पाट अन्‌‍ ताट

0
17
  • प्रा. रमेश सप्रे

सहभोजनातून समतेची नि समरसतेची भावना निर्माण करताना सर्वांचे पाट नि ताटं एकमेकांना जोडून साखळीसारखे मांडलेले असतात. यात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे तथाकथित भेद वितळून जाऊन एक अभेद्य समाज निर्माण होतो.

पूर्वी चित्रपट आपल्या जीवनाची चित्रकथा रंगवून सांगत. त्यात खरे मनोरंजन असे अन्‌‍ जाता जाता उद्बोधन म्हणजे शिक्षणसुद्धा असे. समाजमनावर संस्कार घडवणे हा महत्त्वाचा उद्देश अनेक चित्रपटांचा असे. विशेषकरून मराठी चित्रपटांचा. सण-सोहळे-समारंभ यांतून संस्कृतीशी नाळ जोडली जायची. यासाठी चित्रपटातील प्रसंग, संवाद इतकेच काय पण गाणीही अर्थपूर्ण-भावपूर्ण असायची. आठवा बरं ते ‘भाऊबीज’ चित्रपटातलं गाणं. प्रसंग आहे बहिणीनं भावाला ओवाळण्याचा. प्रत्यक्ष आर्थिक समृद्धी नसली तरी परस्पर संबंधांची श्रीमंती अशा गीतातून दिसून यायची. हेच पहा ना-
चंदनाच्या पाटावर भाऊरायाला बसवून अत्यंत प्रसन्न वातावरणात- ज्यात संपूर्ण कुटुंब सामील झालंय- बहीण मूर्तिमंत आनंद बनून सात्त्विक भावानं म्हणते ः
‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी रे माया…’ सरळ शब्दातून व्यक्त झालेली सोज्वळ भावना! भाऊबहिणीतील मधुर संबंधांची दिवाळी! यातील ‘चंदनाचा पाट अन्‌‍ सोन्याचं ताट’ हे मानसपूजेतील पाट अन्‌‍ ताटासारखेच आहेत. कल्पक पण काल्पनिक नव्हेत. असो..

अशाप्रकारे सर्व कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होते पाट अन्‌‍ ताट. एखादा कवी सहज म्हणून जातो. कितीही गरीब कुटुंब असलं तरी तुम्ही दुपारी गेलात तर तुमच्यासाठी पाट मांडून ठेवलेला असेल अन्‌‍ त्याच्यासमोर प्रेमानं वाढलेलं ताट. ‘अतिथी देवो भव’ या हृद्य संस्काराचा भाग होता तो. आम्ही जेवतोय तेच तुम्हालाही देतोय अशी आपुलकीची भावना त्यात असायची.

जावयाला भेट देण्यासाठी सोन्याचांदीचं ताट परवडलं नाही तरी तांबडा-पिवळा-हिरवा या पवित्र रंगांचा, पोपट किंवा अन्य पक्षी यांची नक्षी असलेला पाट तरी दिला जाई.

‘ज्ञानेशो भगवान्‌‍ विष्णुः’ या भक्तिभावानं म्हटल्या जाणाऱ्या ज्ञानोबाच्या आरतीत ‘कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी’ असे चित्र डोळ्यांसमोर उभे केले जाते.

सहभोजनातून समतेची नि समरसतेची भावना निर्माण करताना सर्वांचे पाट नि ताटं एकमेकांना जोडून साखळीसारखे मांडलेले असतात. यात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे तथाकथित भेद वितळून जाऊन एक अभेद्य समाज निर्माण होतो.

काही व्यवहारिक कारणानं जर एखाद्याशी शाब्दिक वाद किंवा कडाक्याचं भांडण झालं की पू. गोंदवलेकर महाराज त्या व्यक्तीला आपल्या शेजारी पाट मांडून खास चांदीच्या ताटात जेवायला घालून मनात असलेली किल्मिषे, कटुता सारे दूर करीत असत. पाट अन्‌‍ ताटाचा असा उपयोग आपल्या सहजीवनात (केवळ सहभोजनात नव्हे) पूर्वी अनेकदा आढळायचा. आता मात्र स्वतःच्या कौटुंबिक जीवनातही हा अनुभव जणू लयाला गेलाय. पंगत मांडून खेळीमेळीनं जेवण्याचा आनंद उभ्यानं केलेल्या बुफेत कसा मिळणार?

