भाऊसाहेबांमुळेच गोव्याचे भाग्य उजळले!

0
31

>> आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे गौरवोद्गार

>> शिक्षा व्हिजनतर्फे मुळगावात बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रम

गोवा मुक्त झाल्यानंतर या राज्याची घडी बसवताना भाऊसाहेब बांदोडकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, कृषी या क्षेत्रांमध्ये चौफेर विकास केला. त्यांनी त्याकाळी निर्माण केलेल्या साधनसुविधा व इतर सोयींमुळे गोव्याला मुक्तीनंतर आपल्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली. आणि त्यामुळेच भाऊसाहेबांमुळे खऱ्या अर्थाने गोव्याचे भाग्य उजळले, असे गौरवोद्गार डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी काढले.
शिक्षा व्हिजनतर्फे मुळगाव येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाऊसाहेब बांदोडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, माजी नगरसेवक नारायण बेतकीकर, तुळशीदास परब, दिलीप धारगळकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शेट्ये म्हणाले की, पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेबांनी गोव्याचे समर्थपणे नेतृत्व केले. भाऊसाहेबांनी सर्वप्रथम ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित केले. गावागावांत शाळा सुरू केल्या. त्यामुळे आज गोवा राज्य शैक्षणिक क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. औद्योगिक क्रांतीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाऊसाहेबांचा वारसा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकास त्यावेळी चांगला झाला. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून बाहेर पडलेल्या गोव्यात साधनसुविधा निर्माण करताना गोव्याच्या जडणघडणीला एक दिशा भाऊसाहेबांनी दिली, असे सरपंच तृप्ती गाड यांनी म्हटले. सुरुवातीला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.