प्रतापसिंह राणेंची शेवटच्या क्षणी माघार

0
20

>> विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कॉंग्रेसकडून पर्ये मतदारसंघात रणजीत राणेंना उमेदवारी

गेली ५० वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून काल शेवटच्या क्षणी माघार घेतली. गेल्या काही दिवसांपासून राणे निवडणूक लढवणार की नाहीत, याबाबत खुद्द कॉंग्रेस पक्षासह जनतेत देखील संभ्रमावस्था होती. अखेर काल कॉंग्रेसने आपल्या दोन उमेदवारांची अंतिम जाहीर करत पर्येतून रणजीत राणे यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे प्रतापसिंह राणेंनी या निवडणुकीतून माघार घेतली, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

प्रतापसिंह राणे यांनी विधानसभा निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने कॉंग्रेसला नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. पक्षाने पर्ये मतदारसंघाततून रणजीत राणे यांना उमेदवारी दिली आहे, तर सावर्डे मतदारसंघात खेमलो सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सुरुवातीला कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत प्रतापसिंह राणेंचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लगेचच दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती; परंतु ते प्रत्यक्षात निवडणूक लढवणार का, याबाबत कालपर्यंत संभ्रमाचेच वातावरण होते.

दरम्यानच्या काळात राणे यांनी राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला होता. तसेच भाजपने त्यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी दिल्याने ते माघार घेतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र चारच दिवसांपूर्वी त्यांनी पर्येतील भूमिका मंदिरात नारळ ठेवून आशीर्वाद घेतला होता.

त्यामुळे ते आपल्या सूनेच्या विरोधात निवडणूक लढवणार की काय, अशा चर्चा सुरू झाली होती. राणेंऐवजी त्यांच्या पत्नी विजयादेवी या निवडणूक लढवतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती; मात्र कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
दरम्यान, कालच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याविषयी भाष्य केले होते. पर्येतील कॉंग्रेसचा उमेदवार आमदार प्रतापसिंह राणे यांच्याशी चर्चा करून निश्‍चित केला जाणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.

सहा वेळा बनले मुख्यमंत्री
प्रतापसिंह राणे हे मगो पक्षाच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आल्यानंतर दयानंद बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात १९७२ साली मंत्री बनले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सहा वेळा या पक्षाकडून निवडून येऊन ते मुख्यमंत्री बनले. आमदार, सभापती, विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. ते पहिल्यांदा काही निवडणुकांत वाळपई मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर पर्ये मतदारसंघातून आतापर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले आहेत.