प्रारब्ध

0
488

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
अंग नुसते गार पडले होते. पहाटे आणि एवढी थंडी, तीही पावसाळ्यात! माझे अंग नेहमीच घामाने भिजून जाते. बाहेरून घरी परतल्यावर कधी एकदा अंगावर पाणी टाकतो असे होते. मग दिवसा मी कितीदा आंघोळ करतो असे कुणी मला विच्चारत पण नाही. उन्हाळ्यात तर चार-पाच वेळा तरी आंघोळ घ्यावीच लागते. अगदी झोपण्यापूर्वी रात्री बारालाही, नाहीतर झोप येत नाही.
पंख्याचे वारे हवेच. पंखा किती वेगाने ठेवायचा ते शेजारी झोपलेल्यांना विचारल्यानंतरच ठरणार. उघड्या अंगाने झोपणे मला आवडते. खिशात पैसे जमा झाल्यानंतरच हल्ली एसी लावलाय. किती बरे वाटते! सदैव भणभणणारे डोके एसी खोलीत बसल्या बसल्या थंड होते. झोप पण आता छान लागते. काल तर कितीतरी उकळत होते. कुणीही एसी लावला नव्हता. आता अचानक अंग थंडगार पडले होते.आम्ही प्रवासाला ऋषीकेशला गेलो होतो. तिथली गंगा पाहून नवलच वाटले. कारण आम्ही नेहमी वाळवंटी, मांडवीच बघत आलो होतो. इथले पाणी एवढे स्वच्छ होते की वाटले घोटभर प्यावे. इथे फिल्टरची गरजच नाही. एक-दीडमीटरवरचा तळ दिसत होता. तळाला पडलेली, भक्तांनी टाकलेली नाणी चक्क दिसत होती. लोक काठ्यांना लोहचुंबक लावून नाणी काढत होते. पाण्याला हात लावला. पाणी एवढे थंडगार होते की अंगावर काटा उभा राहिला तरीदेखील मी गंगेच्या थंडगार पाण्यात दोन डुबक्या मारल्याच!
पण त्या दिवशी थंडी सोसवत नव्हती. सगळे उघडे उघडे वाटत होते. चादर ओढण्याचा प्रयत्न केला. हाता-पायांना आकडी भरली होती. हलतच नव्हते. हो, असे एकदा मला झाले होते. हर्नियाच्या ऑपरेशच्या वेळी मटक्यातून इंजेक्शनने गुंगी दिली होती. कंबर व खालचे सगळे शरीर नाहीसे झाले होते. खाली काहीच संवेदना जाणवत नव्हती. त्यावेळी कंबरेवरचा भाग शाबूत होता. आता तर कंबरेखालचा व वरचा भाग पण नाहीसा झाला होता. मी माझे हातपाय हलवू नव्हतो. थंडी फार वाजत होती. सगळीकडे काळोख पसरलेला होता. पहाट व्हायला अजून कितीतरी तास होते बहुदा पायाजवळ चादर पण नव्हती. रात्री बाराला मला वाटते छातीत जोरदार कळ तेवढी आली होती. मग ती कळच नाहीसी झाली. शेजारी झोपलेल्या बायकोला मी जागवले नव्हते. गेल्या दोन रात्री ती झोपलीच नव्हती. माझ्या छातीत कळ आल्याचे सांगितले असते तर तिची झोपच उडाली असती. एरवी हल्ली तिची झोपच उडाली होती. तिच्या डोक्यात नेहमी भन्नाट विचार येत असतात. मी म्हटले, ‘‘अगं थांब, जास्त विचार करू नकोस! प्रेशर वाढेल… विच्चारांनी मधुमेह होईल… पण ऐकतोय कोण?’’ किती दिवस झाले म्हणते डोके दुखतेय. मी म्हटले, ‘‘डॉक्टरांकडे जाऊ अथवा डॉक्टरांना घरी बोलावून घेऊ.’’ तर नाही. एकदा ठरवले म्हणजे नाही ते नाहीच. मग जीवाचे बरे वाईट झाले तर मग मुलांना मी तोंड काय दाखवणार! त्यांच्या त्या प्रश्‍नांची उत्तरे कशी देणार? कारण उत्तरे मलाच माहीत नाही ना! हो, रात्री छातीत जोरदार कळ आली, चक्कर आली… महाभयंकर घामही आला… तिला मी उठवले नाही हे मात्र खरे!
