राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या काल तब्बल १४३२ वर पोहोचली. अर्थात, साडेसहा हजारांहून अधिक चाचण्या झाल्याने ही संख्या मोठी दिसते. कालचा टेस्ट पॉझिटिव्हिटी दर २१.७२ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनासंदर्भातील सज्जतेबाबत जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांतून केला. राज्यातील कोरोना स्थितीवर आरोग्य खाते लक्ष ठेवून असून तज्ज्ञांनी परिस्थितीनुरूप विविध टप्प्यांमध्ये करावयाच्या उपाययोजना निश्चित केलेल्या असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले, तर राज्यातील बंदिस्त व खुल्या जागेतील सार्वजनिक उपस्थितीवर काही बंधने घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. बंदिस्त सभागृहामध्ये पन्नास टक्के उपस्थितीचे, तर खुल्या जागेत १०० च्या किमान संख्येचे बंधन उपस्थितीवर आजपासून घालण्यात आले आहे. परंतु केवळ कागदोपत्री बंधन घालून काही फायदा होणारा नाही. या बंधनांची प्रत्यक्षात कार्यवाही तेवढ्याच गांभीर्याने आणि कसोशीने होते आहे हेही पाहिले गेले पाहिजे. आरोग्यविषयक सज्जतेच्या दाव्यांचाही प्रत्यक्षात ती वेळ येते तेव्हा कसा बोजवारा उडतो हे कोरोनाच्या दुसर्या लाटेत गोमंतकीय जनतेने पाहिलेलेच आहे. एकूणच सरकार म्हणून जेव्हा गेल्या दोन वर्षांतील सरसकट कोविड हाताळणीकडे पाहिले जाते तेव्हा अत्यावश्यक निर्णय तातडीने घेण्यातील अक्षम्य विलंब, प्रशासकीय गलथानपणा, नेत्यांचा बेजबाबदारपणा यातून जे काही गोमंतकीय जनतेला भोगावे लागले ते दुर्लक्षिता येत नाही. मुळात तिसरी लाट उफाळण्यास सरकारचीच बेफिकिरी कारणीभूत राहिली आहे. ‘नाताळ’, ‘नववर्ष’ आणि ‘निवडणूक’ ह्या तीन कारणांनी ही तिसरी लाट मुख्यत्वे उफाळलेली आहे. देशातील बहुतेक राज्यांनी विविध प्रकारे ह्या वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्याचा प्रयत्न चालवलेला असला तरी गोवा सरकारने कोणतेही निर्बंध अगदी आजतागायत जनतेवर घातलेले नव्हते, त्यातूनच तिसरी लाट बेफाम उधळलेली आहे आणि ती येत्या काही दिवसांत अक्राळविक्राळ रूप धारण करण्याची दाट शक्यता एकूण रुग्णवाढीचे प्रमाण आणि कल पाहता दिसते आहे.
देशभराप्रमाणेच गोव्यातील कोरोना स्थिती अगदी प्रत्येक दिवसागणिक बिघडत चालली आहे. गेल्या २८ डिसेंबरपासून जी तिसरी लाट राज्यात आहे, त्यात गेल्या फक्त अकरा दिवसांत सहा हजारांवर नवे रुग्ण आढळून आले आहेत. या काळातील दैनंदिन सरासरी टेस्ट पॉझिटिव्हिटी दर काढला तर तो १३.५४ टक्के भरतो. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे या तिसर्या लाटेच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धातील टक्केवारीचे आकडे अधिक चिंताजनक आहेत. गेल्या दोन जानेवारीपासूनच्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी टक्केवारीचे प्रमाण सातत्याने दोन आकडी राहिले आहे आणि ते वाढते आहे. राज्यात सध्या इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण हे एकूण रुग्णांच्या तुलनेत १.०६ टक्के असले तरी ओमिक्रॉन व्हेरियंट वाटतो तेवढा सौम्य नसेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने कालच दिलेला आहे.
राज्यापाशी अजूनही स्वतःचे जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन नसले तरी आतापर्यंत मिळालेल्या अहवालांत तब्बल १९ रुग्ण ओमिक्रॉनचे आढळले आहेत आणि त्यातील तेरा जरी ब्रिटनमधून गोव्यात आलेले असले तरी उर्वरित सहा हे गोव्याच्या विविध भागांतील स्थानिक नागरिक आहेत. म्हणजेच सध्या राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या ही ओमिक्रॉन व्हेरियंटची असावी असा दाट संशय त्यातून निर्माण होतो. सध्या राज्यभरामध्ये जे कोरोना रुग्ण आहेत, त्यात यावेळीही मडगावचा वरचा क्रमांक लागतो. परंतु हे लोण आता दुय्यम शहरांमध्येही वाढू लागले आहे. पण ओमिक्रॉनची आत्यंतिक संसर्गजन्यता आणि ही विद्यमान परिस्थिती यापासून आपण काही धडा घेतला आहे का? जनतेचे सोडाच, सरकारने वा राजकीय नेत्यांनी काही धडा घेतला आहे का? उद्घाटनांसारख्या अनावश्यक सरकारी सोहळ्यांना आणि निवडणूक सभांना ज्या प्रकारे प्रयत्नपूर्वक गर्दी गोळा केली जात आहे, ती बेजाबदार वृत्ती अक्षम्य आहे. इथे जनतेच्या जिवाशी खेळ मांडला आहे आणि तुम्ही कसली उद्घाटने करीत फिरता आहात? कसल्या सभा घेता आहात? कॉंग्रेसनेही काल राजभवन भेटीच्या निमित्ताने गर्दीचे ताळतंत्र सोडलेले आंदोलन केले. किमान कोविड मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन जर राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करणार नसतील तर गोव्यावर लवकरच भीषण परिस्थिती ओढवेल. त्यामुळे आजपासून घातल्या गेलेल्या निर्बंधांचे कडक पालन होईल हे सर्वच राजकीय पक्ष, नेते आणि सरकारने कटाक्षाने पाहावे. निर्बंध नुसते कागदोपत्री नकोत!