पर्वरीतील अपघातात तिघांचा मृत्यू

0
8

>> दोन महिला गंभीर जखमी

>> चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक

काल रविवारी (दि. 3) मध्यरात्रीनंतर पर्वरी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री दीड वाजल्यानतंर हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. टाटा निक्सन कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला.
कारमधील वेल्ड्रॉफ डिसोझा (हणजूण, 26), शॉन फर्नांडिस (पर्रा, 27) आणि आबीगेल डिसोझा (मेरशी, 21) यांचा जागीच मृत्यू झाला असून फियोना डिसोझा (22) आणि निनोष्का फर्नांडिस या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी (दि. 3) मध्यरात्रीनंतर पर्वरी पोलीस स्थानकात सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याचा संदेश आला. पर्वरी महामार्गावरील टीव्हीएस शोरुमलगतच्या झाडाला धडकून टाटा निक्सन कारचा (जीए 03 झेड 7790) चक्काचूर झाला. या कारमधून प्रवास करणाऱ्या पाच व्यक्तींपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हवालदार विवेक तोरस्कर यांनी अपघाताचा पंचनामा केला. जखमींना रात्रीच उपचारासाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्यामुळे वेगात असलेली कार झाडावर आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मेरशी येथे शॉन व त्यांचे कुटुंब एका कार्यक्रमाला आले होते. हा कार्यक्रम आटपून परत म्हापशाच्या दिशेने जात असताना पर्वरी येथे शॉनचा कारवरील ताबा सुटला आणि कारने उजव्या बाजूला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. यात चालक शॉनसह त्याचा भावोजी वाल्ड्रोफ डिसोझा व मावस बहीण आबेगल डिसोझा यांचाही मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोघी फियोना व निनोष्का या दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यूंत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्वरी येथे झालेला हा अपघात दारूच्या नशेत कार चालवताना झाला की नियंत्रण सुटल्याने झाला, याचा पोलीस शोध घेत आहेत.

वाढते अपघात चिंताजनक : आलेमाव

बाणस्तारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर काल पर्वरी येथे झालेल्या आणखी एका अपघातामुळे आणखी काही लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते अपघात चिंताजनक असून कायद्याची अमलबजावणी करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना अपयश येत असल्यामुळेच हे अपघात घडत असल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. पर्वरीतील भीषण अपघाताविषयी बोलताना त्यांनी, आता हे खूप झाले असून हे कुठेतरी थांबायला हवे असे त्यांनी सांगितले.

मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवण्याचे प्रकार राज्यात सुरूच असून त्यामुळेच हे भीषण अपघात घडत आहेत असा आरोपही आलेमाव यांनी केला आहे. काळ्या काचांच्या गाडीतून आरोपी मृतदेह घेऊन राज्याबाहेर जातात आणि पोलिसांना त्याचा पत्ताही लागत नाही, याला काल म्हणावे, असा प्रश्न आलेमाव यांनी केला आहे. बाणस्तारी येथे झालेल्या अपघातापासून भाजप सरकारने काहीही धडा घेतलेला नाही असे दिसत असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. तरूणांनी वाहने चालवताना जबाबदारीने वागावे. पालकांनीही त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावे, अशी मागणीही आलेमाव यांनी केली आहे.