नैनितालला सफर

0
9
  • हर्षदा विश्वनाथ नार्वेकर (नार्वे, डिचोली)

अखेर तो दिवस एकदाचा उजाडला. आम्ही सर्वजण खूप उत्साहात होतो. मी, आई, बाबा, भाई या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. भाई एकदा म्हणाला, आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जाऊ. मला फार आनंद झाला. सगळीच खूप आनंदित झाली. भाई सहलीला जाण्यासाठी पर्यटन क्षेत्रे शोधू लागला. त्याला एक स्थळ खूप आवडले, ते म्हणजे उत्तराखंड राज्यातले नैनिताल (हिल स्टेशन) शहर, जे थंड हवेचे ठिकाण आहे व सुप्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. या गावाला नैनिताल हे नाव गावातील प्रसिद्ध नैनी तलावावरून पडले आहे. नैनितालच्या सभोवती हिमालयीन पर्वतरांगा आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते. आम्हा सर्वांना ते ठिकाण सहलीला जाण्यासाठी खूप आवडले.

भाईने हॉटेल्स, विमानाची तिकिटं, परतीची तिकिटं बुक केली. आम्हाला खूप उत्सुकता होती. आम्ही सर्व तयारीला लागलो. दोन महिन्यांअगोदरच आमची तयारी सुरू झाली होती. कपडे, काही वस्तूंची खरेदी… सगळं उत्साहात केलं आणि अखेर तो दिवस उजाडला. आम्ही सगळी विमानात पहिल्यांदाच बसत होतो, त्यामुळे ती उत्सुकता आम्हाला खूप होती. त्याचप्रमाणे भीतीही तेवढीच वाटत होती.

आम्ही सकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडलो आणि वास्को दाबोळी विमानतळावर पोहोचलो. विमानात बसण्याचा पहिलाच अनुभव खूप छान होता. उत्साह अगदी फसफसत होता. अखेर विमानाने धावपट्टी सोडून आकाशाच्या दिशेने झेप घेतली. मी विमानातून खाली बघत होते. जमिनीवरून आम्ही खूप उंचावर पोचलो होतो. उंचावरून जमीन छोटी छोटी होत होती. नद्या बारीक रेघा ओढल्यासारख्या दिसत होत्या. इमारती-रस्त्यांचा तर पत्ताच नव्हता. महाकाय डोंगरही वरून सपाट दिसत होते. आणि हळूहळू सर्वकाही नाहीसे झाले. आता आम्ही थेट ढगातून चाललो होतो. सर्वत्र ढगच ढग… आणि अचानक पुन्हा पृथ्वीचे दर्शन घडले. हळूहळू ते मोठे होत गेले. आम्ही बेंगलोर विमानतळावर पोहोचलो होतो. ते विमानतळ खूप सुंदर होते. आम्ही खूप फोटो काढले. तिथून आमचे दुसरे विमान होते. दोन विमानांमध्ये बसण्याचा आम्ही अनुभव घेतला. बेंगलोरवरून भारताची राजधानी दिल्लीला उतरणार होतो. दिल्लीला उतरता उतरता बाबा खाली ताजमहाल कुठे दिसतो का हेच शोधत होते. बाबा खाली सगळं बारीक बघत होते, पण आई मात्र एकदम थंडगार बसली होती. तिला भीती वाटत होती. मी आणि भाईने तिची खूप मस्करी केली. आम्हाला हसायलाच येत होतं. अखेर आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. भारताची राजधानी दिल्लीला आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. तिथून आम्ही बसमधून नैनितालला निघालो. बस खूप छान होती. नैनितालला आम्ही सकाळी पोहोचलो.

तेथील हॉटेलही खूप छान होते. आम्ही फ्रेश झालो आणि लागलीच फिरायला बाहेर पडलो. प्रथम आम्ही नैनी तलाव पाहिला, जो खूप सुंदर होता. नैनी तलाव म्हणजे पार्वतीच्या डोळ्याच्या आकाराचे तळे. आम्ही तळ्यातील बोटीत बसलो आणि खूप धमाल केली. मग आम्ही मॉल रोडला फिरलो. नैनितालचे मस्त पहाड पाहिले. चहाचे मळे पाहिले. आणि प्राणी संग्रहालयही पाहिले. तिथे खूप प्राणी होते जे आम्ही अगदी समोरून पाहिले. आणखीनही खूप ठिकाणी आम्ही फिरलो. फिरायला दोन मोटार बाईक घेतल्या होत्या, ज्या माझे बाबा आणि भाई चालवत होता. तिथे खूप थंडी होती. पण ती थंडी बोचरी नव्हे, अगदी गुलाबी वाटत होती. सारे अगदी आल्हाददायक वातावरण. त्या वातारणात आम्ही अगदी मुक्तपणे फिरलो. धूप धमाल केली. तिथले प्रसिद्ध असे चविष्ट पदार्थ खाल्ले. जसे की मोमोज आणि बरेच काही… दोन दिवस आम्ही तिथे राहिलो आणि मग सुखरूप घरी पोचलो. ही आमची नैनितालची सहल अवर्णनीय अशीच होती. ही सहल आमच्या कायम लक्षात राहील.