पीओके आपोआप भारतात सामील होईल

0
28

>> केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांचा दावा

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात कधी सामील होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी काल महत्त्वपूर्ण विधान केले. काही काळ थांबा; पीओके आपोआप भारतात सामील होईल, असे सिंह म्हणाले.

राजस्थानमधील दौसा येथे सिंह यांनी काल हे वक्तव्य केले. पीओकेमधील लोक भारतात सामील होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय आहे, यावर उत्तर देताना व्ही. के. सिंह यांनी पीओकेच्या भारतात विलीनीकरणाबाबत भाष्य केले. पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा, असे सिंह म्हणाले.

दरम्यान, या जी-20 परिषदेत जारी केलेल्या सामूहिक जाहीरनाम्यात भारताने मोठा विजय मिळवला असल्याचा दावाही व्ही. के. सिंह यांनी केला. युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर जग विभागले गेले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे आपण सर्वांनी मिळून एक मार्ग शोधून काढला. ज्यावर कोणत्याही देशाचा कोणताही आक्षेप नव्हता, असे सिंह यांनी म्हटले.

दरम्यान, काश्मिरी कार्यकर्ते शब्बीर चौधरीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत आहेत. पीओकेमधील शहरे आणि गावांमधील लोक अन्नटंचाई, गगनाला भिडणारी महागाई आणि उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या मोठ्या निषेधासाठी चौधरी यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.