निसर्ग माझा सखा…

0
23

‘निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलं पाहिजे. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन राहायला पाहिजे. निसर्गाची सुखदुःखं समजावून घेतली पाहिजेत. जेव्हा निसर्गाची सुखदुःखं ही आपली सुखदुःखं होतात, तेव्हा एक आनंदयात्रा सुरू होते…’ पणजीत गेल्या आठवड्यात भरलेल्या पहिल्या बृहन्महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किरण पुरंदरे यांचे अध्यक्षीय भाषण-

ज्या गोव्याच्या भूमीवरून निसर्गाचं हिरवं बोट फिरलं आहे, ज्या गोव्याच्या भूमीला अथांग सागराचा जलस्पर्श झाला आहे, अशा गोव्यात मायमराठीचे गोडवे गायले जात आहेत ही किती आनंदाची गोष्ट आहे! मी आणखी एका गोष्टीमुळे भारावून गेलो आहे, ती म्हणजे, हा बाकीबाबूंचा गोवा आहे. मित्रांनो, आपण एका नितांत सुंदर अशा प्रदेशात आलो आहोत, हे मी तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मी महाराष्ट्रातला, देशावरचा माणूस असलो तरी माझ्या मनात गोव्याला एक वेगळी जागा आहे. शिंपल्यातील मोत्यासारखी.

मला वाटतं माझा जन्म निसर्गासाठी झाला आहे. मी एक नैसर्गिक निसर्गनिरीक्षक आहे. निसर्गाचा शिष्य आहे. माती, पाणी, झाडंझुडपं, किडेमकोडे, पशुपक्षी हे माझे गुरू आहेत. असा एकही दिवस जात नाही की माझे गुरू मला काही शिकवत नाहीत. मी निसर्गाची शिकवणी लावली आहे. त्याचा सहवास नसेल तर मी जगू शकणार नाही. मी भिंतींमधला माणूस नाही, हे मला माझ्या लहानपणीच कळले. तेव्हाच बाहेरची हवा लागली. मी पक्ष्यासारखा या हवेवर तरंगू लागलो…
पाखराशी प्रीत जडता
भरारलो त्याच्या सवे
फूल फुलता सावरीचे
गातसे त्याचेच गाणे ॥1॥
रात्र सरता जाग यावी
सूर त्याचे ओळखीचे
शिशिरातही रानभरी
इंद्रधनु भिरभिरते ॥2॥
सूर त्याचे सूर माझे
प्रेमरंगी नाहले
अर्थहीन आयुष्याचे
अर्थपूर्ण गीत झाले ॥3॥
आगळा मी बगळा मी
लखलखता मोर मी
गडद निळ्या नभांगणी
फडफडता जीव मी ॥4॥
सांज ढळता ओढ लागे
दूरातल्या कोटराची
फूल फुलले सावरीचे
भेट होता काळजाची ॥5॥
असे माझे मैत्र आहे
स्वप्न द्विजांचे नित्य पाहे
हृदयातील घरट्यात माझिया
चिवचिवणारी दोन पाखरे! ॥6॥
गरुडानं मला भरारी मारायला शिकवलं, तर टिटवीनं जमिनीवर पाय ठेवायला. गोड गळ्यानं गाणं गाता गाता पक्षी छान छान कामंही करतात. एका कीटकशास्त्रज्ञानं म्हटलं आहे की, या जगात जर पक्षीच नसते तर पृथ्वीचं वाळवंट झालं असतं. हे खरं आहे. कीटकांची हाव, त्यांची जन्मजात भूक हे सगळं आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. एकट्या भारतात जवळ जवळ 30,000 कीटकजातींची रीतसर नोंद करण्यात आली आहे. आणखी कितीतरी जाती सापडू शकतील. जगभरात कोलोरॅडो पोटॅटो बीटल या नावाच्या एका ढालकीटकाच्या 20,000 जाती आहेत. जर या कीटकाची एक जोडी सगळ्या प्रकारच्या धोक्यांपासून, नियंत्रणांपासून सुखरूप अशी वाढवली तर एका हंगामात ती 6 कोटी एवढी होईल. एक अळी तिच्या एकूण वजनाच्या दुप्पट पानं फक्त एका दिवसात खाते. परवाच आपल्या राजस्थानात टोळधाड आल्याची बातमी वाचली. हे टोळ जे हिरवं दिसेल ते खाऊन टाकतात. टोळाची मादी जमिनीखाली एक मातीची लंबगोलाकर कुपी किंवा डबी तयार करून त्यात अंडी घालते. एका कुपीमध्ये सुमारे 100 अंडी असतात. अशा अनेक कुप्यांमध्ये एकाच मादीकडून अंडी घातली जातात. दक्षिण अफ्रिकेतील सुमारे 1300 हेक्टर एवढ्या आकाराच्या एका शेतात फक्त एकदा खोदाई केल्यानंतर 14 टन एवढी टोळांची अंडी गोळा करण्यात आली. त्या अंड्यांपासून सुमारे 125 कोटी एवढ्या टोळांची निर्मिती झाली असती. मुग्धबलाक हा एक प्रसिद्ध टोळनाशक पक्षी आहे. आपल्या देशात सैबेरियातून स्थलांतर करून येणारा ‘भोरडी’ हा पक्षी त्याच्या पिल्लांना मुख्यत्वेकरून टोळच खायला घालतो. पुष्कळसे पक्षी अंड्यांमधून बाहेर आल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या वजनापेक्षा जास्त अन्न एका दिवसात खातात. एका जर्मन पक्षीशास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार ‘वल्गुली’ या चिमणीएवढ्या पक्ष्याची एक जोडी आणि त्याची प्रजा एका वर्षात कमीत कमी 12 कोटी किड्यांची अंडी किंवा 1,50,000 अळ्या आणि पीलव फस्त करते. मी स्वतः सुबाभळीच्या एका झाडावर राखी वटवट्या नावाचा एक पक्षी एका मिनिटात कमीत कमी 50 वेळा टोचा मारून हिरवे तुडतुडे खाताना बघितला होता. राखी वटवट्यासारख्या इतर छोट्या पक्ष्यांनी कीटकांची लागण झालेल्या या झाडावर आपली पोटपूजा केली नसती तर कदाचित ते झाडच जिवंत राहिलं नसतं. पक्षी किती मोठ्या प्रमाणात कीटकांचा नाश करून निसर्गाचं संतुलन राखतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल.
घुबड, ससाणा, श्येन आणि इतर कितीतरी जातींचे शिकारी पक्षी घरातल्या आणि शेतातल्या उंदरांवर नियंत्रण ठेवतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नियंत्रण नैसर्गिक असतं. आपण विविध प्रकारच्या विषारी पदार्थांचा वापर करून आणि त्यांच्या निर्मितीत प्रचंड पैसा खर्च करून उंदरांसारखे प्राणी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते मरत असले तरी तो विषार अन्नसाखळीतून कायमचा नष्ट होत नाही. कारण विष घालून मारलेला उंदीरही पुढे कुणीतरी खातच असतं. त्यामुळे मूळ प्रश्न सुटल्यासारखा वाटला तरी त्याचे दुष्परिणाम वाढतच राहतात. आपल्या शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान करून हे उंदीरमामा थांबत नाहीत, तर माणसाच्या जिवाला घातक अशा रोगांचा प्रसार करतात. एक उंदराची जोडी जर वर्षभर पाळली आणि तिच्यापासून निर्माण झालेली पिलावळ जर कोणत्याही बाह्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवली तर वर्षाच्या शेवटी त्यांची संख्या सुमारे 900 एवढी होईल. (यामध्ये दोन उंदीर आणि त्यांची प्रजा आणि त्यांची प्रजा असा हिशेब आहे.) आपल्याकडे अवघ्या महाराष्ट्रात आणि गोव्यात गव्हाणी घुबड नावाचा एक पक्षी मनुष्यवस्तीत राहतो. त्याची आणि धान्यकोठारांमधून बाहेर पडणाऱ्या उंदरांची वेळ एकच. गव्हाणी घुबड हा एक अत्यंत उपयुक्त पक्षी असून त्याचं मुख्य अन्न उंदीर आहे. मग कल्पना करा, गव्हाणी घुबडाने आठवड्याभरात एक उंदराची जोडी जर खाल्ली तर अप्रत्यक्षरीत्या पुढे जन्मणाऱ्या किती उंदरांचा नाश झाला असेल? त्यामुळे केवढे तरी आर्थिक नुकसान वाचू शकेल. कितीतरी भुकेल्यांना अन्न मिळू शकेल. भारतातील एकूण धान्य उत्पादनापैकी सुमारे 15 ते 18 टक्के धान्य उंदरांकडून दरवर्षी फस्त होतं. या अन्नावर सुमारे 10 कोटी लोकांची पोटं भरू शकतील.

