>> कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे; अन्यथा गोव्यात कोरोना चाचणीची सक्ती ः मुख्यमंत्री
हवाई, रेल्वे व रस्तामार्गाने गोव्यात येणार्या सर्व प्रवाशांना यापुढे कोविड-१९ संसर्गापासून आपण मुक्त (निगेटिव्ह) असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊनच राज्यात यावे लागेल. अन्यथा त्यांना राज्यात आल्यानंतर कोविड-१९ साठीची चाचणी करुन घेणे सक्तीचे असेल. मात्र, स्वतःच्या घरात विलगीकरणात (क्वारंटाईन ) राहण्याचा पर्याय यापुढे त्यांना देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. हा बदललेला एस्ओपी येत्या ३ जूनपर्यंत लागू राहणार आहे. नंतर आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
परराज्यातून गोव्यात येणार्या प्रवाशांसाठीच्या एस्ओपीत बदल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बदललेल्या एस्ओपीनुसार आता गोव्यात येणार्या प्रवाशांसाठी केवळ दोनच पर्याय असतील. एक तर त्यांना गोव्यात येतानाच आपल्या राज्यातून आपणाला कोरोनाची निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांना गोव्यात आल्यानंतर कोरोनासाठीची चाचणी करुन घ्यावी लागेल. आतापर्यंत या प्रवाशांना आपल्या घरात विलगीकरणात राहण्याचा तिसरा पर्यायही उपलब्ध होता. मात्र तो तिसरा पर्याय रद्द करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला.
मुंबईतून येणार्या प्रवाशांसाठी वेगळा एस्ओपी असेल काय, असे पत्रकारांनी विचारले असता बदल करण्यात आलेल्या एस्ओपीमुळे आता त्याची गरज राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवशी १६ हजार चाचण्या शक्य
गोव्यात एका दिवसात १ हजार जणांची कोरोनासाठीची चाचणी केली जाऊ शकते. सध्या तरी याच्यापेक्षा मोठ्या संख्येने परराज्यांतून लोक गोव्यात येत नसल्याचे दिसून आले असल्याचे सावंत यांनी सांगितले.
येत्या ३ जूनपर्यंत ही सुधारीत एस्ओपी लागू राहणार आहे. त्यानंतर लॉकडाऊनमुळे वाढ करण्यात येईल काय ते आम्हाला माहीत नाही. ३ जूननंतरच्या एकूण परिस्थितीपासून एस्ओपीबाबत पुढील काय तो निर्णय घेण्यात येणार आहे.
आम्ही राज्यात येणार्या ज्या लोकांची कोरोनासाठीची चाचणी करणार आहोत त्यापैकी जर कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर अशा लोकांना बोलावून घेऊन उपचारासाठी इस्पितळात हलवण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवण्यात येईल, असे सावंत म्हणाले.
…म्हणून कोविड-१९ प्रमाणपत्राची
सक्ती केली होती
गेल्या सोमवारी जेव्हा राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्या तेव्हा हवाई मार्गावर अन्य मार्गाद्वारे परराज्यांतून सुमारे ४ हजार प्रवासी गोव्यात येण्याची शक्यता होती. एवढ्या लोकांची कोरोनासाठीच्या चाचणी एका दिवसात करणे आम्हाला शक्य नव्हते. आणि म्हणूनच या लोकांना राज्यात येतानाच त्यांना कोरोच्या संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन येण्याची सक्ती करण्यात आली होती, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात त्या दिवशी बर्याच विमानांची उड्डाणे ऐनवेळी रद्द झाल्याचे ते म्हणाले.
सध्या एक हजाराच्या आसपास प्रवाशी परराज्यांतून येत असून त्यांची तपासणी करणे शक्य असल्याचे सावंत म्हणाले
रेशनकार्ड नसलेल्या स्थलांतरीतांना
मोफत ५ किलो तांदूळ
महत्वाच्या निर्णयासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ज्या स्थलांतरीत कामगारांकडे रेशनकार्डे नाहीत अशा कामगारांच्या कुटुंबियांना माणशी ५ किलो तांदुळ मोफत देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या कामागार कुटुंबियंाना मामलेदार अथवा उपजिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात नोंदणी करावी लागेल. ज्या स्थलांतरीत कामगारांकडे रेशनकार्डे नाहीत अशा कामगारांच्या कुटुंबियांना माणशी ५ किलो तांदुळ देण्यासंबंधीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
गोमेकॉतील वायरोलॉजी प्रयोगशाळेसाठी कंत्राटी पद्धतीवर जी नवीन भरती करण्यात आलेली आहे तिला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच आगामी आतंरराष्ट्रीय योग दिनासाठीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. गोमेकॉत दोघा डॉक्टरांची भरती करण्यासही मंजुरी देण्यात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, अद्यापही बरेच गोमंतकीय विदेशांत अडकून पडलेले असून त्यांना गोव्यात परतता यावे यासाठी त्या त्या देशांतून थेट विमाने गोव्यात यावीत यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विदेशांतून आलेल्या गोमंतकीय दर्यावर्दीकडून संस्थात्मक विलगीकरणासाठीचे पैसे सरकार घेत असल्याबद्दल विरोधक जी टीका करीत आहेत त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ते पैसे ते ज्या कंपन्यांत काम करीत होते त्या कंपन्यांनी भरले आहेत.
आम्ही दहावी इयत्तेच्या परीक्षेनंतर जिल्हा पंचायत निवडणुका घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी तसे म्हटले नव्हते. मात्र, त्यांनी तसे सांगितल्याची चुकीची माहिती काही माध्यमांनी दिल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवरील टीकेमुळे
मंत्री काब्राल संतप्त
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच राज्य प्रशासन अथकपणे काम करीत असताना विरोधी आमदार मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरत असल्याबद्दल व त्यांच्यावर अत्यंत प्रखर अशी टीका करीत असल्याबद्दल वीजमंत्री निलेश काब्राल यांनी काल नाराजी व संताप व्यक्त केला.
कोरोना महामारीच्या काळात तरी निदान विरोधी आमदारांनी राजकारण करु नये. असे राजकारण हे निवडणुकांच्या काळात करायचे असते, असे काब्राल म्हणाले. सध्याच्या आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री रोज कित्येक अतिरिक्त तास काम करीत असून राज्य प्रशासन तर २४ तास चालूच असते, असे काब्राल म्हणाले.