फर्मागुडी आयटीआयमध्ये मिळणार परदेशी भाषांचे प्रशिक्षण

0
30

>> कौशल्य विकास खात्याचे संचालक गावकर यांची माहिती

>> आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट केंद्र जाहीर

फर्मागुडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या केंद्रातून राज्यातील आयटीआयमध्ये प्रशिक्षण विद्यार्थी नोकरीसाठी परदेशात जाऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना परदेशी भाषांबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर फर्मागुडीच्या आयटीआयमध्ये परदेशी भाषांचे प्रशिक्षण देणारी भाषा प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल दिली.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात काळानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी विविध कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात येत आहे. काकोडा येथील आयटीआय केंद्रातून द्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाबाबत अभ्यासक्रम सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. द्रोनच्या साहाय्याने जमीन मापणी, निरीक्षण, शेतकऱ्यांना पिकावर कीटकनाशकांच्या फवारणीचे उपक्रम राबविले जाणार आहेत. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनासाठी विविध कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे गावकर यांनी सांगितले.

सौरऊर्जा प्रकल्प
कौशल्य विकास खात्याच्या माध्यमातून फोंडा तालुक्यातील निरंकाल येथे राहणाऱ्या वानरमारे समाजाच्या वस्तीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या वानरमारे समाजाच्या वस्तीमध्ये विजेचा अभाव आहे. या वस्तीमध्ये वीजपुरवठा करण्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. फर्मागुडी येथील आयटीआय केंद्राकडून सौरऊर्जा प्रकल्पाची देखभाल करण्याचे काम केले जाणार आहे. फर्मागुडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून सौरऊर्जा प्रशिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, असेही संचालक गावकर यांनी सांगितले.
म्हापसा आयटीआय केंद्र वगळता सर्व प्रशिक्षण केंद्रातून आदरातिथ्य अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यातील प्रमुख तारांकित हॉटेलसोबत सामंजस्य करार केले जात आहे, असेही संचालक गावकर यांनी सांगितले.

प्रवेशासाठी मुदतवाढ
राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. आयटीआय प्रवेशाला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. विशेष श्रेणी, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आठशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेले 7 विद्यार्थी, 80 ते 90 टक्के गुण असलेले 47 विद्यार्थी, 70 ते 80 टक्के गुण असलेले 163 विद्यार्थी, 60 ते 70 टक्के गुण असलेल्या 543 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असेही संचालक गावकर यांनी सांगितले.