निवडणूक आयोगाकडून मतदारयादी जाहीर

0
10

>> ३०,५९९ मतदार वाढले, १४,४०९ नावे वगळली राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदारांची नोंद

येथील राज्य निवडणूक आयोग कार्यालयाकडून राज्यातील अंतिम पात्र निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदारांची नोंद झाली आहे. राज्यातील मतदारांच्या संख्येत ३० हजार ५९९ एवढी वाढ झाली असून १४ हजार ४०९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. उत्तर गोव्यात ५ लाख ३९ हजार ४२० मतदार तर, दक्षिण गोव्यात ६ लाख १७ हजार ०४४ मतदार आहेत.
निवडणूक कार्यालयाने १ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवडणूक मतदार यादीनुसार राज्यात ११ लाख ४० हजार २७४ मतदार होते. राज्यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. महिला मतदारांची एकूण संख्या ५ लाख ९३ हजार ९६० तर, पुरूष मतदारांची एकूण संख्या ५ लाख ६२ हजार ५०० एवढी आहे. वास्को मतदारसंघात सर्वाधिक ३५ हजार १३९ मतदार आहेत.

१८ ते १९ वर्षे वयोगटातील मतदारांची टक्केवारी १.६७ टक्के एवढी आहे. राज्यात ८० वर्षार्ंवरील ३० हजार ०३८ मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १० हजार ३१८ एवढी आहे. राज्यात एकूण १७२२ मतदार केंद्रे तयार करण्यात आली आहेत. नवीन नावनोंदणी केलेल्या ३० हजार ५९९ मतदारांमध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील १४ हजार ५१२ मतदारांचा समावेश आहे. २० वर्षे वयोगटातील २२९५ मतदारांचा समावेश आहे. ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक २ लाख ५२ हजार ४६३ एवढी आहे. ७५३६ मतदारांची नावे मयत झाल्याने वगळण्यात आली आहेत.