पंढरीची वारी

0
24
  • मीना समुद्र

वारीत सारे समान असतात. उच्च-नीच भावाला तेथे स्थान नसते. साऱ्यांचे उद्दिष्ट एकच असते- विठूमाऊलीचे दर्शन! रखुमाईचे आशीर्वाद! वारीत ‘सेवा’ हा एकच शब्द मंत्रासारखा प्रभाव माणसाच्या मनावर करतो.

लेकीच्या एका मैत्रिणीचा पन्नासावा वाढदिवस म्हणून या विशेष वाढदिवसासाठी तिने रात्रीच शुभेच्छा संदेश पाठविला. सकाळी तिला धन्यवाद देऊन ती पंढरीच्या वारीत असल्याचे तिने कळविले. ती दोघं पतीपत्नी वास्कोच्या सड्यावरून निघणाऱ्या वारीत सामील झाली होती. मैत्रिणीचा हा विशेष वाढदिवस इतक्या वेगळ्या प्रकारे साजरा होत असल्याचे पाहून लेक हरखली. कितीतरी वर्षांपासून वारीत जाण्याची आमचीही इच्छा होती. थोडे अंतर तरी चालून वारी अनुभवणारी अनेक माणसे आसपास असतात. नातेवाइकातले कुणी ना कुणी तरी त्यात असते.
आषाढ लागण्याच्या आधीपासूनच भारतीय मनाला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे, विठूमाऊलीच्या दर्शनाचे. आषाढधारा बरसू लागल्या की या पाऊसकाळात मनाला हुरहुर लागते. आपले कुणी आप्तेष्ट पोटापाण्यासाठी दूर गेले असतील तर ते परतण्याचे हे वर्षाऋतूचे दिवस असतात. भेटीचा हा आनंद असतो. त्यामुळे निळे आकाश सावळे होऊ लागले की धरणीवरही झावळे झावळे वातावरण होऊन जाते आणि भक्तांच्या भेटीसाठी विटेवर अठ्ठावीस युगे तिष्ठणाऱ्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीची आस जिवाला लागते. आषाढाचा पहिला दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून सर्वत्र संगीत-नृत्य-नाट्य, काव्य-शास्त्र-विनोदाने साजरा केला जातो आणि आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधण्यासाठी गावागावांतून, घराघरांतून माणसे वारीला निघतात. कित्येक घरांतून हा वारीचा वसा परंपरागतरीत्या वर्षानुवर्षे पाळला जातो.
भक्तभागवत पायीच वारीला जातात. कुणी अनवाणी, कुणी काठी टेकत, कुणी कुणाचा हात धरून, अशी ज्येष्ठ मंडळीही असतात आणि तरुणही असतात. भक्तिभावाची दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन जाणारी ही युवापिढी पाहिली की एकप्रकारचा विश्वास वाटू लागतो. वारी हे सगळ्यात मोठे ऐक्याचे, प्रेमाचे, जवळिकीचे, पवित्र आचरणाचे स्थान असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपानदेव, नामदेव, मुक्ताई यांचा नामघोष करीत, त्यांचे अभंग गात, भजन करीत खांद्यावरून पालखी वाहत ही वारी चाललेली असते. पावसापाण्याची, उन्हातान्हाची पर्वा न करता पांढऱ्याशुभ्र धोतर-सदरा-टोपी अशा पेहरावात मंडळी दिसतात. पायजमा-सदरा घातलेले वारकरी असतात. कपाळी चंदनटिळा, बुक्का; गळ्यात तुळशीच्या माळा; हातात झांज, टाळ, चिपळ्या; मृदंग, एकतारी, वीणा अशी वाद्ये. नामघोष करीत, विठूनामाचा गजर करीत मोठ्या एकदिलाने, एकमनाने वारी चाललेली असते. नऊवारी लुगडी, नाकी नथ, कपाळी मळवट किंवा मोठा कुंकवाचा टिळा लावलेल्या कित्येक स्त्रिया डोक्यावर तुळशीवृंदावने घेऊन विठ्ठलनाम घेत, गाणी गात, नाचत, फुगड्या