पुन्हा मृत्यूचे तांडव

0
15

बाणस्तारीतील भीषण अपघाताच्या खुणा अद्याप पुसल्या गेल्या नसतानाच पर्वरीतील रस्त्यावर पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. चक्काचूर झालेले, रक्ताने माखलेले अपघातग्रस्त वाहन पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडावा. ऐन विशी – पंचविशीतील भावंडे या स्वयंअपघातात बळी गेली. त्या कुटुंबावर काय आपत्ती कोसळली असेल याची कल्पना आपण करू शकतो. अर्थात हा अपघात केवळ आणि केवळ वाहन प्रचंड वेगाने दामटल्याने चालकाचा ताबा सुटून झाला हे तर दिसतेच आहे. जेथे हा अपघात झाला तो रस्ता एकमार्गी आहे. त्यामुळे आणखी कोणी निरपराध व्यक्तींचा हकनाक बळी त्यात गेला नाही, अन्यथा आणखी कोणाच्या तरी जिवावर नाहक बेतले असते. सातत्याने होणारे हे अपघात गोव्यातील वाहतुकीतील बेशिस्त आणि वाहतूक विभागाची कमालीची अकार्यक्षमताच दर्शवीत आहेत. बाणस्तारीचा अपघात मद्यधुंद चालकाच्या बेफिकिरीतून झाला होता. पर्वरी अपघातातील चालकाची भरधाव वाहन दौडविण्याची मस्ती या अपघातास कारणीभूत ठरली. मुळात गोव्यातील रस्ते एवढ्या भरधावपणे वाहन चालवण्यासारखे आहेत का हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पर्वरीत जेथे अपघात झाला त्या परिसरात तर आजूबाजूच्या व्यवसायांच्या गिऱ्हाईकांची वाहने सदोदित भररस्त्यात बेशिस्तीने उभी असतात. मुख्य रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या छोट्या रस्त्यांवरून सतत बेफिकिरीने वाहने मुख्य रस्त्यावर आणली जातात. अनेकदा विरुद्ध दिशेनेही नेली जातात. ही सगळी वाहतुकीतील बेशिस्त माहीत असतानाही ह्या रस्त्याने एवढ्या भरधाव वाहन चालवण्याची ही बेफिकिरी संबंधितांच्या जिवावर उठली आहे. तरुण वय आहे, त्यामुळे थोडी बेफिकिरी असते वगैरे म्हणून ह्या बेजबाबदारपणाचे समर्थन करता येणार नाही. गाडीत असलेली मुले एवढीही कुकुली बाळे नव्हती. परंतु गोव्यात कोणाला ना वाहतुकीची शिस्त पाळण्याची गरज वाटत, ना कुणाला कायद्याचा धाक दिसत. त्यामुळेच सातत्याने हे भीषण अपघात घडत असतात. खरे तर गोवा हे देशातील सर्वांत छोटे राज्य. त्याच्या एकूणच महामार्गांची लांबी ती काय! परंतु ह्या महामार्गांचेही जर वाहतूक व्यवस्थापन वाहतूक पोलिसांना करता येत नसेल, तर त्याचा सरळसरळ अर्थ अकार्यक्षम व्यक्तींच्या हाती या विभागाचा कारभार आहे असाच होतो. काही दशकांपूर्वी गोव्यातील वाढते अपघात लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने हायवे पॅट्रोल सुरू केले होते. सुमो जीपगाड्या सतत महामार्गावर गस्त घालायच्या. परंतु पुन्हा सगळे सुस्तावले. अपघातांची मालिका मात्र सुरूच राहिली. सध्या बहुतेक शहरांमध्ये, प्रमुख महामार्गांवर एआय प्रणालीयुक्त कॅमेरे बसवलेले आहेत. एखादे वाहन भरधाव चालले असल्याचे ह्या कॅमेऱ्यातून रिअल टाइममध्ये दिसत असूनही ते रोखणारी एखादी यंत्रणा वाहतूक विभागाकडे असू नये? मग हे एआय कॅमेरे शोभेसाठी लावले आहेत काय? बाणस्तारीतील अपघातातील वाहनचालकाने तब्बल सात वेळा भरधाव वाहन चालवल्याने त्याला ई- चलन पाठवले गेले होते. त्याने त्यातले एकही चलन भरले नव्हते. एवढे असूनही आपले वाहतूक खाते एवढे सुस्त की त्याचा परवाना रद्द करण्याचे आणि दंडवसुलीचे पाऊलदेखील ह्या महाभागांनी टाकलेले नव्हते. बाणस्तारी अपघातानंतर खात्याच्या सुस्त अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. मद्यप्राशन करून कोणी वाहन चालवत असेल तर असे प्रत्येक वाहन थांबवणे शक्य नाही असे सरकार सांगते. मद्यप्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणी यावर्षी आतापावेतो 980 जणांना चलन दिले गेले आहे. हे प्रमाण जर एवढे मोठे असेल तर मानवी प्राण वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी भरधाव चाललेली वाहने अडवणारी यंत्रणा वाटेत उभी केलीच पाहिजे. येथे सरकारच्या अकार्यक्षमतेपोटी रस्त्यावर रोज रक्त सांडते आहे आणि आपले आमदार लेह लडाखला सहलीवर चालले आहेत. लेह लडाखमध्ये कसला अभ्यास करणार आहात? तिथल्यासारखे आपले डोंगर उघडे बोडके करायचा? आज एआय कॅमेरे, स्पीड रडारसारख्या यंत्रणांद्वारे जगभरात प्रभावीपणे वाहतूक व्यवस्थापन केले जाते. परंतु आपल्या वाहतूक विभागाला त्यापेक्षा रस्त्यावर लपूनछपून तालांव देण्यात खूप रस! त्यातली पर्यटकांची वाहने दिसली तर चांदीच. वाहतूक चलनाचे पैसे सरकारी खात्यात जाण्याऐवजी खासगी मोबाईल नंबरवर भरायला लावण्यापर्यंतचे प्रकार येथे घडले. एवढी बेफिकिरी आणि बेपर्वाई असेल तर या खात्याचा धाक जनतेवर राहणार कसा? आजवर रस्तोरस्ती झाले ते मृत्यूचे तांडव खूप झाले. राज्याच्या वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित यंत्रणा सरकारने तातडीने उभी करावी आणि रस्तोरस्ती चाललेले हे बळी थांबवावेत.