एक म्हैस मेली आणि ती तशीच टाकून दिली तर काय होईल? ती कुजेल आणि सगळीकडे दुर्गंधी सुटेल. कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली की हजारो जीवजंतू जन्म घेतील. ते पाण्यात जातील, मातीत शिरतील, वनस्पतींवर हल्ले करतील, हवेत पसरतील. पण निसर्गप्रक्रियेत ही मेलेली म्हैस अथवा कुठलाही प्राणी तसाच पडून राहत नाही. तिथे कोल्हा, कुत्रा, तरस असे प्राणी येतात आणि आपलं पोट भरतात. या प्राण्यांबरोबरच कावळे, ससाणे, घारी, सुपर्ण किंवा भुऱ्या गरुड आणि गिधाडं तिथे हां हां म्हणता जमतात आणि अक्षरश: काही मिनिटांच्या अवधीतच तिथे म्हशीचा सांगाडा दिसू लागतो. दुष्काळात शेकडो जनावरं भुकेपोटी तडफडून मरतात आणि तशीच फेकून दिली जातात. येथे गिधाडांची भूमिका फार महत्त्वाची असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, माणूस कधी गिधाडांचा विचार करत नाही. त्यांच्या संरक्षणाची किंवा संवर्धनाची तर गोष्टच सोडा.

काळटोप हळद्या हा पक्षी केवळ तीन मिनिटांत घाणेरीची 77 फळं खाताना पक्षीनिरीक्षकांनी पाहिला आहे. पक्ष्यांच्या पोटातील पाचकरसांचा परिणाम न होता फळांच्या बिया पचनमार्गातून पुढे सरकत शेवटी त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. माणसाने लावलेल्या झाडांपेक्षा त्या चांगल्या रुजतात. अशा प्रकारे संपूर्ण भारतात घाणेरी किंवा टणटणी या मूळ मेक्सिकन वनस्पतीचा प्रसार होण्यात बुलबुल या पक्ष्याचा फार मोठा वाटा आहे, हे आता सिद्ध झाले आहे. अशा कितीतरी वनस्पती पक्ष्यांमुळे पसरत असतात. नैसर्गिक वनांमध्ये होणारी त्यांची वाढ आपल्या चटकन्‌‍ लक्षात येत नाही, इतकंच.

माझ्या पुण्यातील घराजवळ रवींद्र म्हात्रे पुलाच्या आधारभिंतीवर सुमारे 22 वर्षांपूर्वी चिऱ्यांशिवाय काहीही नव्हतं. पण आज तिथे चिरे दिसत नाहीत इतकी झाडं वाढली आहेत. वड, पिंपळ, टणटणी, बाभूळ, काटेसावर, कडुनिंब, एरंड, रुई, सुबाभूळ, पांगारा, कांचन अशी किती नावं घ्यावीत? मला माहीत आहे की, पक्ष्यांशिवाय वारा, कीटक, वाघळं आणि पाळीव जनावरांमुळेही यातील काही जणांचा प्रसार झाला आहे. पक्ष्यांचा मोठा वाटा असलेल्या या निसर्गनिर्मित झाडोऱ्याचं मला कौतुक वाटतं. तांबट, कोकीळ, बुलबुल, मैना या पक्ष्यांच्या कामगिरीमुळेच म्हात्रे पुलाची आधारभिंत आज अनेक झाडांनी सजली आहे.

पाणकावळे, पाणकोळी आणि गॅनेटसारख्या सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून उत्तम खत तयार होतं. पेरू या देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर ठराविक दिवसात हजारो पाणपक्षी जमा होतात. हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विष्ठेचं संकलन केलं जातं. परंतु अशा प्रकारच्या प्रयोगाची शक्यता आपल्या देशात पडताळून पाहिली गेलेली नाही.
जेव्हा शिंजीर किंवा चश्मेवाला हा पक्षी एखाद्या धायटीच्या केशरी रंगाच्या फुलातला मधुरस पितो, तेव्हा त्याच्या कपाळाचा किंवा गळ्याचा भाग पुंकेसराला लागतो. अशा वेळी परिपक्व झालेल्या परागकणांची पावडर त्याच्या पिसांना चिकटते. दुसऱ्या फुलातील मकरंद पिताना हे परागकण पक्षी फुलाच्या स्त्रीकेसरापर्यंत वाहून नेतो. परागकण स्त्रीकेसरावर पडले की फलन होते. बी तयार होते. परागीभवन करून वृक्षांच्या सशक्त पिढ्यांची परंपरा चालू ठेवण्याचे महत्त्वाचे काम पक्षी करतात. पर्यावरणासाठी पक्षी जी काही मोलाची कामं करतात त्यांचा आपण विचार केला. पण त्याही पलीकडे पक्षी हे आपल्यासाठी निर्व्याज आनंदाचा आणि अप्रतिम सौंदर्याचा ठेवा आहेत. फक्त एकच कल्पना करा की पक्षी नसलेलं आभाळ कसं दिसेल?
या जगात जन्माला येणारे प्रत्येक मूल हे जन्मतःच निसर्गप्रेमी असते. ते निसर्गवादी असते. ते आपोआप निसर्गाचीच बाजू घेते. त्याला ‘ही बघ माती, याला पाणी म्हणतात बरं का’ हे सांगावं लागत नाही. एखाद्या ओढाळ वासरासारखं त्याचं मन रानावनाकडे ओढ घेत राहतं. पायांना एखाद्या ओढ्याचं पाणी लागलं की त्याच्या चेहऱ्यावर फूल फुलतं.

