बोर्डेतील अपघातात 1 ठार

0
8

>> ओव्हरटेक करताना दोन दुचाकींमध्ये अपघात

डिचोली ते म्हापसा या महामार्गावर बोर्डे-डिचोली येथे दीनदयाळ सुपर मार्केटसमोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात कुंभारवाडा-मये येथील उदय विलास शेट (30) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना काल संध्याकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर माहितीनुसार, उदय शेट हा आपल्या जीए-04-आर-4992 या ॲक्टिवा दुचाकीने मुळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना मुळगावच्याच दिशेने जाणाऱ्या जीए-03-एल-5703 क्रमांकाच्या मोटरसायकलला त्याने मागाहून जोरदार धडक दिली.

या धडकेत उदय हा दुचाकीवरून उसळून रस्त्यावर पडला. त्यावेळी त्याचे डोके रस्त्यावर आपटले. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे डोके आणि नाका-कानांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या अपघातानंतर उपस्थितांनी लगेचच 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला; मात्र डिचोलीतील रुग्णवाहिका इतरत्र गेल्याने कासारपाल येथून रुग्णवाहिका मागविण्यात आली. सदर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात त्याला नेले असता मृत घोषित करण्यात आले.

या धडकेत अस्नोडा येथील दुसरा मोटरसायकल चालकही उसळून रस्त्यावर पडला; मात्र त्याच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताच डिचोली वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. त्यानंतर पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला.