पणजी मनपाचे मुख्य मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय ः महापौर

0
123

>>  लोकांकडून सामाजिक अंतराचे उल्लंघन

 

पणजी महानगरपालिकेचे मुख्य मार्केट खरेदीच्या वेळी नागरिकांकडून  सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

महानगरपालिकेचे मार्केट बंद असले तरी नागरिकांना शहरात भाजी विविध ठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे  नागरिकांची गैरसोय होत नाही. मनपा क्षेत्रात काही जणांकडून विनापरवाना भाजीची विक्री केली जात असल्याची तक्रार आहे. पणजीचे मार्केट सुरू केल्यानंतर सामाजिक अंतर न राखल्यास कोरोनाचा फैलाव झाल्यास त्याला महानगरपालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाणार आहे. यामुळे पणजीत नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणजी महानगरपालिकेचा मार्केटमधील महिनाभराचा सुमारे चार ते साडेचार लाखांचा महसूल बुडाला आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

मिरामार आणि मळा येथे दरवर्षी साचणार्‍या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. मिरामार ते बालभवन कांपालपर्यतच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केला जात आहे. मळा येथील दरवर्षीची पुराची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पणजी शहरातील गटारातील गाळ उसपण्यात आला आहे. आता, रायबंदर भागातील गाळ उसपण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील गाळ उसपण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

मनपाच्या पे पार्किंग ठेकेदाराला महिना किंवा जास्त काळासाठी पे पार्किंग शुल्कात सूट द्यावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे पे पार्किंग बंद करण्यात आलेले आहे, असेही मडकईकर यांनी सांगितले.