पण आता काय मला थंडी वाजते ना! यावर कुणी काही उपाय करणार की नाही. मघाशी कुणीतरी बोलले – दोन-तीन दिवस इथेच राहावे लागेल! एवढ्या दूरवरून पोहोचायला दोन दिवस तर लागणारच. काय हो, विजेचा खटका बंद करायला कुणी खास माणूस एवढ्या दूरवरून कशाला आणायला पाहिजे… ओढा खटका… बंद करा ती वीज. मी जोराने ओरडलो. कुणीही ऐकले नाही. मला वाटते जवळपास कुणीही नव्हते. चिडीचूप भयाण शांतता होती. मला तर नेहमीच शांतता हवी. कुणी मोठ्याने बोललेले, गायलेले, नाचलेले मला बिलकूल खपत नव्हते. सगळे कसे हळुवारपणे करावे. माझी सासू नेहमी म्हणायची, कुणालाही वाईट वाटेल असे कधी बोलायचे नाही. माझे काका म्हणायचे – गरमागरम खाऊ नये. अशाने तोंड भाजेल. हळूहळू फुंकर मारत, थंड करूनच खावे किंवा प्यावे. मला ते काही जमले नाही. गरमागरम खायची, प्यायची मजा न्यारी असते. पण भाजले ना तोंड… कित्येक वेळा जीभ भाजली… तोंड भाजले तरीही मी माझ्यात बदल केला नाही. आता बदल करायला वेळ तरी आहे का?
मुद्याचे राहूनच गेले. काल आम्ही एका कुटुंबाला भेटायला गेलो होतो. ती माझी माणसे होती. चार महिने अमेरिकेला राहून आली होती. मी दोनदा अमेरिकेला गेलो; पण दोन ते तीनच महिने राहिलो. मग पळून आलो. माझी रक्ताची माणसे मला रहा रहा म्हणत होती. पण जमले नाही. जेवणात जसे लोणचे, पापड, कडू कारल्याचे रायते असते हेही काहीतरी तशाच प्रकारचे होते. विरहात रडणे मला भावत होते. अंगवळणी पडले होते ना! परतताना पाय जड झाले होते, डोळे भरून आले होते.. उर पण फाटला होतो. मी म्हटले, ‘‘आहेत आणखी कितीतरी वर्षे’’ तेव्हा मग यायलाच हवे. पुढे तर यायला कारणे कितीतरी आहेत. कुणास ठाऊक…! थंडी भयंकर वाजत होती. अंग कसे घट्ट बनले होते. अजून पहाट होतच नव्हती!
त्यांचा मुलगा गेली पाच-सहा वर्षे अमेरिकेला नोकरीला होता. त्याच्या आईवडिलांचे तिथे जाणे झालेच नाही. आज जाणार… उद्या जाणार म्हणत वर्षे गेली. जाणे काही जमले नाही. मुलाचे वय २६-२७, एकुलता एक… गोरा गोमटा… शांत… सर्वांकडे आदराने बोलणारा! मुक स्वभावाचा होता. शिक्षणासाठी बाहेरगावीच राहिला. कधी भेटला तर गालांतच हसायचा.
