाटे ती जमिनीतून अन् वातावरणातून अन्न शोषून घेतात.

वडाच्या खोडाच्या लाकडाचा काही उपयोग होत नाही, पण त्याच्या मजबूत असलेल्या पारंब्या तंबूच्या खांब-पट्‌ट्या करण्यासाठी उपयुक्त असतात. सालीपासून आणि कोवळ्या पारंब्यापासून दोर बनवतात. पानांच्या पत्रावळी बनवल्या जातात. झाडाच्या अनेक भागांचा औषधासाठी वापर केला जातो.

पिंपळवृक्ष हा मूळचा हिमालयाच्या पायथ्यालगतच्या प्रदेशातला. पण आता तो भारतात सर्वत्र आढळतो. हे झाड भरभर वाढते. त्याचा विस्तार आणि उंची अवर्णनीय. हा पानझडी वृक्ष आहे. वडाच्या फांद्यांना पारंब्या फुटतात, तर पिंपळाच्या खोडापासून मुळे निघतात आणि खोडाला आधार देणारे जणू खांब असावेत अशी दिसतात. पिंपळाविषयी अगणित लोककथा आहेत. त्यातून मिथ्यकथांचा महाकोश होईल. संस्कृतीशी निगडित असलेल्या आणि साहित्यात अनेकदा संदर्भ येणार्‍या पिंपळाच्या पानाची टोके खूप लांब आणि निमुळती असतात. त्यामुळे पावसाचे पाणी खाली गळून पडते आणि पाऊस पडून गेल्यावर झाड लवकर कोरडे होते. याची पाने मार्च-एप्रिलमध्ये गळतात. काही ठिकाणी ती शरद ऋतूत गळतात. नवी पालवी सुरुवातीला गुलाबी कांती धारण करते. नंतर लाल होते. पाने जसजशी मोठी होऊ लागतात, मग ती हिरवी होतात. पाऊस पडत असताना अबदागिरीसारखी दिसणारी थरथरती पाने एकटक पाहणे आणि त्यांतील स्पंदने अनुभवणे ही एक आनंदानुभूती आहे. ती शब्दातीत आहे.

पिंपळाची सुकलेली जाळीदार पाने अतिशय आकर्षक दिसतात. त्यांच्यावर चित्रेही काढली जातात. पुस्तकात ठेवलेली पिंपळपाने सुकल्यावर जाळीदार होत जातात. गतकाळाच्या आठवणीही त्यांच्यासमवेत असतात.

पिंपळवृक्षाचे लाकूड पाण्यातही चंगले टिकते म्हणून नौका बनविण्यासाठी त्याचा उपयोग करतात. या झाडाच्या प्रत्येक भागाचा औषधासाठी उपयोग होतो. त्याच्या सालीपासून लाल रंग तयार करतात. त्याची पाने उंटाला अन् हत्तीला खायला घालतात. या झाडावर लाखेचे किडे घर करून राहतात.

आम्रवृक्षाला आपल्या दैनंदिन आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. आंबा हा सर्वांनाच प्रिय. अमृतमधुर फळ म्हणूनच ते ओळखले जाते. सहस्रावधी वर्षे लोटली. हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आंब्याची झाडे आढळतात. हे झाड दणकट आणि सदाहरित असते. ते भरभर वाढते. जंगलात आपोआप उगवणारे आंब्याचे झाड अवाढव्य असते. लांबच्या लांब शेतीच्या प्रदेशातील आंब्याचे छत्रीसारखे भासणारे झाड लक्ष वेधून घेते. कुणीतरी विश्रांतीस्तव त्याच्या सावलीत बसलेला असतो. या झाडाचे खोड काळेभोर दिसते. पाने जाड, मऊ, लांबट आणि टोकदार असतात. फांद्यांच्या टोकाला डहाळीवर पानांचे गुच्छ येतात. या पानांच्या जीवनरसाचा उग्र वास येतो. वसंत ऋतूतला आम्रमोहोर हा अत्यंत देखणा. पिवळसर रंगाची मैफल हिरव्यागार पानांच्या संभारात तिथे सजलेली असते. कोकिळ पक्ष्याचा नादनिनाद त्या साथसंगतीला असतो.