आईचं बोट सुटलं की ते काळ्या आईचं बोट धरतं. पण पुढे केवळ जगण्यासाठी त्याला ही वाट सोडावी लागते. ती वाट सुटली की मातीत खेळणारे त्याचे हात पोट भरण्याच्या कामात गुंतून राहतात. पुढे थेट निवृत्तीनंतर किंवा अधेमधे प्राणवायूची नळी लावायची वेळ आली की त्याला निसर्गाची कडकडून आठवण होते. निवृत्तीनंतर खिशात भरपूर पैसे असतात, पण तोपर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत देहबोलीकडे चक्क दुर्लक्ष केल्यामुळे, निसर्गाची हाक न ऐकल्यामुळे शरीर साथ देत नाही. हातपाय चालत नाहीत. दरम्यानच्या काळात त्याच्या वाटेला निसर्ग येतो, पण ताटात कोशिंबीर असते ना तेवढाच! जगरहाटी सोडून हे मूल सख्या निसर्गाकडे नेणारी वाट चालत राहिलं तर त्याचं जगणं म्हणजे आनंदाचं झाड होईल. निसर्ग त्याचा सांभाळ करेल. मुलांना उंबरठा ओलांडू दिला की निसर्ग त्यांचं पालकत्व स्वीकारेल. मुलांची रानावनांकडे जाणारी वाट अडवली नाही तर ही मुलंच रानावनांचे पालक होतील. एखादा कंत्राटदार करवती घेऊन झाडं तोडायला आला तर झाडांना मिठ्या मारतील. मुलांची निसर्गाकडे नेणारी वाट अडवली की बांबू तोडून तयार केलेल्या कागदावर छापलेल्या ‘आपली नैसर्गिक साधनसंपत्ती’ या धड्यात ती वाचतात- ‘आपल्याला बांबूपासून कागद मिळतो.’

माणूस हा निसर्गाचाच एक घटक आहे हे रानोमाळ हिंडणाऱ्या रामोशांच्या, कातकऱ्यांच्या, वारल्यांच्या आणि गोंडांच्या मुलांकडे बघून कळतं. ही मुलं जगण्याचे धडे शाळेत शिकत नाहीत. रानव्यात शिकतात. धावणाऱ्या पाटाला बांध घातल्यासारखं त्यांना हाताला धरून ओढत ओढत शाळेत नेलं जातं. शहरानगरांमध्ये जाऊन कसं जगायचं हेदेखील न शिकवता त्यांची थेट आभाळाखाली जगण्याची कला मारली जाते. ही मुलं शाळेत न जाता मोठी होतात. शहाणीसुरती होतात. मोहाच्या झाडाची फुलं गोळा करतात. झाड तोडत नाहीत. व्याज वापरतात, मुद्दल तशीच ठेवतात. आपले आदिवासी बांधव कुठे राहतात ते एका नकाशावर मांडलं आणि निसर्गसमृद्ध प्रदेश कुठे आहे हे दुसऱ्या नकाशावर मांडलं आणि दोन्ही नकाशे एकमेकांवर ठेवले तर जवळजवळ तंतोतंत जुळतात. आदिवासींनी किंवा निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या जनजातींनी कधीही निसर्गाचा सरसकट नाश केला नाही. याचा अर्थ, ते दैनंदिन जीवनात निसर्गाचा वापर करत नाहीत असं नाही. ते निसर्गाचा वापर करतात म्हणून निसर्ग वाचवतात.

निसर्गात राहून, निसर्गाच्या वाट्याला जाऊन पैसे मिळत नाहीत असं बऱ्याच पालकांना वाटतं, म्हणून ते मुलांना निसर्गपुत्र होण्यापासून वंचित ठेवतात की काय? आपली शहरं अष्टबाहूच्या भुजांसारखी पसरत आहेत. शहरं निसर्गाची शत्रू आहेत. गरज आणि वखवख यात फरक आहे. शहरात वखवख आहे. वखवख वाढली, हाव वाढली की घाव वाढतात. हाव भागवली गेली तरी चेहऱ्यावर आनंद दिसेलच असे अजिबात नाही. कमरेला सतत पैसे नसले तरी आदिवासी बांधव छान मनमोकळे हसतात. कारण त्यांना निसर्गाचा स्पर्श झालेला असतो. याचा अर्थ, शहरांमध्ये राहणारे लोक निसर्गप्रेमी नसतात किंवा त्यांना निसर्गाच्या संवर्धनाची इच्छा नसते असे नाही. पण एकंदरीतच, सध्या त्यांची अवस्था एकाच झाडावर बसलेल्या शंभर गरुडांसारखी झालेली आहे. प्रत्येक गरुड स्वतःचा मुलुख प्रस्थापित करण्याची किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर स्वतःची कर्मभूमी शोधून काढण्याची क्षमता बाळगून आहे. पण अनेक कारणांमुळे एकही गरुड झाड काही सोडत नाहीये. या गरुडांनी झाड सोडलं तर आपल्या देशातील निसर्गसंवर्धन यशकथांची व्याप्ती आणि संख्या वाढेल.

निसर्ग अंतप्राप्त आहे. स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीनं तो माणसाच्या समोर एक प्रकारे असहाय आहे. गवतुरीवर चूळ टाकली तरी तिची पाती डोलतात आणि वाऱ्याची झुळूक आली तरी डोलतात. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, म्हणून निसर्गाप्रती आपली जबाबदारी खरं तर वाढली आहे. निसर्गातील संवेदनांची जाणीव झाली की त्याच्या संवर्धनाच्या वाटा मुद्दाम शोधाव्या लागत नाहीत. त्या आपोआप सापडतात. निसर्गाच्या संवेदना जाणणारा माणूस पदपथावर पडलेली प्राजक्ताची फुलं चुकवत चुकवत चालतो. किड्यामकोड्यांना, पक्ष्यांना खाद्य मिळतं म्हणून परागकण किंवा मकरंद असलेली जास्वंदीची फुलं देवपूजेला वापरत नाही. निसर्गातील संवेदनांची जाणीव व्हावी म्हणून त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्याच्यावर वेड असल्यासारखं प्रेम असावं लागतं. माणूस म्हणून आपण कसंही वागलो तरी निसर्ग कधीही शिक्षा करत नाही किंवा आपल्या पाठीवर कौतुकाची थापही मारत नाही. तो फक्त परिणाम दाखवतो.

निसर्गात काहीही वाया जात नाही. सुमारे 900 किलो वजनाचा गवा किंवा रानहल्या जर मृत्युमुखी पडला तर निसर्गातील सफाईकर्मी आघाडी उघडतात. टकाचोर पक्षी, डोमकावळा, गिधाड, मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, रानकुत्री आणि कधी कधी एखादा भुकेला बिबट्या किंवा वाघदेखील आपला वाटा उचलतो. सुमारे महिनाभराच्या काळात तिथे जवळजवळ काहीही शिल्लक राहत नाही. ही व्यवस्था कमालीची चोख आहे. गेली लाखो वर्षं बिनबोभाटपणे सुरू आहे. आपलं अन्न निसर्गातून येतं. ताटात वाढून घेतलेलं किंवा आपल्याच अनुमतीनं कुणीतरी ताटात वाढलेलं सगळं अन्न आपण खाऊन संपवतो का, हा प्रश्न स्वतःला विचारावा. लग्नसमारंभात आपलं जेवण झालं, की ताटं ठेवण्यासाठी जे घंगाळ वापरतात त्यात जरा डोकावून बघा.
अति भोजने रोग येतो घराला
अन्न त्यागता कष्ट होती जिवाला
फुका सांग अन्नास का नासवावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे
आपण जर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांशी एकरूप झालो, त्यांच्याशी मैत्री केली तर आपल्या उपजत जाणिवांना, सहजप्रेरणांना चांगली धार येते. आपल्याला भूक लागली की काहीतरी खावंसे वाटते. जे खावेसे वाटते, ते खाल्ले तर अंगी लागते. तर याबाबत मला असं म्हणायचं आहे की आपण जर खऱ्या अर्थी निसर्गाशी एकरूप झालो, तर काय खायचं हेसुद्धा आपला आतला आवाज सांगतो. आपली निवड नैसर्गिक बनते. निसर्गाशी एकरूपता साधली की दैनंदिन व्यवहारातील गोष्टीसुद्धा आपोआप वेळेत घडतात. अशा वेळी कृत्रिम गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही. दिशांचंही तसंच होतं. अशी एकरूपता, तल्लीनता निसर्गाच्या सहवासामुळे येते.
भात खाणाऱ्या प्रत्येक माणसाने भाताच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे चिखलाने भरलेले पाय मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजेत. डोळ्यात पाणी नाही आलं तर मला सांगा. कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याच्या पायांचा जवळून फोटो काढून, तो चांगला मोठा करून प्रत्येक स्वयंपाकघरात लावला पाहिजे. आपण जर अन्न वाया घालवत असलो, तर स्वतःला निसर्गप्रेमी म्हणवून घेऊ नये. आपण अन्नाचं संवर्धन करू शकत नसलो तर निसर्गाचं काय संवर्धन करणार? आपल्या मनात आपल्या कृषिवलांच्या प्रती, निसर्गाच्या प्रती कणभर जरी आदर असता तरी आपण अन्न वाया घालवलं नसतं. आपण पैसे देऊन अन्न विकत घेतो, म्हणून ते वाया घालवतो. आपण जर स्वतः कष्ट करून, शेतात राबून भात पिकवलं तरच त्याची खरी किंमत कळेल. पैसे मोजले की सगळं मिळतं ही वृत्ती निसर्गाला मारक आहे.
तुम्ही कधी पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाचं निरीक्षण केलं आहे का? पेरू किंवा मिरची खाताना त्याच्या चोचीतून खाली सांडतं. कारण त्याच्या चोचीचा आकारच तसा आहे. म्हणून पिंजऱ्याच्या पत्र्यावर पेरूचा भुगा किंवा मिरचीचे लहान लहान तुकडे आणि बिया पडलेल्या दिसतात. रानातला पोपट जारूल किंवा बोंडारा या झाडाची फळं खातानादेखील असंच खाली सांडतं. अशा वेळी रानभाई पक्ष्यांचा एखादा थवा किंवा तीन पट्ट्यांची खार हे सगळं फस्त करतात. उरलंसुरलं मुंग्या नेतात. शेवटच्या कणापर्यंत वापर केला जातो. आपण पोपटाला पिंजऱ्यात ठेवतो म्हणून शिल्लक अन्नाचे निसर्गातले वाटेकरी त्यांचा वाटा उचलू शकत नाहीत. मुळात कोणत्याही पक्ष्याला किंवा प्राण्याला बंदिवान करणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. माणूस हादेखील निसर्गाचाच भाग आहे. तरीही तो निसर्गाच्या विरुद्ध वागतो.
जंगलाच्या सभोवताली असलेल्या गावांमध्ये पिंजऱ्यातले पोपट दिसतात. जंगलातले रानटी पोपट हवेतून इकडून तिकडे जाताना दिसतात. हे पोपट रानवारा पितात. खारमाती खातात. झाडांची फळं चाखतात. पळस, पांगारा, सावरी आणि धायटीच्या फुलांमधील मधुरसाला मांसल जिभा लावतात. त्यांच्या पाकळ्या खुडतात. असाणा, सालई, सीताफळ यांच्या कळ्या, फुलं, मोहोर तर उरसोडी, सावा या गवतांच्या आणि देवधानाच्या बिया खातात. ओढ्या- ओहोळांचं, तळ्यांचं पाणी पितात. झाडांच्या पोखरींमध्ये गोदा करतात. नाग, धामणी, घोरपडी, घुबडांशी सामना करतात. कधी आपल्या कर्कश आवाजांनी रान दणाणून सोडतात तर कधी लाडीक आवाजांची मोरपिसं अंगावरून फिरवतात. दिवस बुडाला की मोठाले थवे बनवतात आणि रातथाऱ्यांच्या झाडांच्या दिशेनं भरारतात. पंखांची जलद उघडझाप करत सप्‌‍ सप्‌‍ सप्‌‍ सप्‌‍ हवा कापतात. उडता उडता चित्कारतात. त्यांचे चित्कार संध्याकाळच्या आकाशात भरून राहतात.
पराधीन असलेले लोखंडी पिंजऱ्यांमधले पोपट जन्मठेपेची शिक्षा भोगत असतात. ते मलूल दिसतात. त्यांची पिसं एकसारखी झडत असतात. त्यांना नाना प्रकारचे रोग होतात. बदलत्या ऋतुचक्रानुसार त्यांच्या शरीरात शृंगारसंप्रेरकांची निर्मिती होत असावी असं वाटत नाही. ते पिंजऱ्यामध्ये अंडी घालत नाहीत. रोज मरत असतात. त्यांना दुसऱ्या दिवशी मरता यावं म्हणून त्यांचे मालक त्यांना रोज जिवंत ठेवतात. रानातले पोपट दिसामासानं मोठे होतात. तरतरीत दिसतात. गरसोली नसलेल्या शुकींबरोबर अनुनय करतात. त्यांच्याशी लगट करतात. त्यांच्या मानांवर, डोक्यांवर प्रेमचावे घेतात. म्हटलं तर कात्रीसारख्या धारदार अशा चोची मग माद्यांच्या मानेवरच्या पिसांमधून हळुवारपणे फिरतात. एकांतात मीलन होतं. मादी कोटरात 4 किंवा 6 पांढरीशुभ्र कवटं घालते. ती नर-मादी मिळून उबवतात. यथावकाश पिल्लं जन्माला येतात. पिल्लं म्हणजेच माना लटलट कापणारे उघडेनागडे गोळे. पोपटांच्या अशा पोखरी शोधून गावातले लोक पिल्लं घरी आणतात. त्यांना बंदिवान करतात. डाळ-भाताच्या मोबदल्यात पोपटानं चार शब्द बोलून आपल्याला आणि पाहुण्यांना रिझवावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांना घर भरल्यासारखं वाटतं. एक घर भरतं, एक घर रिकामं होतं… लहान मुलांच्या मनात पिंजऱ्यात ठेवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचा जो प्रकार माणूस करत असतो ना त्याबद्दल विलक्षण चीड निर्माण केली पाहिजे. तिरस्कार निर्माण केला पाहिजे.

