‘बिपरजॉय’मुळे मान्सूनचे आगमन रखडले

0
9

>> आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार; राज्यातील शेतीची कामे खोळंबली; शेतकरी चिंताक्रांत

उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळण्याकरता पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, दक्षिणपूर्व आणि पूर्वमध्य खोल अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे राज्यातील आगमन लांबणीवर पडणार आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने काल गती घेतली असून, ते वेगाने उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आधीच हवामान विभागाने केरळात मान्सून दाखल होण्याचा वर्तवलेला अंदाज चुकला आहे, त्यात आता चक्रीवादळाचीही भर पडली आहे. मान्सून रखडल्यास शेतीची कामे देखील खोळंबून पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. त्याशिवाय पाणीटंचाईच्या संकटालाही सामोरे जावे लागणार आहे.

यंदा मान्सूनच्या पावसासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत केरळमध्ये पोहोचेल. केरळमध्ये 1 जूनला दाखल होणारा मान्सून 5 जूनला दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते; पण हा अंदाजही चुकला होता. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मान्सून 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत गोव्यात मान्सूनचे आगमन झाले होते.
बांगलादेशने अरबी समुद्रातील या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव दिले आहे. अरबी समुद्रात खोलावर मंगळवारी चक्रीवादळ वेगाने तीव्र झाले. मंगळवार सकाळपर्यंत या चक्रीवादळाचा वेग वाढला. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून 930 किमी. अंतरावर आहे, तर मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून 1060 किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून 1150 किमी, तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून 1450 किमी अंतरावर आहे. या चक्रीवादळामुळे केरळ परिसरातील मान्सूनपूर्व पावसामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या वादळाचा मान्सूनच्या पुढे सरकण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग वादळावर लक्ष ठेवून आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात वाढ कायम आहे. राज्यातील कमाल तापमानात 4.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात 1.7 अंश सेल्सिअसने वाढ नोंद झाली. चोवीस तासांत कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस नोंद झाले. आर्द्रता 84 टक्के एवढी नोंद झाली आहे. परिणामी नागरिक वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत.

चक्रीवादळाचा भारताला धोका नाही
चक्रीवादळाच्या सध्याच्या गतीनुसार हे वादळ वेगाने उत्तरेच्या दिशेने घोंघावत जात आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकत असल्याने भारतीय समुद्र किनाऱ्यांना या वादळाचा जास्त धोका नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पुढील 24 तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.

खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन
चक्रीवादळामुळे मोठ्या पावसाची शक्यता नाही; परंतु जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. येत्या 8, 9, 10 जून दरम्यान गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा वेग 40-50 प्रतितास असण्याची शक्यता आहे. या काळात नैऋत्य अरबी समुद्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.