- डॉ. सोमनाथ कोमरपंत
महाभारताच्या शांतिपर्वात श्रीकृष्णाने ऐकविलेली ‘श्रीमद्भगवद्गीता’ हे भारतीयांसाठी युगानुयुगांचे आचार-विचारांसाठी पाथेय ठरले. श्रीकृष्णचरित्र असे अनेक लीलांचे, चमत्कारांचे, विक्रमांचे, बुद्धिसामर्थ्याचे आणि युगप्रवर्तन करणाऱ्या प्रज्ञावंताचे आहे. असे स्फटिकयुक्त व्यक्तिमत्त्व आम्हा भारतीयांना पूर्वकाळात लाभले म्हणूनच आमच्या विचारांचा वारसा श्रीमंत झाला.
वाल्मीकिप्रणीत ‘रामायण’ आणि व्यासप्रणीत ‘महाभारत’ हे भारतवर्षातील महान काव्यग्रंथ. भारतीय जीवनमूल्यांची जडणघडण होण्याच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे. युगधर्माचे आद्य प्रवर्तक म्हणून राम आणि कृष्ण हे ओळखले जातात. त्यांना देवत्व प्राप्त झाले आहे. ईश्वरी अवतार म्हणून त्यांना संबोधले जाते. आपल्या भारतीय परंपरेनुसार श्रीराम हा रामायणाचा अधिनायक. तो ईश्वराचा सातवा अवतार. त्याला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून ओळखले जाते. श्रीकृष्ण हा ईश्वराचा आठवा अवतार. त्याला ‘पूर्णावतार’ म्हटले जाते. मानवी प्रवृत्तींतील सर्व गुणविशेष श्रीकृष्णामध्ये सामावलेले होते. श्रीकृष्णाच्या अवताराच्या यशस्वितेचे गमक असे की हा असामान्य पुरुष श्रेष्ठत्व असून सदैव जनसामान्यांमध्ये वावरला. त्यांची दुःखस्पंदने ही आपली मानली. त्यांच्या सुखासाठी अहर्निश झटला. त्याची समाजमनस्कता देदीप्यमान स्वरूपाची. सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय व मानवता विरुद्ध अमानुषता यांच्या तुमुल युद्धात तो सदैव सत्य, न्याय आणि मानवता या मूल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याने जीवनाच्या अखंडित समरात ऋजुतेला, सात्त्विकतेला आणि सुजनत्वाला पाठीशी घातले. ‘अंतिम विजय सत्याचाच होतो’- ‘सत्यमेव जयते।’ या औपनिषदिक सत्याचा प्रत्यय आणून दिला. म्हणून भारतीय नररत्नांमधील तो ‘कौस्तुभ’ ठरतो. तो पूर्णपुरुष. युगंधर. मेधावी आमि मनस्विन्. त्याच्यासारखे निस्तुल, तेजोमय आणि पराक्रमी व्यक्तिमत्त्व अन्य नाही. त्या पूर्णपुरुषाचा जन्म श्रावणातील वद्य अष्टमीला झाला. तोही त्याचाच सख्खा मामा असलेल्या कंस या क्रूरात्म्याने कृष्णाच्या माता-पित्यांना मथुरेच्या कारागृहात ठेवले, तेव्हा झाला. विजनवासात त्याचा झालेला जन्म समष्टीच्या हितासाठी सार्थकी लागला. मध्यरात्रीच्या निशांत समयी या युगपुरुषाचा जन्म. जन्मतःक्षणीचे त्याचे तेज पाहून देवकी-वसुदेवाचे नेत्र दिपून गेले आणि पाणावलेही… आपल्या गतअर्भकांच्या दुःखातिरेकाने. पण वसुदेवाने मोठ्या धारिष्ट्याने यमुनेच्या डोहात उडी टाकून नंद-यशोदेच्या प्रेमळ पंखांखाली गोकुळात नवजात कृष्णाला ठेवले. कृष्णलीलांनी सारे गोकुळ आनंदाने बहरून गेले. गोकुळाच्या वास्तव्यात त्याच्यावर अनेक संकटे आली. त्यात देवादिकही होते अन् दैत्यही होते… देवादिकांना नमवून तळागाळातल्या कृषिवलांसाठी आणि गोपाळांसाठी प्रयत्नांचा गोवर्धन त्याने उभा केला… चाणूरादी दैत्यांचा वध केला. पुतनामावशीचा नक्षा उतरविला. कालियाचे मर्दन करून त्याला रसातळाला पोचविले. हे अचाट कर्तृत्व प्रकट करणारा हा बालकृष्ण लोकोत्तर पुरुष आहे याची प्रचिती गोकुळवासी जनांना त्याच वेळी आली होती… ज्यावेळी दुष्टाव्याने कंसाने अक्रूराला गोकुळात पाठविले… कृष्णाला पुनरपि मथुरेला नेण्यासाठी! त्यावेळी अख्खे गोकुळ विरहानलाने तप्त झाले… त्यांची अंतःकरणे हेलावून गेली… सुदामदेही गोकुळवासी जन आपला कृष्णकन्हैया, आपला जनार्दन पुन्हा कधी न भेटण्यासाठी निघाला होता, याचे शल्य त्यांच्या मनी होते.
