बाबरची पाचव्या स्थानी झेप

0
134

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याने पाचवे स्थान मिळविले आहे. पाचव्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे स्थान मिळविले होते.

इंग्लंड आणि पाकिस्तानमधील साऊथहॅम्पटन येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याआधी ६ व्या स्थानावर असलेल्या आझमने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला पछाडत अव्वल ५ मध्ये प्रवेश मिळवला. या कसोटीत बाबरने ४७ धावांची खेळी साकारली होती. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली (८८६) दुसर्‍या स्थानावर आहे. यानंतर चेतेश्‍वर पुजारा (७६६) व अजिंक्य रहाणे (७२६) ही दुकली अनुक्रमे आठव्या व दहाव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह याची मात्र घसरण झाली आहे. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन यांनादेखील फायदा झाला आहे.

५६ धावांतील ४ बळींच्या जोरावर ब्रॉडने तिसर्‍या स्थानावरून दुसर्‍या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. जेम्स अँडरसनने दोन क्रमांंकांची प्रगती साधत १४वा क्रमांक मिळविला आहे. पाकिस्तानचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद अब्बास याने दोन स्थानांनी वर सरकताना आठवे स्थान मिळवले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये मिळविलेल्या वैयक्तिक सर्वोत्तम तिसर्‍या स्थानापासून अजून तो दूरच आहे. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या झॅक क्रॉवली याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८१वे स्थान मिळवले आहे.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड २७९ गुणांसह तिसर्‍या तर पाकिस्तान १५३ सह पाचव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत भारत ३६० गुणांसह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया २९६ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.