घालत वारीला आनंदाचे आणि पावित्र्याचे अनोखे रूप बहाल करीत असतात. आळंदी-देहू-नेवासे अशा ठिकाणांहून निघणाऱ्या पालख्या, घोड्यांचे रिंगण, सजवलेल्या बैलगाड्यांतून नेलेल्या मूर्ती, ग्रंथ यांचे दर्शन घेतले जाते. वारीची आपली म्हणून एक शिस्त असते. तिचे काही नियम असतात. जत्रेमध्ये सामील होणारे हौसे-नवशे-गवशे वेगळे. वारीत थिल्लरपणाला, छचोरपणाला स्थान नसते. किंबहुना ते पवित्र वातावरणच आपल्याला संपूर्ण भारून टाकते. तिच्या दर्शनानेही माणूस सुखावतो. माणसांचा एवढा मोठा सागर भावभक्तीने उचंबळून भीमेचे, चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी उत्सुक असतो. वारीत सारे समान असतात. उच्च-नीच भावाला तेथे स्थान नसते. साऱ्यांचे उद्दिष्ट एकच असते- विठूमाऊलीचे दर्शन! रखुमाईचे आशीर्वाद! वारीत ‘सेवा’ हा एकच शब्द मंत्रासारखा प्रभाव माणसाच्या मनावर करतो असे ‘महाराष्ट्राची माऊली’ या आदेश बांदेकरांच्या वारीच्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात एका सेवेकऱ्याने सांगितले. त्या व्यवस्थापकाचा हा शब्द वारीच्या वाटेवरच्या अनेक घरांनी, त्यातल्या माणसांनी अंगी बाणवलेला दिसतो. वारीतल्या वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाखाण्याची, त्यांच्या इतर काही गरजांची, एवढेच नव्हे तर त्यांचे चालून दमले-भागलेले पाय चेपून देण्याचीसुद्धा व्यवस्था हे सेवेकरी करतात. ही कुणी धनवंत, श्रीमंत, धनदांडग्या माणसांनी केलेली सोय नसते तर सर्वसामान्य माणसेच करत असतात. साधेपणा, आपलेपणा हा त्यांच्या अंगी जणू भिनलेला असतो. जनीच्या हाकेला धावून जाणारा, नामदेवाचा घास घेण्याचा हट्ट पुरविणारा, कान्होपात्रेला हृदयी धरणारा, दणळकांडण करणारा कष्टकरी, प्रेमळ विठुराया हा त्यांच्या अंगी भक्तिभावाने भिनलेला असतो. ‘माऊली’ अशीच हाक सर्वांच्या तोंडून येते ती विठूमाऊलीसाठीही आणि या वारकरी भक्तभाविकांसाठीही!
वारीचा मार्ग कधी खाचखळग्यांतून असेल तर कधी सरळ, कधी वेडावाकडा तर कधी अतिशय अवघड; पण वारीतले वारकरी ते कधी निसर्गसान्निध्यात, मोकळेपणी, निःसंगपणे, चालण्यात, एकमेकांशी नम्रपणे वागण्या-बोलण्यात मोठ्या आनंदाने पार करतात. ते सारे पाहताना आपणही अनुभवावे असे वाटतेच. त्यामुळे एकादशीला दाभोळीपासून ब्रह्मस्थळ बायनापर्यंत चालत वारी करण्याची कल्पना एका मैत्रिणीने मांडली तेव्हा सगळ्यांनी ती उचलून धरली.
कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते म्हणतात. तशी पुणे येथे माहेर असलेल्या पण लग्नानंतर आता परदेशी राहणाऱ्या माझ्या सुनेने यंदा बे एरिया कॅलिफोर्निया इथल्या विठ्ठल मंदिरात महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या विठोबावारीत वाटचाल केली. ‘आळंदी-पुणे वारीचा अनुभव घ्यायचा होता. आळंदी-पंढरपूर वारी तर जमणार नाही, मग इथेच वारीचा अनुभव घेऊन दुधाची तहान ताकावर भागवली’, असे तिने लिहिले ते त्यामुळेच. ‘इथेच माझे पंढरपूर’ अशी धारणा ठेवावी लागतेच माणसाला कधीकधी.