पणजीत 29 ऑगस्टला आयटकचा मोर्चा

0
5

>> किमान वेतनातील 100 रुपयांची वाढ अन्यायकारक : फोन्सेका

राज्य सरकारने राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात सात वर्षांनंतर अवघी 100 रुपये एवढी वाढ करुन या कामगारांची थट्टा केली असून, सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या 29 ऑगस्ट रोजी पणजीत एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काल आयटकचे राज्य सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल पणजीत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 100 रुपये वाढ ही अन्यायकारक असून, आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाहीत, असे फोन्सेका म्हणाले.

अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्हीसाठीचा खर्च हा आता आकाशाला भिडलेला आहे. अशा परिस्थितीत या कामगारांना 100 रुपये एवढी नाममात्र वाढ देऊन सरकार या लाखो कर्मचाऱ्यांची थट्टा करीत आहे, असे फोन्सेका म्हणाले. महत्वाचे म्हणजे ही वेतनवाढ 6 वर्षांच्या विलंबाने देण्यात आलेली आहे. 2014 साली जी वेतनवाढ मिळायला हवी होती ती मे 2016 साली देण्यात आली होती आणि 2020 साली जी वेतनवाढ द्यायला हवी होती, ती आता अडीच वर्षे विलंबाने देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यातील महागाई ही देशातील सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कामगार संघटनांनी अकुशल कामगारांना दिवसाला 750 रुपये, अर्धकुशल कामगारांना 825 रुपये, कुशल कामगारांना 910 रुपये, तर अतिकुशल कामगारांना 1000 रुपये एवढे वेतन देण्यात यावे अशी मागणी केली होती, असे फोन्सेका यांनी स्पष्ट केले.

गोव्यापेक्षा कमी महागाई असलेल्या दिल्ली व केरळ या राज्यात अकुशल कामगारांना 661, तर कुशल कामगारांना 980 रुपये प्रती दिन एवढे किमान वेतन मिळत आहे. गोव्यात या घडीला अकुशल कामगारांना 407 रुपये, अर्धकुशल कामगारांना 468 रुपये, तर कुशल कामगारांना 518 रुपये एवढे वेतन मिळत आहे. गोवा सरकारने आता जी वेतनवाढ दिलेली आहे, ती आयटक नाकारत असल्याचे फोन्सेका यांनी स्पष्ट केले.