बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके स्थापन

0
14

खाण खात्याने बेकायदा चिरे खाणी आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके स्थापन करण्यात केली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्यातील बेकायदेशीर आणि अनधिकृत उत्खनन आणि उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण विभागाने संबंधित तालुक्यांच्या मामलेदारांच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय भरारी पथके स्थापन केली आहेत. बेकायदेशीर उत्खननाशी संबंधित कोणत्याही विभाग व कार्यालयांना प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित भरारी पथकाकडे पाठवल्या जातील.

त्याबाबत सूचना मिळाल्यानंतर भरारी पथकाकडून ४८ तासांच्या आत तपासणी आणि कारवाई करणे अपेक्षित आहे. बेकायदेशीर उत्खनन, वाहतूक करणार्‍या व्यक्ती आणि संबंधित जमीनमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरलेली यंत्रसामग्री, उपकरणे आणि वाहने जप्त करून पोलीस विभागाच्या ताब्यात ठेवली जातील, अशी माहिती खाण खात्याने दिली आहे.