आंब्याच्या मोहोराच्या वासाने बरेच पक्षी, कीटक आणि वटपाघळे त्याकडे आकर्षिली जातात. मोहोर खूप दाट असला तरी फारच थोड्या फुलांचे परागीकरण होऊन फलधारणा होते. आंब्याच्या अनेकविध जाती आहेत. कलमी आंब्याची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे. कोकणची भूमी आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

आंबा पिकतो, रस गळतो| कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो॥
हे लहान मुलींमध्ये प्रिय असलेले गीत लोकपरंपरेत रुजलेले आहे ते या आम्रप्रेमामुळेच. गोमंतभूमी आणि कारवार येथेही आंबा लोकप्रिय आहे. हिंदू धर्मीयांमध्ये शुभप्रसंगी आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधले जाते. डेरेदार आम्रवृक्ष हे उत्तम प्रकारचे निसर्गशिल्प आहे. प्रा. गो. वि. (विंदा) करंदीकर यांचा ‘आम्रयोग’ वाचताना आंब्याच्या आस्वादाचा, पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. हरवलेले बालपण पुन्हा गवसते.

कडुनिंबाच्या झाडाला भारतात किती महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. हे झाड मूळचे भारतातीलच आहे. पण आता श्रीलंका आणि मलेशिया या देशांतही ते आढळते. या झाडाला वर्षभर नवी पालवी फुटत राहते. पण जुन्या पानांच्या जागी नवी पाने येण्याचे प्रमाण वसंत ऋतूत अधिक असते. या झाडाच्या खोडाला खूप उंचावर फांद्या फुटतात. उत्तर भारतात कडुनिंबाची झाडे चांगली जोमाने वाढतात आणि दणकट असतात. ‘घटप्रभा आरोग्यधामा’च्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुतर्फा कडुनिंबाची लागवड करण्यात आली आहे. वातावरण विशुद्ध ठेवायला कडुनिंब किती उपयुक्त आहे हे तर सर्वश्रुतच आहे. या झाडाचे औषधी उपयोग बहुविध स्वरूपाचे आहेत.
बौद्धिक ज्ञानसंपदेच्या हक्काविषयी भारतात जागृती निर्माण करीत असताना तसेच जागतिक स्तरावर भारताची बाजू खंबीरपणे मांडत असताना सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हळद, बासमती तांदूळ आणि कडुनिंबाच्या भारतीय स्वामित्वासाठी खंबीरपणे लढत दिली. ती संपूर्णतः संशोधनाधिष्ठित होती.

दात घासण्यासाठी टूथब्रश आणि टूथपेस्ट यांच्याऐवजी कडुनिंबाच्या काटक्यांचा दातण म्हणून काही ठिकाणी वापर करतात. सांस्कृतिक जीवनातही कडुनिंबाचे महत्त्व आहेच. गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोड खाण्यापूर्वी कडुनिंबाचे सेवन केले जाते ते त्याचे औषधी गुण लक्षात घेऊनच. या झाडाच्या फळांना निंबोण्या म्हणतात. पक्ष्यांना आणि गांधिलमाश्यांसारख्या कीटकांना त्यांच्यातील गोड रस खूप आवडतो.

बाभूळ हे झाड भारतात आणि आफ्रिकेतील काही प्रदेशांत आढळते. ते खूप दणकट असते. त्याला अगदी थोडा ओलावादेखील पुरतो. या झाडाच्या आकारात विविधता आढळते. कुठे ते लहानसे आणि पसरट असते, तर कुठे त्याचा मोठा वृक्ष झालेला असतो.

ते सदाहरित असते. त्याची वाढ हळूहळू होते. या झाडाच्या खालच्या भागावर भयंकर तीक्ष्ण काटे असतात. खेड्यातील लोकांना या झाडाच्या सर्व भागांचा अतिशय उपयोग होतो. त्याच्या फांद्या आणि पाने तोडून गाईगुरांना आणि शेळ्यामेंढ्यांना खायला देतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनविण्यासाठी आणि सरपणासाठी तसेच कोळसा तयार करण्यासाठी होतो. खोडापासून डिंक मिळतो. त्यापासून गोंद तयार केला जातो. दातण म्हणूनही याच्या काटक्या वापरतात. या झाडापासून लाख मिळते.
* संदर्भ ः प्रमुख भारतीय वृक्ष ः पिप्पा मुखर्जी, विश्‍व प्रकृति निधि- भारत (डब्ल्यूडब्ल्यूएफ)

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...