पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे अशक्य

0
16

>> साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांची कबुली

पावसाळ्यापूर्वी राज्यातील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करणे सोपे काम नसल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त केले जावेत असा आदेश दिलेला आहे, असे पत्रकारांशी बोलताना नीलेश काब्राल यांनी सांगितले. मात्र, पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करणे हे काम जवळजवळ अशक्यप्राय असल्याचे काब्राल म्हणाले.

आम्ही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलेले आहे. मात्र, हे काम दिसते तेवढे सोपे नसल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. मात्र, तसे असले तरी आम्ही जास्तीत जास्त रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असेही ते म्हणाले. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त रस्ते कसे खड्डेमुक्त करता येतील याकडे लक्ष द्या, अशी सूचना खात्याच्या मुख्य अभियंत्यांना केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.