भाजप चाळीसही मतदारसंघात लढणार

0
11

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

भाजपने सर्व ४० मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बाणावली मतदारसंघातून सुद्धा निवडणूक लढविली जाणार आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्‍चित करून भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. काही मतदारसंघात एकच, तर काही मतदारसंघात दोन दावेदार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

भाजप गोवा प्रदेश निवडणूक समितीने संभाव्य उमेदवारांची नावे केंद्रीय समितीला सादर केली आहेत. भाजपच्या गाभा समितीची मंगळवारच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली, असेही तानावडे यांनी सांगितले.

कुंभारजुवेतून आमदार पांडुरंग मडकईकर आणि सिध्देश नाईक यांची नावे पाठविण्यात आली आहे. केंद्रीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत शक्य होती, तेवढ्या उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. १२ मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांची नावे आहेत, अशी माहिती समितीचे सदस्य तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.

भाजपमध्ये उमेदवारीवरून काही मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक मतदारसंघात एकापेक्षा जास्त दावेदार आहेत. भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बंडखोरी करणार्‍या कार्यकर्त्यांना भाजप संघटनेसोबत राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. सदानंद शेट तानावडे,
प्रदेशाध्यक्ष, भाजप.

आज उमेदवारांची निश्‍चिती
नवी दिल्ली येथे बुधवार दि. १९ जानेवारीला होणार्‍या भाजप केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्‍चित केली जाणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, संघटन मंत्री सतीश धोंड, भाजप गोवा प्रभारी सी.टी. रवी उपस्थित राहणार आहेत.