‘पेपर स्प्रे’प्रकरणी 5 विद्यार्थी निलंबित

0
22

>> संयुक्त बैठकीनंतर निर्णय; एका विद्यार्थिनीवर गोमेकॉ इस्पितळात उपचार

डिचोली येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘पेपर स्प्रे’ प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर 5 विद्यार्थ्यांना एका महिन्यासाठी काल निलंबित करण्यात आले. गुरुवारी अकरावीच्या वर्गात काही मुलांनी पेपर स्प्रे फवारल्याने 12 विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्या अत्यवस्थ बनल्या होत्या. आतापर्यंत 11 जणींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून, एका विद्यार्थिनीला गुरुवारी रात्री आणखी त्रास जाणवू लागल्याने बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती आता सुधारल्याचे सांगण्यात आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर, शालेय व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर सदर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी चौकशीअंती पाच विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे सांगितले. त्यात 4 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. एका महिन्यासाठी या पाचही जणांना निलंबित केल्याचे सरदेसाई यांनी सागितले. शिक्षण संस्थेच्या इमारतीत सर्वत्र सीसीटीव्ही आहेत. शुक्रवारी आणखी 22 नवे सीसीटीव्ही लावले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकाराबाबत विद्यालय व्यवस्थापन कडक भूमिका घेणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

यावेळी मनोज सावईकर यांनी ज्या वर्गात ही घटना घडली, त्याची पाहणी केली. सदर घटनेनंतर शिक्षण खात्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर काल शिक्षण खात्याचे पथक विद्यालयात दाखल होत त्यांनी सविस्तर माहिती व तपासणीही केली. दरम्यान, खासदार सदानंद तानावडे यांनी काल सकाळी या विद्यालयास भेट दिली आणि माहिती जाणून घेतली.

चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना
शिक्षण खात्याच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती सर्व पुरावे व तपशील तपासानंतर अहवालाद्वारे शिक्षण खात्याला सादर करणार आहे.