26 C
Panjim
Monday, January 18, 2021

भांडी, भांडी अन् भांडी

  • मीना समुद्र

एरव्ही भांड्याला भांडं लागणं याचा अर्थ भांडण होणं असा आपण गृहित धरतो. स्टीलच्या भांड्याला विंचवानं नांगी मारली तर भोक पडतं. एरव्ही भांडी झिजतात, गंजतात, चेपतात, त्यांना पडून पोेचे येतात. पण प्रत्येक भांड्याचे काम ठरलेले.

‘‘आपल्याकडचं लॉकडाऊन संपलं पण आमचं ‘लकडाऊन’ काही संपलं नाही.’’ मैत्रीण तणतणली.
‘‘काय म्हणालीस? परत एकदा बोल,’’ मी म्हटलं.
तिनं वाक्य पुनः उच्चारलं, ‘‘आमचं लक डाऊन झालं ते काही वर उठलं नाही.’’ आता माझी बत्ती थोडीशी पेटली तरी तीही फकफकतच. ‘‘म्हणजे गं? कशाच्या बाबतीत म्हणतेस? कोरोना तर चालला पळून, मग कुठं अडलं तुझं लक? आणि एरव्ही- सकारात्मक विचार करावा म्हणून तूच सगळ्यांना सांगतेस ना? मग एवढी निराशा कशासाठी? महामारीच्या इतक्या लांबलचक काळात धीरानं घेतलं, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नाना उपाय केलेस, त्यामुळे तर सहीसलामत राहिलो ना?’’ मी म्हटलं, ‘‘अगं, ते नाही म्हणत मी. स्वयंपाकाचा किंवा आणखी काही नवीन पदार्थ खाऊन बघण्याचा नाही मला बाऊ वाटत; पण भांड्यांचा हा एवढा ढीग पडतो ना त्यानं जीव अगदी मेटाकुटीला आलाय. घरचे केर-वारे, धू-पूस, आवराआवर, स्वयंपाकपाणी, मग भांडी करता करता नाकी नऊ येतात. कमरेचा काटा ढिला व्हायची वेळ आली. पाठीत उसण भरली.

एकामागोमाग एक तीन लॉकडाऊन होऊन उठले तरी कामवाली जी गावाला जाऊन बसली ती परत यायचं नाव नाही. सुरुवातीला अगदी राजीखुशीनं आणि दूर राहिली तरी तिच्या कष्टाची किंमत कळल्यानंही पगार दिले; तरी काय वांधा आहे कळत नाही. ती आता येणारच नाही की काय या विचारानं हातपाय गळतात बघ. आपण हातीपायी धड तर घर सुघड ना! सुरुवातीला अगदी हौसेहौसेने नवर्‍यानं, मुलांनी मदत केली; पण आज संपेल उद्या संपेल असं वाटणारा तो काळ आपला मारुतीच्या शेपटासारखा वाढतच गेला. धुण्यापाण्याची कामं दिवसातून एकदा केली की सुटका होते, पण भांड्यांचं काम संपता संपत नाही आणि तो ढिगारा बघूनच काम सुचता सुचत नाही. भांडी म्हणजे नको जीव झालाय बघ!’’
ती खरोखरच खूप वैतागली होती. मोलकरीण धड ‘येणार नाही’ असंही नक्की सांगत नव्हती आणि बारा-पंधरा वर्षांच्या सवयीच्या झालेल्या, प्रामाणिक, स्वच्छ, नीटनेटक्या मोलकरणीला सोडायला तिचा जीव धजत नव्हता. एक तर नवीन बाया अव्वाच्या सव्वा पगार मागत होत्या आणि शिवाय वेळा, खाणीपिणी, भांडी यांच्याही अटी घालत होत्या.

तिच्याच नाही तर एकूण बर्‍याच जणींच्या बाबतीत हाच मुद्दा प्रकर्षाने बोलण्यातून जाणवत होता. पूर्ण बंदच्या काळात संपर्कसाधन म्हणजे फोन. कुणाशी सहज म्हणून बोलायला जावं तरी कोरोना आणि घरच्या बाबतीत ‘भांडी’ हाच मुद्दा होता. एका सुगृहिणीनं इडली करायला किती भांडी वापरावी लागतात याचा हिशेब दिला होता आणि एवढा सगळा आटापिटा आणि भांड्यांची निमूटपणे घासपूस करूनही ‘केलं काय तर इडली’ हा शेराही ऐकावा लागला होता. हा ‘घरचा आहेर’ मिळाल्याने व्यथित होऊन तिने आपले दुःख व्हॉट्‌सऍपवर ‘शेअर’ केले होते. आणखी एकाने प्रवासी डबा उघडून त्याच्या पोटातली उपयोगी भांडी दाखवली होती. मात्र एका गृहस्थाने कोरोनाच्या काळात बारीक निरीक्षण करून ढोबळ सिद्धांत मांडला होता की, स्वयंपाकाला २३६ की कायशी एकूण भांडी लागतात (पुरतात) तर आपण इतकी अनावश्यक भांडी आणतो कशाला आणि वापरतो कशाला? पोत्यात भरून ही ज्यादाची भांडी माळ्यावर टाकून द्यावीत आणि उगीच गर्दी करून मध्येमध्ये लुडबूड करू नये अशीही सूचना त्याने केली होती. या काळात निदान काही दिवस कुणी इडली, डोसा, पोहे, उपमा, शिरा खाण्यासाठी केळी कर्दळीची पाने वापरली. कुणी कागदी प्लेट्‌स, द्रोण, वाट्या वापरून भांडी कपात केली होती आणि तद्नुषंगाने भांडी घासण्याचीही तसदी घेतली नव्हती. चमचा म्हणून बोटांचा वापरही केला होता. काही इतिहासप्रेमींच्या मनात तर बाजीरावासारखी तळहातावर भाकर घेण्याचा विचारही (बायकोची भांड्यांची चिडचिड ऐकून) डोकावला होता आणि हौसेने भांडी घासणार्‍यांनाही आता प्रचंड कंटाळा आला होता.

पण एकूणच स्त्रियांना भांड्यांचा सोस असतो आणि गरज नसतानाही वेगवेगळ्या आकारप्रकारची भांडी कशाला जमवायची हे नवरेलोकांना पडलेले कोडे असते. टी.व्ही.वर किचनसेट- ‘अवघ्या अमुक किमतीत आणि त्यावर अमुक भांडे मोफत’ अशी जाहिरात मोठ्या चविष्टपणे पाहणार्‍या बायकोकडे ते मोठ्या रागिष्टपणे पाहत असतात. आता तर ऑनलाईन ऑर्डर दिली की घरपोच वस्तू वा भांडी. त्यामुळे त्याचे आकर्षण अतीच. गरज आहे की नाही याचा विचारच केला जात नाही. पूर्वीपासून ते आजही लग्नकार्यात रुखवतासाठी, लेकीच्या संसाराची सुरुवात म्हणून किंवा भेटवस्तू म्हणूनही भांडी देण्याची प्रथा होती आणि आहे. पीत, पीतेली, कुंडे, तांबे, ताटे, वाट्या, परात, डबे, उलथनं, झारा, चिमटा अशा अनेक वस्तू असत. मिल्क कूकर ही एकेकाळची सर्वमान्य भेटवस्तू होती. बारशाला बाळंतविड्याबरोबर वाटीचमचा (चांदी वा स्टील) आणि वाढदिवसाला छोटी ताटवाटी ठेवलेली. घरात हंडेघागरींपासून कळशा, तांबे, डबे, तांब्या-पितळेचे ठोक्याचे किंवा साधे असे. रिठे, चिंच- मीठ, लिंबू-मीठ, शिकेकाई यांनी ते घासून मग राखेने घासले की सोन्यासारखे झळकत. मानपानाची चांदीची भांडी, देवाची उपकरणं, सारं राख, साबणपाण्याने साफ होई. आता व्हिम, पीतांबरी, प्रिल अशी सॉलीड आणि लिक्विड दोन्ही साधनं आणि नारळाच्या शेंडीऐवजी घासण्या मिळतात. स्वयंपाकाची, तो काढून ठेवण्याची, जेवणाखाण्याची, पदार्थ खाण्याची, शोकेसमधली काचेची चिनी मातीची, न्हाणीघराची, पूजासामग्रीसाठी देवघराची, आंघोळ-धुण्यापाण्याची, साठवणीची, ठेवणीची अशी किती किती भांडी आपल्याला रोजच्या आणि कधीतरीच्या वापरासाठी लागतात. ती किती वेगवेगळ्या धातूंची- पितळ, कांबाची, तांबे, सोने, लोखंड, चांदी, ऍल्युमिनियम, स्टीलची तशीच दगडी, मातीची असतात. काही हिंडालियम आणि पत्र्याचीही असतात. आता तांबे-पितळेच्या भांड्यांना कल्हई करून झिलई देणारा फार क्वचित आढळतो. स्टीलची भांडी घासायला कमी श्रमाची, सोपी, सुटसुटीत म्हणून त्यांचा वापर जास्त होतो, अगदी कुकरपासून बुटकुल्यापर्यंत. गंज, सतेली, सट, झारी, कावळा, गडवा (गडू), लोटा, हंडे, बंब, घंगाळं, पितळी (थाळा), वेडं भांडं (पसरट), इडलीपात्र, मोदकपात्र, रोवळ्या, चकल्या, किसण्या, विळ्या, सुर्‍या हे सारं सारं तर भांडी आणि त्यांचे सहाय्यक म्हणून लागतंच. स्वयंपाकघरात सार्‍यांची गर्दी होते तेव्हा कधी भांंड्याला भांडं लागतं आणि नाद होतो. ‘त्याचा नाद धरा असे आपण म्हणतो, जणू ते भांडे रडत असते त्याला आपण उभं करत असतो’ असे सानेगुरुजींनी एके ठिकाणी म्हटले आहे. एरव्ही भांड्याला भांडं लागणं याचा अर्थ भांडण होणं असा आपण गृहित धरतो. स्टीलच्या भांड्याला विंचवानं नांगी मारली तर भोक पडतं. एरव्ही भांडी झिजतात, गंजतात, चेपतात, त्यांना पडून पोेचे येतात. पण प्रत्येक भांड्याचे काम ठरलेले. तळणासाठी झारा, उलथण्यासाठी उलथनंच लागतं. भांड्याला पात्र म्हटलं आहे. आपलं शरीर हे जीव धरून ठेवणारं पात्रच आहे. त्याच्या प्रत्येक अवयवाचे कर्तव्यकर्म ठरलेले आहे आणि ते त्याने चोखपणे बजावले आहे की नाही हे पाहणे त्या जीवाचे काम आहे. मग जीव भांड्यात पडतो. हे पात्र, हा घट ईश्‍वरचिंतनाच्या, माणुसकीच्या, श्रद्धा, आत्मविश्‍वासाच्या जोरावरच सोन्यासारखा झळकेल असे वाटते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

उद्याचा काय नेम?

डॉ. सोमनाथ कोमरपंत माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू...

कोरोनाने विश्‍वच बदलले!

श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक) रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...