27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

परीक्षांना कोरोनाचे ग्रहण

  • – विलास रामनाथ सतरकर

आताच्या परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. म्हणजे, परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आणि रद्द केल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या टप्प्यातच अडचण, अशी स्थिती आहे. यामुळे परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी केलेले विद्यार्थी निराश झाले आहेत. परंतु अशा स्थितीत परीक्षा रद्द न करता त्या पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य असाच आहे. या परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टीने जोखमीचे ठरू शकते.

कोविडच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात भयावह स्थिती निर्माण होत आहे. कोविड रुग्णांच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या संख्येने सर्वांनाच चिंताग्रस्त केले आहे. फक्त गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात काळजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. रोज ज्या वेगाने ही संख्या वाढते आहे ते बघता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाजही बांधता येत नाही. या महामारीमुळे वर्षभर मुलांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इ. ८ वीपर्यंतच्या मुलांनी वर्षभर शाळेत पाऊलही टाकले नाही. ऑनलाईन शिक्षणपद्धतीत जे शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न सर्वांनी केले आहेत. इ. ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येऊन प्रत्यक्ष शिक्षकांना भेटून शिकून घेण्याची संधी काही वेळापुरती का असेना, मिळाली आणि त्यामुळे १० वी व १२ वीच्या शालांत मंडळाच्या परीक्षांची तयारी थोडीफार करून घेता आली.

१० वी व १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
गोव्यातील एकूण सद्यस्थिती पाहता सरकारने दि. २४ एप्रिलपासून सुरू होणारी इ. १२ वीची परीक्षा व दि. १३ मेपासून सुरू होणारी इ. १० वीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबाबत विद्यार्थी व पालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. परंतु मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता सरकारचा आणि गोवा शालांत मंडळाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. ‘सीबीएसई’ने त्यांच्या १० वीच्या परीक्षा रद्द केल्या, तसेच १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या एका गटाला गोवा बोर्डानेही तसाच निर्णय घ्यावा असे वाटत होते.
विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप प्रयत्नपूर्वक अभ्यास केला आहे. गोव्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना तसेच पालकांना परीक्षा व्हाव्यात असेच वाटते. गेल्या जून महिन्यापासून ऑनलाईन माध्यमातून खूप कष्ट घेऊन या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. गोव्यातील बहुसंख्य शिक्षकांनी स्वतःचे व्हिडिओज, वर्कशीट, पीडीएफ, पीपीटीच्या माध्यमातून तसेच ‘गुगलमिट’ व ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात गुंतवून ठेवले होते. शिक्षकांना १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज नाही त्या ठिकाणचे विद्यार्थी रेंज कुठे मिळेल या शोधात फिरत होते व ज्या ठिकाणी रेंज मिळेल अशाच ठिकाणी बसून अभ्यास करत होते. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षक गावात जाऊन, विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शिकवत होते.

२१ नोव्हेंबर २०२० पासून इ. १० वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस सायन्स प्रॅक्टिकल्स घेण्याबरोबरच शाळेत प्रत्यक्ष शिकवणीलाही सुरुवात झाली. अनंत अडचणींना सामोरे जात, कोविडबाबतची सर्व खबरदारी घेत विद्यार्थी शाळेत येत होते. सकाळपासून दुपारपर्यंत तोंडाला मास्क लावून वर्गात बसत होते. अशा प्रकारे सर्व प्रकारची संकटे पार करत या विद्यार्थ्यांचे शाळेतील वर्ग अगदी मार्च महिन्यापर्यंत चालू होते. सर्व विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षासुद्धा दिल्या आणि ते बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाण्याच्या तयारीला लागले. परंतु मार्च महिन्यापासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत गेली आणि अखेर संपूर्ण देशभर एक भयावह चित्र निर्माण झाले.

द्विधा स्थिती
आताच्या परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. म्हणजे, परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आणि रद्द केल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या टप्प्यातच अडचण, अशी स्थिती आहे. यामुळे परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी केलेले विद्यार्थी निराश झाले आहेत. परंतु अशा स्थितीत परीक्षा रद्द न करता त्या पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य असाच आहे. या परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टीने जोखमीचे ठरू शकते.

परीक्षा घेणे आवश्यक
इ. १० वी व १२ वीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या दिशा ठरवण्यात या परीक्षा फारच महत्त्वाच्या आहेत. मुलांचे पुढील शिक्षण आणि नोकरी यादृष्टीने हे दोन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढील शिक्षणासाठी लागणारे बेसिक क्वालिफिकेशन किंवा टक्केवारी ही १० वी व १२ वीच्या निकालावर अवलंबून असते. सर्व विद्यापीठांचा प्रवेश हा १२ वीच्या निकालावर अवलंबून असतो व १२ वीचा प्रवेश हा इ. १० वीच्या निकालावर. त्यामुळे यादृष्टीने परीक्षा घेणे फार आवश्यक ठरते.
गोव्याची एकंदर भौगोलिक रचना बघता ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. ऑनलाईन वर्गाच्या वेळी बर्‍याच भागांत मोबाईल रेंज व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक वर्गात मुलांनी नक्कल करू नये म्हणून फार दक्ष असतात. कोणताही शिक्षक थोडासा सौम्य असेल तर त्याचा फायदा घेऊन मुलांनी नक्कल केल्याची आणि काही वेळा नक्कल करतानाच विद्यार्थ्यांना पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना ऑनलाईन परीक्षेत मुले नक्कल करणार नाहीत याची काय शाश्‍वती? जीवतोड मेहनत घेणार्‍या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय नाही का होणार? या कारणांस्तव ऑनलाईन परीक्षा घेणे व्यवहार्य ठरत नाही.

गेल्या वर्षीच्या अनुभवाचा उपयोग
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात इ. १० वीच्या परीक्षा घेतल्या होत्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोनाबाधित रुग्ण बरेच वाढले आहेत. पण गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षी भीतीचे वातावरण नाही हेही तितकेच खरे. गेल्या वर्षी कोरोनाबाबत लोकांना तितकीशी माहिती नसल्याने सर्वजण चिंतेत होते. त्यामुळे संपूर्ण देशभर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र गोवा त्याला अपवाद होता. गोव्यात परीक्षा नियोजन फारच चांगले केले होते. परीक्षा केंद्रांची संख्या वाढविणे, एका वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांना बसवणे, सामाजिक अंतर राखण्यासाठी स्वयंसेवक ठेवणे, प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांचे वर्गात प्रवेश करण्याआधी थर्मल स्कॅनिंग करणे, सॅनिटाईज्ड करणे अशा सर्वप्रकारच्या एसओपी पाळत परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या होत्या. शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ तसेच शाळा व्यवस्थापन या सर्वांनी सामूहिकरीत्या सर्व जबाबदारी पार पाडल्याने हे शक्य झाले. त्याच अनुभवाच्या आधारावर या वर्षीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे आणि त्यासंबंधीची सर्व तयारीही शालांत मंडळाने केली होती. या वर्षी मोठ्या प्रमाणात कोविडबाधित लोक आसपास असल्याने विशेष काळजी घेण्यासंदर्भातही नियोजन केले आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांनी स्वतः सर्व तालुक्यांत फिरून नियामक, उपनियामक आणि इतर संबंधित लोकांची बैठक घेऊन, यावर सविस्तर विचारमंथन करून आवश्यक ती काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