आठ महिन्यांपूर्वी येऊन गेला. त्याचे लग्नाचे ठरलेले होते. साखरपुडा थाटामाटात पार पडला. अमेरिकेत राहणार्‍यांना वेळच नसतो. महिनाभर रजा असते. यायला-जायला चार दिवस… जेटलॅगमध्ये चार दिवस जातात. राहता राहिलेले दिस कसे जातात कळतच नाही. त्यांची निघायची वेळ येते तेव्हा कळते आपण मुला-मुलीला उराशी धरलेच नाही… त्यांच्या कपाळाची चुंबने घेतलीच नाही. त्यांच्याशी करण्यासाठी ठरवलेले संभाषणही राहूनच गेलेले असते.
तो पोरगा तिथे नोकरी करायचा. आईवडिलांना तो यंदा अमेरिकेची सफर घडवणार होतो. तो कानावर बातमी पडली – कालच त्याचे आईवडिल अमेरिकेला गेलेय. बरे झाले. आता मस्तपैकी अमेरिका दर्शन घडणार होते. मी मुलीला फोन लावला. त्यांचा नंबरही देऊन ठेवला. म्हणजे ती त्यांना आपल्या घरी निमंत्रित करू शकणार होती.
पण ते होणे नव्हते. महिन्यापूर्वी सकाळी सकाळी फोन वाजला. बातमी भयंकर होती. तो मुलगा आजारी होता. तो आजारी असल्याची बातमी कळताच त्याच्या आईवडिलांनी अमेरिकेला धाव घेतली होती. आजार गंभीर होता. मोठ्या इस्पितळात त्याला भरती केले होते. तिथले डॉक्टर, औषधे त्याला वाचवू शकली नाही. महिन्यापूर्वी तो वारला. त्याचे दाहसंस्कार तिथेच झाले. थोडे दिवस त्यांच्या नातलगांनी त्यांना ठेवून घेतले. हल्लीच ती मंडळी घरी परतली. आल्या आल्या विधीयुक्त ब्राह्मणाद्वारे त्याच्या अस्थीचे विसर्जन संगमावर करण्यात आले.
आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो. दिवाणखान्यांत सगळी मंडळी बसली होती. निरव शांतता पसरली होती. हळूवारपणे संभाषण चालू होते. खरे म्हणजे बोलणे खुंटले होते. सगळे काही संपल्यात जमा होते. मेजावर त्याचा हसरा फोटो होता. फोटाभर गुलाबाची फुले होती. माझे डोळे डबडबले. ओल्या डोळ्यांनी तो फोटो पुसट झाला. तिथे दुसर्‍याच कुणाचातरी फोटो होता… ओळखीचा वाटत होता.
हे राम…! माझाही पोरगा…. पोरगी अमेरिकेला होती. छातीमध्ये जोरदार कळ आली… चक्कर आली. मी स्वत:ला सावरलो. खुर्चीवर बसलो. भेट संपली. त्यांचे सांत्वन करत आम्ही खाली उतरलो. घरी परतताना डोके जड झाले होते. घामाने कपाळ भरले होते. कसाबसा स्वत:ला सावरत घरी परतलो. आंघोळ घेण्याचे धाडस झाले नाही. देवा, माझ्यावर अशी परिस्थिती येऊ देऊ नकोस! मी तुझी सेवा केली आहे. उपकार कर माझ्यावर. निघतेवेळी त्याचे वडिल म्हणत होते, ‘‘आम्ही देवाचीही सेवा केली. सदैव त्याच्या पायावर डोके ठेवले. दररोज त्याची नित्यनियमाने पूजा करूनच बाहेर पडलो. तरीही हे भोग त्याने आम्हांलाच का द्यावे?’’
त्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. पण प्रश्‍न मात्र पुष्कळ होते. आमच्याहीबाबत असे घडले तर…! हा विचार करत झोप येत नव्हती. बाजूला ही झोपली होती. रात्री परत एकदा छातीत जोरदार कळ उमटली.
इथे कसे थंडगार वाटते. अंग आता जास्त कडक झालेय. संवेदना हरवली आहे. डोळेपण मिटले आहेत. घाम यायचा केव्हाच बंद झालाय. अद्याप पहाट का होत नाही? पक्ष्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव का बरे ऐकू येत नाही!!