पाणीटंचाईमुळे भाजप सरकारची अकार्यक्षमता उघड : काँग्रेस

0
7

राज्यातील अनेक गाव व शहरांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईमुळे भाजप सरकारची अकार्यक्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव उघड झाला आहे, असा आरोप काल काँग्रेस माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.
नागरिकांना दररोज 4-5 तास पाणी देता येत नसेल, तर प्रशासन योग्य प्रकारे चालत नाही हे स्पष्ट होत आहे, असे विधान मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी केले होते, त्या विधानावर पणजीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘हर घर जल’ योजना राबवणारे पहिले राज्य ठरल्याबद्दल गोव्याचे अभिनंदन केले होते. याचा अर्थ गोव्यातील प्रत्येक घर हे नळाने जोडलेले आहे, असा होतो; मात्र पाणीच नाही, तर अशा नळजोडणीचा उपयोग काय, असा सवाल पणजीकर यांनी केला.
नगरपालिका, पंचायत, विधानसभा व लोकसभा अशा सर्व निवडणुकांच्या वेळी भाजप नेहमीच 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत असते; मात्र अकार्यक्षमता व गैरव्यवस्थापन यामुळे ही आश्वासने कधीच पूर्ण होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.