लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल महाराष्ट्रातील ज्या तेरा मतदारसंघांमध्ये मतदान झाले, त्यापैकी सहा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना थेट आमनेसामने आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या सहाही मतदारसंघांचा कौल मतदारांनी काल मतदानयंत्रात बंदिस्त केला आहे, जेथे उद्धवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जो काही राजकीय प्रयोग केला, तो मतदारांच्या पसंतीस कितपत उतरला आहे ह्याचा फैसला ह्या लोकसभा निवडणुकीतून होणार आहे, त्यामुळे त्याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे. 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी भाजपने उत्तर, ईशान्य आणि उत्तर मध्य हे तीन मतदारसंघ, तर शिवसेनेने वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे तीन मतदारसंघ जिंकले होते. शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर दक्षिण मुंबई, ठाणे आणि पालघरचे खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे, तर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार शिंदेसेनेकडे गेले. त्यामुळे ह्या बदललेल्या परिस्थितीत भाजप अधिक शिंदेसेना अधिक राष्ट्रवादीचा अजित पवार गट विरुद्ध उद्धव ठाकरेंची मशाल आणि शरद पवारांची तुतारी कितपत कामी येणार हे ही निवडणूक सांगणार आहे. कालच्या टप्प्यात निवडणूक झालेल्या महाराष्ट्रातील तेरा जागांपैकी अनेक महत्त्वपूर्ण लढतींमध्ये कित्येकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भाजपने पूनम महाजनांचे तिकीट कापून उमेदवारी दिली गेलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आदी मंडळींचे काय होणार हा विषय तर आहेच, परंतु त्याचबरोबर मूळ पक्ष सोडून भाजपच्या वळचणीला गेलेल्या नेत्यांच्या मागे जनता उभी राहते की नाही हे पहावे लागणार आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे ह्या निवडणुकीतील प्रचाराचे सर्व केंद्र राष्ट्रीय विषयांवर ठेवण्याचा आणि महाराष्ट्रातील सत्तांतराचा विषय मागे ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मुंबईत रोड शो देखील केला. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे आजवरचे समीकरण असल्याने जरी ही लोकसभेची निवडणूक असली, तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकूण अस्तित्वाचाच प्रश्न आता निर्माण झालेला असल्याने शिंदेसेना आणि भाजपने मिळून उद्धव ठाकरेंच्या ह्या बालेकिल्ल्याला किती खिंडार पाडले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे, कारण लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणवणारेही बघता बघता शिंदेसेनेत दाखल झाले. जोगेश्वरीतील हॉटेल प्रकरणात ईडीने कारवाई सुरू केलेले रवींद्र वायकर उद्धव यांची साथ सोडून गेल्या महिन्यात शिंदेसेनेत गेले आणि तेथील उमेदवारी घेतली. माजी खासदार गजानन कीर्तीकर शिंदेसेनेत गेले, परंतु त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर मूळ शिवसेनेत मागे राहिले आणि त्यांना उद्धवनी या निवडणुकीत वायकरांविरुद्ध उमेदवारी दिली आहे. उद्धव यांच्यासोबत ठामपणे राहिलेल्या अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबई मतदारसंघात शिंदेसेनेच्या यामिनी जाधवांना धूळ चारावी लागणार आहे. शिंदेसेनेत गेलेले राहुल शेवाळे यांच्याशी उद्धव यांचे सहकारी अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईत लढत आहेत. केवळ मुंबईतच नव्हे, तर कल्याण, ठाणे, नाशिक आदी मतदारसंघांतही उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात सरळ सामने आहेत. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध उद्धवसेनेच्या वैशाली दरेकर उभ्या आहेत, ठाण्यात निष्ठेने मूळ शिवसेनेत राहिलेल्या राजन विचारेंनी नरेश म्हस्केंना आव्हान दिले आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना राजाभाऊ वाझेंसारखे तगडे आव्हान उद्धवसेनेने दिले आहे. उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वारसा ह्या निवडणुकीत पुरेपूर संपवण्याचा चंग भाजपने बांधला आहे आणि आपली बाजू नैतिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा सवतासुभा उभारून राहिलेल्या राज ठाकरेंनाही पक्षाने सोबत घेतले आहे. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान मोदींवर सर्वांत प्रखर टीका करीत आलेले राज ठाकरे आता बदललेल्या भूमिकेत पाहणे मतदारांच्या नशिबी आले आहे. शरद पवार यांच्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक तर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाचीच आहे. ह्या निवडणुकीने पवारांच्या घरातच फूट पडली आहे. राजकीय फोडाफोडी मतदारांना किती पसंत असते, सत्तेमागे मतदारही वाहून जातात का, राष्ट्रीय नेतृत्वाचा विषय ह्या सगळ्या अनैतिक बाबी गौण ठरवतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार आहे.