पलायन

0
23
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

पलायन करताना लगेच निर्णय न घेता जरा थांबून दहादा विचार करावा. एकाच दिशेने विचार न करता दोन्ही दिशांनी विचारमंथन करावे. आहे ते सोडले व नवीन स्वीकारले तर कोणते फायदे असतील व कोणते तोटे असतील याचा चांगला ऊहापोह अंतर्मनात करावा.

पलायन करणे म्हणजे पळणे. आज माणसांमध्ये चिकाटी दिसत नाही. स्थितप्रज्ञपणे एकच काम वर्षानुवर्षे करण्याची प्रवृत्ती आज दिसत नाही. पाय घट्ट रोवून जिद्दीने एकच काम करत राहणे याला संयम आणि निर्धार खूप मोठा लागतो. जरासा त्रास झाला, जरासे कर्ज झाले, जराशी सतावणूक झाली की आजची माणसे त्या कामातून पलायन करतात.

मोहाचा भाग येथे फार मोठा असतो. एकाच क्षेत्रात असताना दुसऱ्या क्षेत्राचे रागरंग आपल्याला मोह पाडत असतात. आपल्या हातात जे आहे त्यापेक्षा आपल्या हातापलीकडे असलेले आमिष आपल्याला आकर्षक वाटते. कित्येकदा नंतर आपल्याला पश्चात्ताप होतो. पण एकदा हातातून गेलेले परत हातात येणे अशक्य असते. एकदा झालेली चूक कधीच सुधारता येत नाही. म्हणून माणसाने पलायन करताना लगेच निर्णय न घेता जरा थांबून दहादा विचार करावा. एकाच दिशेने विचार न करता दोन्ही दिशांनी विचारमंथन करावे. आहे ते सोडले व नवीन स्वीकारले तर कोणते फायदे असतील व कोणते तोटे असतील याचा चांगला ऊहापोह अंतर्मनात करावा.
निर्णयाची शेवटची व्याप्ती ‘होय’ किंवा ‘नाही’ अशी असते. निर्णय पक्का होण्याअगोदर त्या-त्या क्षेत्रातील जे धुरंधर आहेत त्यांचा सल्ला घ्यावा. आपल्या मनातील संशय मोकळेपणाने त्यांच्याशी स्पष्ट करावा. शंका विचारण्यात मागे-पुढे होऊ नये. कित्येकदा आपला भ्रम खोटा असतो किंवा भास अवास्तव असतो. खरे-खोटे चटकन उलगडत नाही. आपण अंतर्गत संघर्षाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतो. एवढे सगळे उपद्व्याप करूनदेखील आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही.
आपल्या विश्वासातील प्रामाणिक तसेच अप्रामाणिक मित्रांचे किंवा नातेवाइकांचे मत आपल्या निर्णयाशी जुळते का याचा अंदाज घ्यावा. जुळत असल्यास का जुळते व जुळत नसल्यास का जुळत नाही ही कारणे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे सगळे बाहेरचे आंदोलन आहे. आपल्या अंतर्मनातील आंदोलन हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या अंतर्मनाचा कौल हा शेवटी निर्णयाला जबाबदार असतो. सगळ्यांचे अभिप्राय ऐकून घेऊन शेवटी मनाचे मत स्वीकारणे हेच श्रेयस्कर असते. पहिल्यांदाच आयुष्यात नवीन काम स्वीकारताना पलायनवादाचा प्रश्नच येत नाही. जेव्हा आपण अंतर्गत बदल करत असतो तेव्हाच हा पलायनाचा प्रश्न येतो.
पहिल्यांदाच लग्नाच्या बोहल्यावर चढताना मनात कसलाच संघर्ष असत नाही. एकदा लग्न झालात म्हणजे पती-पत्नीची एकमेकांना सांभाळण्याची जबाबदारी असते. दोघांनी एकमेकाशी संपूर्णपणे प्रामाणिक राहणे अतिशय गरजेचे असते. मनात दुटप्पीपणा असून चालत नाही. कपट व लबाडपणा या शत्रूंना हद्दपार केलेलेच बरे.
आज जे घटस्फोट होतात त्यांच्या मुळाशी ‘पलायन’ हा सर्वात मोठा शत्रू मूळ धरून बसलेला असतो. स्त्रीची नजर दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषावर असते आणि पुरुषालाही दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीने मोह घातलेला असतो. कित्येक कारणे घटस्फोटाअगोदर स्पष्ट होत नाहीत; पण एकदा कायद्याने कोर्टातून विलगीकरण झाले की नंतर खरी कारणे उघडकीस येतात.

पलायन हे फारच गुंतागुंतीचे असते. ते बरे की वाईट हेही सोपेपणाने सांगता येत नाही. एका घरातून दुसऱ्या घरात माणसाचे पलायन होते. एका गावातून दुसऱ्या गावात पलायन होते. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पलायन करणारी माणसे आज आहेत. कित्येकदा खून, चोरी, दरोडे, अफरातफर, आर्थिक घोटाळे करून माणसे फरार होतात व पलायन करतात. कित्येक माणसांची शेवटपर्यंत ठाव-ठिकाणे मिळत नाहीत.

मोठमोठ्या संतांना सामाजिक छळामुळे कित्येकदा पलायन करावे लागले आहे. भगवान गौतम बुद्ध, संत नामदेव, महाकवी कालिदास या सर्वांनाच नेहमी फिरतीवर राहावे लागले. त्या पलायनाचा श्रेष्ठ अर्थ आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घ्यावा लागेल.
कार्ल मार्कस्‌‍ना त्यांच्या नवीन समाजवादी धोरणासाठी आयुष्यभर पलायनाचा आधार घ्यावा लागला. कित्येक विचारवंतांना आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी पलायनच करावे लागले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटताना आग्र्याहून पेटाऱ्यात बसून पलायन करावे लागले. केवढी भयानक जोखीम या पलायनात दडलेली होती याचा विचार करा. पलायन कधीकधी स्वसंरक्षणात्मक बनू शकते. कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी पलायन हे तंत्र वापरून आपले प्राण वाचवले हे विसरता येणार नाही. पलायन हा डावपेच कसा वापरावा हे आपल्याला कळायला हवे.