‘प्रेसिडेंट ऑफ भारत’च्या उल्लेखावरून उफाळला वाद

0
4

>> विशेष अधिवेशनात ‘इंडिया’ नाव हटवण्याबाबत प्रस्ताव मांडला जाणार असल्याची चर्चा; विरोधकांच्या इंडिया आघाडीत खळबळ

देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचे विरोधकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या या आघाडीवर टीका आणि इंडिया नावाला विरोध होत आहे. त्यात आता चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरूनच इंडिया नाव गायब झाल्याचे एका व्हायरल पत्रावरून समोर आले आहे. आगामी जी-20 परिषदेतील सदस्य देशांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात इंडिया नाव हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. परिणामी विरोधकांच्या इंडिया आघाडीत मोठी खळबळ माजली आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर केल्यापासून या अधिवेशनात काय चर्चा होणार, कोणती विधेयके मांडली जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. सर्वात पहिल्यांदा ‘एक देश, एक निवडणूक’ संदर्भात चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर काल देशाच्या नावाविषयीची चर्चा रंगली.राष्ट्रपतींच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत पहिल्यांदाच ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया जाहीर केल्यापासून त्यासंदर्भात चर्चा रंगल्या होत्या. पंतप्रधानांपासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच या आघाडीवर आणि इंडिया नावावर टीकास्त्र सोडले होते. आगामी 5 दिवसांच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाच्या नावाबाबत काही विधेयक मांडले जाणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे.

भागवत यांनी केले होते सुतोवाच
शुक्रवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान लोकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते.

काँग्रेसकडून संताप व्यक्त
या प्रकारावर काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, मनीष तिवारी यांनी थेट राज्यघटनेचा संदर्भ दिला आहे. घटनेच्या कलम 52 नुसार ‘कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ असा उल्लेख आहे. भारतात प्रेसिडंट ऑफ इंडिया असू शकतात. यापेक्षा अजून कुठला पुरावा आवश्यक आहे? असे ट्विट मनीष तिवारी यांनी केले.

भारत नाही म्हणणार, तर काय म्हणणार? : भाजप
मला कळत नाहीये की यात चुकीचे काय आहे? आपला देश भारतच आहे. मग प्रेसिडंट ऑफ भारत म्हणण्यात अडचण कुणाला आहे? काँग्रेसला सगळ्यातच समस्या दिसते. आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार? असा थेट सवाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केला आहे. मी एक ‘भारतीय’ आहे, माझ्या देशाचे नाव ‘भारत’ होते आणि नेहमीच ‘भारत’ राहील. काँग्रेसला ही समस्या असेल तर त्यांनी स्वत: त्यावर उपाय शोधायला हवा, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.