ही ताटातूट अटळ असते… श्रेयसासाठी प्रेयसाचा त्याग करावा लागतो… दोन कुळांचे आनंदवर्धन करणारा भगवान श्रीकृष्ण आत्मप्रेरणेने गोकुळ सोडून मथुरेला निघाला होता. नियतीशी त्याने तसा करार केला होता.
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ‘माझे चिंतन’मध्ये ‘भगवान श्रीकृष्ण’ हा पल्लेदार, प्रभावशाली निबंध लिहिला आहे. श्रीकृष्णाची महत्ता अधोरेखित करणारा, निबंधशैलीच्या साऱ्या गुणवैशिष्ट्यांनी मंडित झालेला तो एक उत्कृष्ट निबंध आहे. त्यांनीच श्रीकृष्णाला उद्देशून महाभारतातील ‘कौस्तुभ’ म्हटले आहे. ते सर्वार्थाने योग्य आहे. समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ मणी हे एक मौल्यवान रत्न. तो श्रीविष्णूच्या कंठात विराजित झाला होता. श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाला उद्देशून ‘कौस्तुभ’ म्हणावे यात तार्किक सुसंगती आहे. परमेश्वराचा हा आठवा अवतार. श्रावणमासाच्या वद्य अष्टमीला पृथ्वीतलावर तो यावा हाही एक योगायोग. शेवटी ईश्वरी अवतार म्हणजे तरी काय? ढहश ळपलरीपरींळेप ळी पेींहळपस र्लीीं वशीलशपवरपलश ेष ॠेव रपव रीलशपवरपलश ेष ारप. म्हणूनच तर दैवी गुणांनी युक्त असलेला श्रीकृष्ण हा श्रेष्ठ पुरुष ईश्वरी अवतार ठरतो. महाभारताचा अधिनायक श्रीकृष्णच ठरतो. महाभारतीय युद्धात श्रीकृष्णाने पांडवांचा पक्ष स्वीकारला. अर्जुनासारख्या धुरंधर योद्ध्याचे सारथ्य त्याने पत्करले ते पूर्ण विवेकानिशी. त्यामागे भारतीय नीतिमत्तेची, परंपरेची आणि पुरुषार्थाची भक्कम बैठक होती.
परित्राणाय साधुनाम्। विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय। संभवामि युगे युगे॥
असा महाभारतीय युद्धाच्या समरप्रसंगाच्या समयी श्रीकृष्णाने या समर्थ वाणीचा उच्चार केला तो याच ध्यासापायी… याच धारणेने.
श्रीकृष्णाला दुष्टांचे पारिपत्य करायचे नव्हते; दुष्टपणाचा संहार करायचा होता. संक्षेपाने सांगायचे झाल्यास त्याला कंस, जरासंध, कालयवन आणि शिशुपाल इत्यादींचा निःपात करताना याच नीतीचा अवलंब करावा लागला. श्रीकृष्णाला समष्टीच्या सौख्यासाठी वावरताना सतत संघर्ष करावा लागला. स्वास्थ्यपूर्ण जीवन त्याच्या वाट्याला कधी आले नाही. कौरव-पांडवांच्या युद्धप्रसंगी कुलक्षय होऊ नये म्हणून समेट करण्याचे त्याने आटोकाट प्रयत्न केले. पण हेकेखोर दुर्योधन-दुःशासनप्रभृतीमुळे त्याला निर्वाणीच्या क्षणी ‘पांचजन्य’ शंख फुंकावा लागला. अमर्याद सामर्थ्य असताना त्याचा त्यांनी दुरुपयोग केला नाही. भारतवर्षाचा सम्राट होण्याची महत्त्वाकांक्षा त्याने कधी बाळगली नाही. तरी जनतेने त्याला शिरोधार्य मानले. यादवकुळ संघटित व्हावे, हे एकमेव उद्दिष्ट मनाशी बाळगून त्याने सोन्याची द्वारका वसविली. पण सिंहासनाचा हव्यास त्याने बाळगला नाही. लंकेचे साम्राज्य पादाक्रान्त केल्यावर रामाने तेथील सिंहासनावर बिभीषणाला अधिष्ठित केले. राम-कृष्णासारख्या निःसंग शीलवानांचे चरित्र आणि चारित्र्य असे सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी म्हणूनच ते भारतीय परंपरेला प्रकाश देणारे आदित्य होत. आपल्या संस्कृतीचे ते मानदंड होत.
