प्रज्ज्वल रेवण्णा 31 मे रोजी भारतात परतणार

0
14

>> सेक्स स्कँडल प्रकरण; एसआयटीसमोरही हजर राहणार

जवळपास तीन हजार अश्लील व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण गेल्या महिन्याभरापासून देशभर चर्चेत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर (जेडीएस) पक्षाची प्रतिमा वादात सापडली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हा विदेशात फरार झाला होता. अखेर काल त्याने एक व्हिडिओ जारी करत, 31 मे रोजी आपण भारतात दाखल होत एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावाही त्याने केला आहे.

जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील हसन मतदारसंघातील मतदानानंतर हे सगळे प्रकरण उघड झाले. प्रज्ज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनेच या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्ज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या आहेत. प्रज्ज्वल हा हसन लोकसभा मतदारसंघातून जेडीएसचा उमेदवार आहे. 26 एप्रिल रोजी लोकसभेच्या मतदानानंतर तो जर्मनीला गेला होता, त्यानंतर त्याचा नेमका ठावठिकाणा स्पष्ट झाला नव्हता. नुकतेच माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी स्वत: त्यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णावर कारवाई करण्याचे आवाहन तपास यंत्रणांना केले होते. तसेच, त्याला भारतात परत येण्याचेही आवाहन त्यांनी केले होते.

गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती. अखेर त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडली आहे. एसआयटीसमोर आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा मी प्रयत्न करेन, असेही रेवण्णाने या म्हटले आहे.

दरम्यान, एकीकडे हा व्हिडीओ संदेश व्हायरल झालेला असताना जेडीएसकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मी सहीसलामत बाहेर पडेन : रेवण्णा
मी स्वत: शुक्रवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहीन आणि तपासात सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आणि दाखल गुन्ह्यांना मी उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे. मला विश्वास आहे की माझ्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांमधून मी न्यायालयाच्या मदतीने सहीसलामत बाहेर पडेन, असे प्रज्ज्वल रेवण्णा या व्हिडिओ संदेशात सांगत आहे.