भारतकुमार

0
9

चित्रपट हे समाजाच्या ह्रदयाला थेट हात घालणारे माध्यम आहे. त्यातून अनेक विषय हे प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवता येऊ शकतात हे आजवर दिसून आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ ह्या चित्रपटाचे उदाहरण तर ताजेच आहे. ह्या अशा प्रभावी माध्यमाचा वापर देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न करणारा एक कलावंत काल काळाच्या पडद्याआड गेला. आजच्या पिढीला त्यांचे कर्तृत्व ठाऊक नसणे स्वाभाविक आहे, परंतु एकेकाळी जनसामान्यांवर देशभक्तीचे गारूड पसरवणारे मनोजकुमार काल आपल्यातून निघून गेले. लादेनला अमेरिकेने ज्या गावी कंठस्नान घातले, त्या गावी म्हणजे आजच्या पाकिस्तानातील अबोटाबादेत जन्मलेला हरीकिशनगिरी गोस्वामी नावाचा दहा वर्षांचा मुलगा फाळणीचे घाव सोसत आपल्या कुटुंबासमवेत भारतात आला. त्यावेळच्या हिंसाचारात त्याचा छोटा भाऊदेखील मारला गेला. परंतु फाळणीनंतर भारतात आलेल्या अनेक कुटुंबांनी जसे पुनश्च हरिओम्‌‍ म्हणत शून्यातून विश्व उभे केले, तसेच विश्व ह्या मुलाने पुढील काळात उभे करून दाखवले. त्याने मार्ग पत्करला तो चंदेरी दुनियेचा. आपला लाडका अभिनेता दिलीपकुमार यांच्या 1949 साली प्रदर्शित झालेल्या ‘शबनम’ ह्या चित्रपटातील व्यक्तिरेखेवरून प्रभावित होऊन त्यांनी ‘मनोजकुमार’ हे नाव घेतले आणि त्याच नावाने 1957 साली ‘फॅशन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तो चित्रपट आणि त्यांची ती भूमिका कोणाच्या फारशी लक्षात राहिली नाही, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू आपला अभिनय, दिग्दर्शन आणि त्याहून अधिक आपण हाताळत असलेल्या माध्यमातून घडवलेले प्रखर देशभक्तीचे दर्शन यामुळे मनोजकुमार हे नाव पुढे घरोघरी पोहोचले. इतके की, पुढे ‘मनोजकुमार’ यांची ओळख ‘भारतकुमार’ अशीच होऊन बसली. मनोजकुमार अभिनीत आणि दिग्दर्शित ‘शहीद’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’ ह्या सगळ्या चित्रपटांमधून केवळ देशभक्तीचा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलेला दिसतो. ‘शहीद’ मधून त्यांनी भगतसिंगची कहाणी सांगितली. ‘शहीद’ मधील मुख्य भूमिका त्यांनी स्वतः केली होती. त्या चित्रपटाला तेराव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कारही लाभला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या ‘जय जवान, जय किसान’ घोषणेने प्रेरित होऊन त्यांनी ‘उपकार’ मधून निःस्वार्थ शेतकरी आणि सैनिकाची कथा मांडली. ‘मेरे देश की धरती’ हे गाजलेले गाणे त्याच चित्रपटातले. ‘पूरब और पश्चिम’ मध्ये पाश्चात्य संस्कृतीत राहूनही भारतीयत्व जपणाऱ्यांविषयी सांगितले. ‘भारत का रहनेवाला हूँ’ हे गाणे ऐकू आले की हा चित्रपट आठवतो. इंदिरा गांधींनी 67 च्या निवडणुकीत ‘गरीबी हटाव’ ची घोषणा दिली, तिला अनुसरून त्यांनी ‘रोटी कपडा और मकान’ 74 साली काढला. ‘क्रांती’ मधून ब्रिटीशांविरुद्धचा भारतीयांचा संघर्ष चित्रित केला. ह्या चित्रपटांच्या कथानकांचीच नव्हे, तर त्यामधल्या गाण्यांची मोहिनी आजही आपल्यावर आहे. दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ती गाणी ऐकू येतातच. ‘मेरे देश की धरती’, ‘है प्रीत जहाकी रीत सदा..’, ‘ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम’ अशी देशभक्तीगीते लागली की मनोजकुमार हमखास आठवतात. ‘रंग दे बसंती चोला’ किंवा ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है’ ही गीते देखील मूळची मनोजकुमार यांच्याच चित्रपटांतली. देशभक्तीच्या रंगात असा अंतर्बाह्य रंगून गेलेला हा कलावंत होता. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘पत्थर के सनम’, ‘नीलकमल’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शितही केले. ‘गुमनाम’ सारख्या चित्रपटाने त्या काळात अडीच कोटींची कमाई केली होती. ‘शोर’ नावाचा एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट त्यांनी केला होता, तो त्यांचा स्वतःचा आवडता चित्रपट होता. मुलगा कुणाल गोस्वामीचा ‘जयहिंद’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट. चित्रपटसृष्टीत उमेदवारी करताना त्यांनी इतरांच्या नावाने कथा पटकथालेखन करावे लागले होते. मात्र, पुढील काळात त्यांनी स्वतःच्या नावाने चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला. ‘क्रांती’ नंतर त्यांच्या कारकिर्दीला ओहटी लागली. आपण समकालीन इतर कलाकारांच्या तुलनेत मोजकेच चित्रपट केले हे ते अभिमानाने सांगायचे. धर्मेंद्र, शशी कपूर यांच्या नावावर तीनशे चित्रपट लागले, परंतु आपल्या नावावर केवळ पस्तीस चित्रपट आहेत असे सांगणाऱ्या मनोजकुमारना त्याचा विशाद नव्हता, अभिमानच होता. परंतु मोजके चित्रपट जरी त्यांच्या नावे असले, तरी देशभक्तीने भारलेल्या कथानकांनी आणि गाण्यांनी सजलेले त्यांचे चित्रपट ह्या ‘भारतकुमारा’चे विस्मरण नक्कीच होऊ देणार नाहीत.