डॉ. राममनोहर लोहियांसारखा बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि कृतिशील नेता राम आणि कृष्ण यांना भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठ पुरुष मानतो. आपल्या ‘जन-गण-मन’ या महत्त्वाच्या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे अवगाहन करून भारतीय इतिहासाची मांडणी करतो, याचा मथितार्थ आपण समजून घेतला पाहिजे.
श्रीकृष्णचरित्र हा आपल्या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा अभिन्न घटक आहे. संस्कृतीच्या मूलकेंद्राचा तो गाभा आहे. आपल्या भारतातील निरक्षर माणसांनादेखील रामायण-महाभारतातील घटना, घटनानुक्रम, त्यांतील मिथ्यकथा, व्यक्तिरेखा अन् त्यांचे सूक्ष्म स्वभावविशेष माहीत असतात. ‘आसेतुहिमाचल’ आणि कच्छ ते कामरूपपर्यंत रामनवमी आणि कृष्णाष्टमी हे उत्सव वेगवेगळ्या स्वरूपात साजरे केले जातात. यात विभूतिमत्त्वाचा वृथा गौरव नसून ही सद्गुणांची पूजा असते. हा आदर्शांचा गौरव होय. दुर्दैवाने आपल्याही देशात अलीकडे विघटनात्मक शक्ती प्रबल होत असल्याकारणाने वंशभेद, धर्मभेद, जातिभेद अन् भाषाभेद या चतुर्विध दोषांमुळे अभंग मने दुभंगू पाहत आहेत. ‘थोर पुरुषांचे या देशात काही खरे नाही’ असे म्हणण्याची पाळी आज आलेली आहे. दक्षिण भारतात रामायणकथा विपर्यस्त पद्धतीने सांगितली जाते.
सुदैवाने श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा मूर्धन्यस्थानी असलेल्या महाभारतात असे काही घडू शकले नाही. ‘व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम्।’ असे व्यासमहर्षींनी म्हटलेले आहे, ते तंतोतंत खरे आहे. ते जसे महाकाव्यस्वरूप आहे; तितकेच इतिहासप्रामाण्य त्यात आहे. हा ‘जय नावाचा इतिहास’ आहे. रामायणकाल आणि महाभारतकाल यात इतिहासदृष्ट्या कालानुक्रम सांगता येतो. म्हणूनच डॉ. इरावती कर्वे यांच्यासारख्या मानववंशशास्त्रज्ञाला आणि विदुषीला ‘युगान्त’मध्ये महाभारताची सुसंगत मांडणी करावीशी वाटली. व्यक्तिरेखांचा वेध घ्यावासा वाटला. दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या प्रकांड पंडित, रसज्ञ समीक्षक व विचारवंताला ‘व्यासपर्व’मध्ये मर्मदृष्टीने आणि काव्यात्म वृत्तीने महाभारतातील व्यक्तिदर्शनाचा धांडोळा घ्यावासा वाटला. ‘युगान्त’ आणि ‘व्यासपर्व’ या दोन्ही ग्रंथांतील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा अभ्यसनीय वाटते. काही विचारवंत लेखकांनी श्रीकृष्णाविषयी लिहिताना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून ‘कृष्णकारस्थान’, ‘श्रीकृष्णाची कुटिल नीती’ इत्यादी शब्दप्रयोग केलेले आहेत. परिस्थितिजन्य कारणांमुळे श्रीकृष्णाला चांगुलपणाच्या रक्षणासाठी अशी कणखर भूमिका स्वीकारावी लागलेली आहे. वार आणि प्रहार चुकविण्यासाठी प्रतिकारशक्ती विशिष्ट प्रसंगी कणखर बनवावी लागते. श्रीकृष्णाची धोरणे आणि धारणा यासंदर्भात वस्तुनिष्ठपणे पारखण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