इतिहासातली काही ताटं अमर झालीयत. समर्थ रामदासांना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलेली ताटभर सोन्याची नाणी (होन) निस्पृह समर्थांनी आसमंतात भिरकावली नि त्याच ताटात मूठभर माती, काही खडे, घोड्याची लीद नि एक प्रभुकृपेचा नारळ प्रसाद म्हणून दिला. शिवबाला या प्रसादाचा खरा अर्थ जिजामातेनं समजावून सांगितला तेव्हा धन्य वाटले. दुसरे ताट शिवरायांनी पाठवले होते संतब्रह्म तुकोबाला. सोनंनाणं, अलंकार, वस्त्रं यांनी भरलेलं ताट, कृतज्ञ भावनेनं नजराणा (भेट) पाठवलेलं ते ताट एकदा नव्हे दोनदा तुकोबानं ‘सोनेनाणे आम्हां मृत्तिकेसमान’ असं म्हणून परत पाठवलं होतं. धन्य ते संत सद्गुरू!

एक गमतीदार लोककथा. ‘लक्ष्मी नि नारायण यांत श्रेष्ठ कोण?’- हा प्रश्न नारदांनी विचारल्यावर स्वतः नारायण (विष्णू भगवान) पृथ्वीवर येऊन भागवत सांगू लागले. साहजिकच हजारो श्रोते ते ऐकायला येऊ लागले. काही दिवसांनी लक्ष्मी योगिनीचं रूप घेऊन त्या भागात आली. आपल्या व्रताचा भाग म्हणून अतिथींना यथेच्छ भोजन घातल्यावर ते बसलेले चांदीची फुलं असलेले चंदनाचे पाट नि सोन्याची ताटं, वाट्या इ. तिने घरी घेऊन जायला सांगितले. मग काय, सारी गर्दी लक्ष्मीकडे आणि साक्षात नारायणाच्या भागवतासाठी मोजकेच श्रोते जमू लागले. शेवटी लोकांना परमार्थाच्या पाठापेक्षा प्रपंचातली पाट-ताटंच मोलाची वाटली. असो.

‘पाट’ या शब्दाला इतर अगदी निराळे असे अर्थ आहेत. शेतमळ्यातील पाण्याचे पाट सर्वपरिचित आहेतच. पण डोक्याचे केस मधून-मधून कापून त्यांचे पाटही पूर्वी शिक्षा म्हणून काढले जात. असं विद्रुपीकरण भीमार्जुनांनी जयद्रथाचं नि कृष्णानं रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याचं केलं होतं. आज असे केसांचे पाट काढण्याची फॅशनच बनलीय. असो.

ग्रामीण भाषेत शेतातील उभ्या ज्वारी-मका अशा पिकांच्या कांडानाही ताट म्हणतात. अशी भरदार ताटं हिरवी असताना माणसांना खायला गोड लागतात, तर वाळल्यावर ती जनावरांचं खाद्य कडबा बनतात.

लग्नातला अंतरपाट मात्र वधुवरातील अंतर दाखवणारा नि ‘शुभमंगल सावधाऽन’ म्हटल्यावर ते अंतर दूर करणारा असतो. आजकाल लग्नापूर्वीच अंतर न उरल्यानं हा अंतरपाट (वस्त्र) नावापुरताच उरलाय. कालाय तस्मै नमः।

देवघरात देवांसाठी जसा देव्हारा असतो तसा उंच पाट म्हणजेच चौरंगही असतो. पाद्यपूजा करताना सद्गुरूंना किंवा त्यांच्या पादुकांना अशा चौरंगावर बसवलं जातं.

शेवटी एक शुद्ध भावाचा विशेष पाट. पू. मोरारीबापूंसारखे श्रीरामायण कथाकार प्रवचनाच्या आरंभी आपल्या आसनाच्या उजव्या हाताला काटकोनात एक पाट मांडतात. त्यावर रेशमी वस्त्र घालून फुलंही वाहतात. जिथं जिथं रामकथा किंवा रामनाम तिथं तिथं उपस्थित रामभक्त हनुमान या भक्तिभावानं हनुमंताला आवाहन करतात- ‘आईये, बिराजिये पवनसुत रामभक्त हनुमान।’ तो अमूर्त रूपात त्या पाटावर बसला आहे या श्रद्धेनं नमस्कार करून त्या दिवसाच्या रामकथेचा आरंभ करतात नि कथा संपल्यावर ‘जाईये, फिर आईये रामभक्त हनुमान’ असं नतमस्तक होऊन म्हणायला विसरत नाहीत. रामायणाचा ग्रंथही चौरंगावर ठेवलेला असतो. वक्त्याचं आसनही (व्यासपीठ) एक प्रकारचा पाटच असतो नि रामपंचायतनाची स्थापना केलेलं तबकही ताटच असतं. असा हा पाट अन्‌‍ ताटाचा महिमा!