मी आणि माझी पत्नी सौ. अनघा महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी या रानातल्या गावात राहतो. गावात प्रधानमंत्री आवास योजना आली आहे. लोकांनी स्वतःच्या हातांनी बांधलेली जुनी, मातीची कौलारू घरं पाडली जात आहेत. चौकोनी ठोकळ्यासारखी घरं बांधली जात आहेत. एका घराच्या दारात बरेच दिवस वाळू पडून राहिली होती. मग एक दिवस काम सुरू झालं. वाळूचा ढीग उपसायला सुरुवात झाली. वाळू उपसताना दोन उकरबेडूक सापडले. आमची सख्खी शेजारीण सौ. चंद्रकला रूपचंद भलावी हिनं मला मोठ्यांदा हाक मारली. मी धावतपळत जाऊन ते बेडूक ताब्यात घेतले. त्यांच्यासाठी एक शयनगृह तयार केलं. शयनगृह म्हणजे वाळूचा ढीग. उन्हाळ्यात हे बेडूक जमिनीखाली झोप घेतात. या झोपेला ग्रीष्मसुषुप्ति असं म्हणतात. सध्या दोन्ही बेडूक मस्त गाढ झोपले आहेत. त्यांची चयापचय क्रिया मंदावली आहे. मी या बेडकाच्या जोडीतील नराचं नाव ठेवलं आहे ‘मंदार’ आणि मादीचं ‘मंदा’ ही झाली बेडकाची गोष्ट. आता आमच्या गावातले लोक असेच पतंगांच्या अळ्या, ढालकीटक, सरडे, सापसुरळ्या, साप, पक्षी, प्राणी वाचवत आहेत. वाचवत आहेत याचा अर्थ, घरादारात, अंगणा-परसात आले तरी त्यांना मारत नाहीत.

हा बदल कसा घडला? मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की, हा बदल आमच्यामुळे घडला. आम्ही शहरातील सुखाच्या कोशातून बाहेर पडलो म्हणून हा बदल झाला. पहिल्यांदा आम्ही आमच्यात बदल केला म्हणून लोकांमध्ये बदल होऊ शकला. माणूस बदलला तरच निसर्गात बदल होईल. बदल होईल म्हणजे निसर्गसंवर्धन होईल. आम्हाला सतत माणसं हवी असतात. आम्हाला माणसांना सोबत घेऊन काम करायला आवडतं. मला सुरुवातीला आमच्या घराच्या सभोवतालच्या निसर्गाची काळजी वाटायची. पण आता ही काळजी पुष्कळ कमी झाली आहे. कारण आमच्या गावातला माणूस बदलला आहे. अवघ्या एका माणसात झालेला बदल म्हणजे शेकडो झाडं लावून ती जगवण्यासारखं असतं.

जगातल्या पर्यावरणाच्या यशकथांचा मसुदा रानावनातल्या, डोंगरकुशीतल्या लोकांनी लिहिला आहे. निसर्गाचा आनंद घेणं आणि निसर्ग वाचवणं या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पावसाळी सहल काढून एखाद्या धबधब्यात चिंब भिजणं म्हणजे निसर्गाचा आनंद घेणं आणि त्याच धबधब्याच्या पाणलोट क्षेत्रात बांध-बंदिस्ती करणं किंवा पाणलोट क्षेत्रातील जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक लोकांना पर्यायी उत्पन्नाचं साधन मिळवून देणं म्हणजे निसर्ग वाचवणं. निसर्गाचा आनंद घेणं म्हणजे जंगलात वाघ बघायला जाणं आणि निसर्ग वाचवणं म्हणजे वाघ ज्या पाणवठ्यावर पाणी पितो त्या पाणवठ्याच्या रचनेत बदल करून तो निसर्गस्नेही बनवणं किंवा निसर्गसंमत बनवणं. निसर्ग वाचवताना आपण आनंदाच्या कळसूबाईवर असतो.
निसर्गाच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकताना एक विचार जरूर करावा. एकवेळ निसर्गाचं संरक्षण करता नाही आलं तरी चालेल पण किमान त्याचा नाश तरी करू नये. आजकाल निसर्गाचं प्रकाशचित्रण हा हजारो लोकांचा आवडता छंद झाला आहे. यात गैर काहीही नाहीये. उलटपक्षी प्रकाशचित्रणामुळे निसर्ग संशोधनाला एक ठाशीव अधिकृतता येते. निसर्गसंशोधनाची परिणती निसर्गसंवर्धनात झाली तर काय बहार येते!

निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलं पाहिजे. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन राहायला पाहिजे. निसर्गाची सुखदुःखं समजावून घेतली पाहिजेत. जेव्हा निसर्गाची सुखदुःखं ही आपली सुखदुःखं होतात, तेव्हा एक आनंदयात्रा सुरू होते. मग चरैवेति चरैवेति असं म्हणत आपण या आनंदयात्रेतील एक सहप्रवासी व्हायचं की घरात बसून दूरदर्शन संचाच्या चकचकीत पडद्यावरचा निसर्ग बघायचा? घरात बसूनसुद्धा निसर्गाचा आनंद लुटता येतो. आम्ही निसर्गाचा आनंद घेता घेता निसर्गाची गरज ओळखून प्रत्यक्ष निसर्गसंवर्धनाचं काम करत आहोत. आनंदाच्या डोहात डुंबत आहोत.
वेचावा आनंद
वाटावा आनंद
या परता आनंद
आणखी कोणता?
फळांनी लगडलेलं आंब्याचं झाड नीट बघा. ते किंचित खाली झुकलेलं असतं. असं झाड आपल्याला काय शिकवतं? कितीही मोठा पराक्रम गाजवला, कर्तबगारी दाखवली, तरी माणसानं विनम्र असावं.
मुंगी या कीटकाकडून कार्यमग्नता शिकावी. मुंगी दोन मिनिटांची साखरडुलकी घेते. एक मुंगी दिवसभरात सुमारे 20 साखरडुलक्या घेते. एरव्ही ती सतत काही ना काहीतरी करत असते.

माणूस म्हणून आपण वाघाकडून रुबाब वगैरे घेणं जरा अवघड आहे. पण वाघाकडून चालणं शिकता येईल. एक वाघ एका दिवसात सुमारे 20 किलोमीटर चालतो. आपण नुसतं चाललो तरी आपलं आयुष्यच बदलून जाईल. आपण जेव्हा पहाटे पहाटे एखाद्या टेकडीवर किंवा बागेत फिरायला जातो तेव्हा दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहतो. आनंदाचा गुणाकार होतो. त्यामुळे चालताना जास्तीत जास्त मित्रांना सोबत घ्यावं. आपण जेवढे जास्त मित्र सोबत घेऊ, तेवढं जास्त अंतर चालतो. चालताना फार सुंदर विचार मनात येतात. जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा कळत-नकळत निसर्ग आपल्यावर संस्कार करत असतो. हे संस्कार आपलं जगणं समृद्ध करतात. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते सतत कामी येतात. एक आजीबाई आहेत. त्या जेव्हा 60 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांनी रोज 9 किलोमीटर चालायला सुरुवात केली. आज त्या 97 वर्षांच्या आहेत आणि कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही.

वाघ स्वतः शिकार करतो. तुम्हाला कोंबडा हा पक्षी खायचा असेल तर मोकळा सोडलेला गावरान कोंबडा स्वतःच्या हातांनी पकडून दाखवा. दिवसभर नाही पकडत बसायचं. घड्याळ लावून पकडायचा. नाही पकडता आला, तर नाही खायचा. गोंडांची पोरं केवळ हातांनी बिलोन्या, बोटऱ्या, गन्या, ढेबऱ्या असे मासे पकडतात. झणझणीत झुरव्याबरोबर मिटक्या मारत खातात. मासे पकडताना कोणतंही साधन वापरलं जात नाही. म्हणून त्यांच्या हातांना दरवर्षी मासे लागतात. आधुनिक साधनं, तंत्रज्ञान आलं की तारतम्य, शहाणपणा अडगळीत जाऊन पडतो. सरसकट धरपकड सुरू होते. व्याज संपतं, मुद्दलाला हात घातला जातो.

निसर्गाबद्दल लिहिण्याच्या भरात शास्त्र आणि साहित्य यात कळत नकळत गल्लत होऊ शकते. कारण निसर्गाची मोहिनीच तशी आहे. मात्र या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. वाघ या प्राण्यावर कविता किंवा कादंबरी लिहिणे वेगळे आणि शास्त्रीय प्रबंध लिहिणे वेगळे. दोन्हींच्या मधली सीमारेषा ठसठशीत आहे. हातात लेखणी धरलेल्या व्यक्तीने याचे भान ठेवले पाहिजे. विशेषतः रानांवनांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये अवघं आयुष्य काढणाऱ्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी लिहिताना शास्त्राची कसोटी लावली पाहिजे. सामान्य वाचकांना या गोष्टी खिळवून टाकतात. भारावून टाकतात. कारण त्या चटकदार असतात. खुसखुशीत असतात. मात्र शास्त्राच्या चश्म्यातून पाहिलं तर कळतं की, या गोष्टींचा पाया भुसभुशीत असतो. शास्त्र म्हणतं, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांवर सखोल शास्त्रीय संशोधन करणारे अभ्यासक स्थानिक लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा, त्यांच्या अंत:प्रेरणेचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा लाभ घेतात. निसर्गावर ललितगद्यात लिहिणारी मंडळीसुद्धा अशा लोकांना शोधून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्याकडून सामग्री गोळा करतात. रानव्यात राहणारे लोक हातचं काहीही राखून न ठेवता माहितीचं भांडार खुलं करतात. आपल्याकडे जसजशी प्रकाशचित्रण कला विकसित झाली, लोक, विशेषतः तरुण प्रत्यक्ष निसर्गात राहून अभ्यास करायला लागले, तसतसा या गोष्टींमधला फोलपणा लक्षात यायला लागला. निसर्गाविषयी शास्त्रीय किंवा ललितगद्य लिखाण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट मात्र आवर्जून केली पाहिजे. ती म्हणजे, ज्या स्थानिक लोकांनी माहिती पुरवली किंवा निसर्गातून माहिती गोळा करताना सोबत केली, त्यांचा उल्लेख केला पाहिजे. पुस्तकांचा किंवा शोधनिबंधांचा संदर्भ देण्याइतकंच माणसांची नावं देणं हे महत्त्वाचं आहे, किंबहुना काकणभर जास्त महत्त्वाचं आहे.
आकाशातलं धनोर पाहताना नातवाबरोबरच त्याच्या आजोबांनाही केवढा आनंद होतो. इंद्रधनुष्य त्यांना एकाच ओट्यावर आणतं. निसर्गरक्षणाच्या यशकथांचं इंद्रधनु चितारण्यासाठी आपण एकाच ओट्यावर आलं पाहिजे. प्रत्येकाचा कोश स्वतंत्र असला तरी चालेल; पण निसर्गाचा एखादा कळीचा प्रश्न सोडविण्यासाठी तरी एकत्र आलं पाहिजे. निसर्गासाठी लोक एकत्र येत नाहीत असं नाही. पण आपल्या देशाचा भौगोलिक विस्तार पाहता, अशा प्रकारे एकत्र येण्यातून उभी राहणारी कामं ही छोट्या छोट्या बेटांसारखी आहेत असं वाटतं. प्रत्येकानं आपापल्या कोशाचं अस्तित्व अबाधित ठेवून या बेटांना जोडणारे सेतू उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