- कठीणतम दिवसांत खडतर परिस्थितीत कारागृहात जन्मलेले बालक नंद-यशोदेच्या घरी स्वतःच्या माता-पित्यांच्या अनुपस्थितीत वाढते. रोप वाढायला माती, प्रकाश आणि वारा यांची आवश्यकता असते. वेळोवेळी खतपाणी करावे लागते, जलसिंचन करावे लागते, तेव्हाच ते वाढते. नंद-यशोदा लाभली नसती तर कृष्णाला कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले असते? त्यांनी या बाळाची आबाळ होऊ दिली नाही. यशोदामातेने कृष्णासाठी सर्वकाही केले. संस्कार केले. सर्व प्रकारचे लाड पुरविले. ‘कुणास्तव कुणी तरी’ असे झटणारे असते… म्हणून नराचा नारायण झाला… दीनदुबळ्यांचा तो कैवारी झाला… उत्तम योद्धा झाला… उत्तम सारथीही बनला… राजनीतिधुरंधर झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो योगेश्वर झाला. महाभारताच्या शांतिपर्वात त्याने ऐकविलेली ‘श्रीमद्भगवद्गीता’ हे भारतीयांसाठी युगानुयुगांचे आचार-विचारांसाठी पाथेय ठरले. श्रीकृष्णचरित्र असे अनेक लीलांचे, चमत्कारांचे, विक्रमांचे, बुद्धिसामर्थ्याचे आणि युगप्रवर्तन करणाऱ्या प्रज्ञावंताचे आहे. असे स्फटिकयुक्त व्यक्तिमत्त्व आम्हा भारतीयांना पूर्वकाळात लाभले म्हणूनच आमच्या विचारांचा वारसा श्रीमंत झाला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची चतुःसूत्री उलगडण्यासाठी गीतेचे नवनीत लाभले.
श्रीकृष्णाचे चरित्र आणि चारित्र्य महाभारताच्या सर्गांमध्ये गुंफले गेले. श्रीमद्भगागवतामध्ये श्रीकृष्णाचे समग्र चरित्रपट साग्रसंगीत पद्धतीने उलगडले गेले. साऱ्या भरतखंडात श्रीकृष्णाचे चरित्र दुमदुमू लागले. तेथून श्रीकृष्णस्तवनाची जी परंपरा सुरू झाली ती आजच्या गतिमान युगातही चालू आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व सांगणारा तत्त्ववेत्ता ही जशी श्रीकृष्णाची प्रतिमा आहे, तितकेच साऱ्या विश्वातील चिरंतन प्रेमाचे प्रतीक म्हणून राधाकृष्णाकडे पाहिले जाते. ते जितके वंदनीय तितकेच भारतीयांचे लाडके दैवत आहे. कारण ते माणसासारखे आहे. कुणाला त्याच्या हृदयापर्यंत जाता येते. मध्ययुगीन काळात म्हणूनच मीरा ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर’ असे धिटाईने सांगू शकली. चैतन्य महाप्रभूंनी ‘माझा निळा कृष्ण’ म्हणून बंगालच्या निळ्या समुद्रात जलसमाधी घेतली… भजन, कीर्तन, प्रवचन, नर्तन, काला, गौळण या सर्व प्रकारच्या कलाविष्कारांत ‘कृष्णधून’च प्रेमभराने आळविली गेली. कृष्णाची बासरी, कृष्णाच्या डोईवरचे मोरपीस, कृष्णाचे मित्रप्रेम आणि कृष्णाचे वनश्रीमध्ये रमणे या गोष्टी कौतुकाच्या, कुतूहलाच्या, जिव्हाळ्याच्या आणि मिथ्यकथांच्या स्वरूपातल्या झालेल्या आहेत. हे हिरव्या-निळ्या-जांभळ्या-किरमिजी अन् सोनेरी रंगांच्या विभ्रमांचे ‘मोरपीस’ भारतीयांच्या मस्तकी मिरवले जात आहे तोपर्यंत भारतीयांचे ‘भारतीयत्व’ अम्लान राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. मात्र त्यासाठी ‘दहीहंडी’मधील हुल्लडबाजी, सवंगपणा, थिल्लरपणा आणि शिरू पाहणारे विकृत प्रयोग डोळ्यांआड व्हायला हवेत. ‘श्रीकृष्ण’ हा केंद्रबिंदू कदापि ढळता कामा नये. इति अलम्।