भारताचे सौदी अरेबियासोबत अनेक करार

0
33

>> सौदीचे क्राऊन प्रिन्स भारत दौऱ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोजी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. जी-20 परिषद संपल्यानंतर मोहम्मद बिन सलमान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या द्विपक्षीय बैठकीमध्ये व्यापार आणि सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही नेत्यांनी भारत आणि सौदी अरेबियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काऊन्सिलच्या पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील केल्या. याशिवाय सामंजस्य करारावर देखील स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. द्विपक्षीय बैठकीदरम्यान राजनैतिक, संरक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधीपेक्षा आता भारत आणि सौदी अरेबियाचे संबध आणखी चांगले होतील. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांनी एकत्रित या बैठकीविषयी माहिती दिली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढण्यासाठी आम्ही अनेक योजनांविषयी चर्चा केली.