निसर्ग हेच आयुष्य बनलं तर आपण आनंदी राहू शकतो, हे तुम्हाला माझ्याकडे बघून सहज लक्षात येईल. आपल्या आयुष्याच्या गाभाऱ्यात जर निसर्ग असेल, तर तो आपल्यावर सतत अत्यंत मौलिक असे संस्कार करत राहतो. हे संस्कार घेण्याची, हे संस्कार तनमनात भिनवण्याची आपण तयारी करायची असते. थोडी तयारी झाली की अळवाच्या पानावर थबकून राहिलेल्या पाण्याच्या थेंबात आभाळ दिसायला लागतं. पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागते. पक्ष्यांची किलबिल आयुष्याचं गाणं बनते. हे संस्कार आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. ते एकसारखी निसर्गगुरुजींची आठवण करून देतात. या संस्कारांचं बोट धरून संवर्धनाच्या रस्त्यावरून चालण्यात एक बेहोशी असते. हेच संस्कार अष्टगंधासारखे दाट झाले की गुरुजींच्या भल्याशिवाय दुसरं काही सुचतंच नाही.

आपलं अवघं आयुष्यच जर निसर्गानं वेटाळून टाकलं तर नुकतीच कात टाकलेल्या सापासारखं वाटतं. रोज नवीन वाटतं. निसर्गानं आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आहे, याचं एक चिन्ह म्हणजे लहान मुलासारखं उगीचच उचंबळून येतं. आपल्याला निसर्गाकडून आनंद मिळायला लागला की आपण त्याची बाजू घेतो. मग हळूहळू कळीचं फूल व्हावं तशी त्याच्या संरक्षणाची, संवर्धनाची वाट सापडते. आपली कर्मभूमी सापडते. हा प्रवास निसर्गामुळे सुरू होतो. तो निसर्गात संपला पाहिजे. निदान शेवटी तरी आपण निसर्गाच्या उपयोगी पडलं पाहिजे.

आपण जर आपणच टाकलेलं, मातीवर पडलेलं, मातीमध्ये अडकून राहिलेलं असं प्लास्टिक गोळा केलं, मातीच्या कणांना मुक्त केलं तर त्या जागेवर पुढे काय होतं हे बघा. तिथे माती, पाणी, ऊन, हवा यांचे संस्कार होऊन कुठल्या कुठल्या बिया रूजतात. गवताची पाती उगवून येतात. झुडपांची, झाडांची चाहूल लागते. शतजन्मांचा महोत्सव सुरू होतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी वृद्धी करणं, वाढ करणं, बेरीज करणं, गुणाकार करणं हा निसर्गधर्म आहे. निसर्गाला उसंत देणं, विश्रांती देणं म्हणजेच माणूस म्हणून आपण काहीही न करणं. आपण एका सुंदर जन्मसोहळ्याचा आनंद घेणं आणि भारावून जाणं एवढंच करावं. मग निसर्गाची तब्येत ठणठणीत आहे, हे कसं ओळखायचं ? पिल्लं. सगळीकडे पिल्लं दिसली पाहिजेत. तृणांची पिल्लं, क्षुपांची पिल्लं, झाडांची पिल्लं, किड्यामकोड्यांची पिल्लं, सरपकिटरूंची पिल्लं, पक्ष्यांची पिल्लं, हरणांची पिल्लं, वाघांची पिल्लं…
निसर्गात साचलेपणा नाहीये. पुढे जाणं आहे. वाढ आहे. वाढ संपली की अंत आहे. शेवट आहे.
निसर्ग विराट आहे. विशाल आहे. महान आहे. तो सगळ्यांना देतो. सगळं देतो. ही झुळूक माझी, तो माझा पाऊस असं आपण म्हणू शकतो का? निसर्ग कधीही हातचं राखून देत नाही. लपवून ठेवत नाही. काही वेळा आपण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आपल्याकडचं जास्तीचं इतरांना देतो. झाडं तर आपली सर्वोच्च निर्मिती सगळीच्या सगळी देऊन टाकतात. असं ती वर्षांनुवर्ष करतात. मरेपर्यंत करतात.

निसर्गाची निर्मिती ही एक संपूर्ण निर्मिती असते. परिपूर्ण निर्मिती असते. साध्या गांडुळाकडे पाहिलं तरी कळतं की तीसुद्धा एक परिपूर्ण निर्मिती आहे. गांडूळ अपूर्ण आहे, अर्धवट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बाकी राहिलं आहे, असं कधीही वाटत नाही. या परिपूर्ण निर्मितीमुळे गांडूळ त्याचं काम अत्यंत चोख करतं. लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपण माणसं तयार झालो आहोत. मला कायम वाटतं की आपलं शरीर असं आहे, की आपली जीवनशैली निसर्गपूरक असायला हवी, निसर्गाशी मैत्री करणारी असायला हवी, निसर्गसंमत असायला हवी. विशेषतः आपल्याला जे पाय मिळाले आहेत ते मैलोगणती चालण्यासाठी मिळाले आहेत. आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. पण तसं वागत नाही. अनैसर्गिक वागतो. निसर्गाशी फटकून राहतो. रानात राहणारा, पोट सुटलेला, सुखवस्तू वाघ कधी पाहिला आहे का? अशा वाघाला निसर्ग सांभाळणार नाही. तो शिकार करायला, जगायला नालायक ठरेल. तो हळूहळू निसर्गव्यवस्थेतून नाहीसा होईल. अन्नशंकूच्या शेवटाला असला तरी निसर्ग निर्विकारपणे त्याचे नियम लावेल आणि असा वाघ नष्ट होईल. आपल्याला, माणसाला चांगलं मोठं पोट असेल तर तोही निसर्गाचाच एक भाग आहे, हा युक्तिवाद बरोबर आहे. फक्त जागतिक तापमान वाढीमुळे वगैरे फार थोड्या काळात खूप जास्त पाऊस झाला तर झाडावर चढता येईल का? याचा विचार करावा. (शहरातल्या माणसाला बहुधा झाडावर चढता येत नाही. पहिला पाय पहिल्या फांदीवर टाकला की पुढची फांदी कुठे आहे, हे तो खाली उभं राहिलेल्या लोकांना वगैरे विचारतो.) स्वतःचा जीव वाचवण्यासाठीसुद्धा आपण निसर्गाचं ऐकलं नाही तर निसर्ग आपल्याला नष्ट करेल. आपलं वजन आपल्या विरोधात जाईल. निसर्गाची हाक ऐकली नाही, आपल्या देहबोलीकडे दुर्लक्ष केलं, तर आपण आजारी पडतो हे आपल्याला कळत नाही असं कसं होईल? आपल्याला सगळं समजतं. आपण माणसं विशेष आहोत. कपड्यांना साधी माती लागली तरी आपण कपडे खराब झाले असं म्हणतो आणि पहिल्या पावसात त्याच मातीचा सुगंध आला की ‘मृद्गंधाची कुपी उघडली, वर्षाराणी नाचत आली’ वगैरे कविता करतो. किती जणांच्या तळपायांना रोज माती लागते? सर्वात शेवटी आपलीसुद्धा पृष्ठीय मृदाच होणार असते, तरी आपल्या तळपायांना महिनोन्महिने माती लागत नाही. हा असा माणूस आहे. माणूस समजायला खूप अवघड आहे. गुंतागुंतीचा आहे. त्या मानानं निसर्ग सरळ आहे. साधा आहे. माणूस स्वतःच्या सोयीप्रमाणे पटापट आपले विचार बदलतो.