समाजाचे योगदान आवश्यक
आजच्या परिस्थितीत लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असल्याचे मत मा. पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी आहे. परंतु आज प्रत्येकाने आपण घरातून बाहेर पडताना, आपल्या कामा-व्यवसायाच्या ठिकाणी जाताना योग्य ती काळजी घेणे, सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक आहे. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नरत असणे आवश्यक आहे. जोपर्यंत हा कोविड रुग्णांचा वाढता/चढता आलेख थांबणार नाही तोपर्यंत परीक्षा घेणे शक्य होणार नाही; आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून समाजाने काळजीपूर्वक वागून कोविड नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. सर्व सामाजिक उत्सव, खाजगी उत्सव, खेळांचे सामने, पार्ट्या यांना आवर घालून, स्वतःवरच तशा प्रकारची बंधने घालून घेणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही समाजाची बांधिलकी आहे आणि म्हणून समाजाने संयम राखून वागणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा
इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलल्याने निराश न होता ज्या जोमाने अभ्यास सुरू होता, तोच जोम कायम ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारची निराशा मनात आणू देऊ नये. परीक्षा होणार आहे. आपण सर्व मुले अपार कष्ट घेऊन यात खूप मोठे यश संपादन करणार आहोत असे सकारात्क विचार मनात बाळगून त्याप्रमाणे दृढनिश्‍चयाने, अधिक जोमाने कार्यप्रवण व्हावे. कुठल्याही प्रकारची उदासीनता त्यांनी मनात आणू नये.

विद्यार्थी मित्रांनो, सातत्याने अभ्यास करत रहा. जो तुम्हास जास्त वेळ लाभला आहे त्याचा सदुपयोग करा. ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या पूर्ण करा. ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सांगतात की, ‘परीक्षा हा एक उत्सव’ आहे आणि सर्वजण मिळून तो साजरा करूया. या उत्सवाची तयारी जोरात चालू ठेवा. पालक व शिक्षक तुमच्या पाठीशी आहेत. कोविड महामारीचा विचार करू नका. आपल्या विचारातली सकारात्मकता वाढवा व जे ध्येय ठरविले आहे ते गाठण्याचा प्रयत्न करा.

परीक्षा होणे आवश्यक
उशिरा का होईना, परीक्षा होणे आवश्यक आहे. गोव्यातील सर्व विद्यार्थ्यांनी १० वी १२ वीच्या परीक्षांच्या दृष्टीने खूप मेहनत केलेली आहे. तसेच सर्व शिक्षकांनी वर्षभर खूप कष्ट घेऊन मुलांची तयारी करून घेतलेली आहे. म्हणून या सर्व मुलांच्या कष्टाचे चीज होण्यासाठी या परीक्षा होणे आवश्यक आहे. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत शाळेत येताना मुलांनी जबाबदारीने वागून सर्व कोविड नियमांचे पालन करत एक समजूतदारपणा व परिपक्वता दाखवलेली आहे. या विश्‍वासावरच परीक्षाकाळातही विद्यार्थी सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळणार हे निश्‍चित! आणि म्हणून गोव्यातील सध्याच्या स्थितीत सुधारणा झाल्यावर सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा व वर्षभर कष्ट केलेले विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची संधी द्यावी अशी सर्व पालक-शिक्षक व शिक्षणप्रेमींची अपेक्षा आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

गोव्यात कोरोनाचा थयथयाट!

प्रमोद ठाकूर ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने दणका दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली. यापुढे कोरोना महामारीबाबत निष्काळजीपणा नको. ‘जीएमसी’वरील रुग्ण...

मतदारांचा स्पष्ट संदेश

दत्ता भि. नाईक या निवडणुका म्हणजे केंद्रातील सत्ताधारी व सत्ताधारी बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍यांसाठी संदेश देणारी उपांत्य फेरी आहे....

‘कोविड-१९’चा रोजंदारीवर परिणाम

शशांक गुळगुळे दुसर्‍या लाटेने भारतातील फार मोठा गट आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. या लोकांसाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर साहाय्य...

कोरोनाचे संकट आणि देशातील अराजक

प्रा. विनय ल. बापट संकट मोठे आहे आणि आव्हानही मोठे आहे. यापूर्वीही भारताने अशा महामार्‍यांचा सामना केला आहे...

भारतीय सागरी हद्दीत अमेरिकेचे विनाशकारी जहाज

दत्ता भि. नाईक जे घडले ते वरकरणी साधे वाटत असले तरी दिसते तेवढे ते साधे प्रकरण नाही. एक...