निसर्गाचे तरंग, निसर्गाच्या लहरी, निसर्गाची स्पंदनं, निसर्गाच्या संवेदना, निसर्गाची कंपनं माणसाला खूप जवळची वाटतात. यालाच आपण निसर्गाची आणि आपली तार जुळते असं म्हणतो. सह्याद्रीतल्या डोंगरमाळेतला एखादा रांगडा किल्ला चढून गेल्यावर आपल्याला म्हणूनच हर्षभरीत, आनंदी, उत्साही, छान वाटतं. हे जे छान वाटणं असतं ना ते आपल्यात भरून घ्यायचं असतं. शांत व्हायचं असतं. निसर्गाची भव्यता पाहून विनम्र व्हायचं असतं. चमत्कारच वाटावा अशा निसर्गाच्या निर्मितीपुढे अचंबित व्हायचं असतं. कोवळ्या किरणांच्या वर्षावात न्हाऊन निघायचं असतं. भरारणाऱ्या पश्चिम वाऱ्याच्या थपडा खायच्या असतात. त्याच्या हिंदोळ्यावर झुलायचं असतं. निसर्गापुढे आपल्या उणेपणाची जाणीव करून घ्यायची असते. पण इथेसुद्धा काही लोकांची बुद्धी त्यांच्या विरुद्ध जाते. ते आकंठ मद्यपान करतात. ऐन पावसाळ्यात सह्याद्रीतल्या प्रसिद्ध धबधब्यांवर जाऊन पहा. मद्यपींचा धांगडधिंगा सुरू असतो. दिवस बुडाला, की तिथे मद्याच्या फोडलेल्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचं देणं थांबत नाही. थोर आकांत करत डोंगरमाथ्यावरून पाणी कोसळत राहतं.

शहरंनगरं वसवणं, रस्ते बांधणं, धरणांची निर्मिती करणं, वाहनं तयार करणं, कारखाने उभारणं, शेती करणं यातली प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. सध्याच्या जगात एक प्रकारे अपरिहार्य आहे. आपली लोकसंख्या सतत वाढत आहे. हे सगळं करत असताना, आपण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निसर्गाचा फार मोठ्या प्रमाणात नाश केला आहे. हा नाश असाच सुरू राहणार आहे. तो थांबणार नाही. आपण खूप झपाट्याने पुढे आलो आहोत. आता येथून मागे जाणं अशक्य आहे. खूप उशीर झाला आहे. चला, आपण सगळे जागे होऊया. निदान यापुढे तरी निसर्गाचा कमीत कमी नाश करूया. एक माणूस निसर्गासाठी बरंच काही करू शकतो. आपण स्वतः निसर्गासाठी किती वेळ देऊ शकतो हे आधी ठरवूया. आपली कर्मभूमी आखून घेऊया. आपली कर्मभूमी घराच्या शेजारी असलेल्या बागेएवढी लहान किंवा एक हजार एकर जंगलाएवढी मोठी असू शकते. आपल्या रोजच्या जगण्यात काही बदल करूया. निसर्गाला पूरक, निसर्गाशी मैत्री करतील अशा काही सवयी लावून घेऊया. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी वापरणं, छोटी छोटी अंतरं चालत जाणं, घराच्या अवतीभवती किंवा शेता- शिवारात स्थानिक झाडं लावणं, ताटात वाढून घेतलेले सर्व पदार्थ नीट संपवून ताट स्वच्छ करणं, घरातली सर्व मंडळी एकाच खोलीत बसून वगैरे टी.व्ही. बघत असतील तर बाकीच्या खोल्यांमधले दिवे मालवणं, प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर करणं, वर्षातून किमान एक दिवस तरी वीज न वापरणं, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं…
आपण दिवसभर नेमकं काय केलं आणि त्याचा निसर्गावर नेमका काय परिणाम झाला यावर विचार करून त्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल करणं…
या संमेलनाच्या निमित्तानं आपण सगळे ठरवूया, एकत्र येऊया. माणसासाठी निसर्ग नाही, तर निसर्गासाठी माणूस हे व्रत धरूया.
‘तुळशीबाय, माजी गोऽ तुळशीबाय’ असं म्हणत तुळशीच्या रोपावरून थरथरता हात फिरवणारी आजी जरा आठवून बघा. कशी माया होती! काय निरागस भाव होता! किती निखळ प्रेम होतं! सगळं किती साधं, सरळ आणि रोज घडणारं. मग का नाही तुळस अंग धरणार? आणि माणसं औषधाविना राहणार? आजपासून आपण आपल्या हिरव्या नातलगांची खबर घ्यायला सुरूवात करूया. त्यांच्याजवळ जाऊया. त्यांच्याशी दोन शब्द बोलूया. ही खरी आनंदाच्या प्रांताची मुशाफिरी.
आसुसलेल्या मातीसाठी
मातीमधल्या झाडासाठी
आकाशीचं अमृत दे.
वैशाखातील वाटेसाठी
वाटेचा वसंत होण्यासाठी
हजार झाडं बहरू दे.
गवतावरच्या मोत्यांसाठी
मोत्यांचा गोफ होण्यासाठी
एक किरण सूर्याचा दे.
अंगणातल्या गाण्यासाठी
गाण्यातील आनंदासाठी
एक जन्म पक्ष्याला दे.
माळावरच्या निवडुंगासाठी
निवडुंगाच्या फुलासाठी
एक नजर स्नेहाची दे.
निसर्गसृष्टी जपण्यासाठी
जपणाऱ्या माणसासाठी
एक प्रेमळ मन दे.