नाव

0
5

(क्षणचित्रं… कणचित्रं…)

  • प्रा. रमेश सप्रे

आपण कौतुक करतो ते कोलंबस, वास्को-द-गामा अशा पाश्चात्त्य खलाशांचे. पण यांच्याही पूर्वी अनेक शतकं ऋषी अगस्ती आणि त्यांचे शिष्य इतिहासातले पहिले दर्यावर्दी होते. जावा, सुमात्रा, बाली अशा बेटांवर अगस्तीनी आपल्या संस्कृतीचा झेंडा रोवला तो नावेतून प्रवास करूनच.

दूरवरून जगजितसिंगच्या खर्जात गायलेल्या भावपूर्ण गझलचे सूर कानीमनी रुंजी घालत होते… वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी।
ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन
वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी…

खरचं आहे. असं कोणतंही मूल नसेल ज्यानं पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात कागदाची नाव सोडली नसेल. कदाचित अनेकांच्या बालपणी हस्तव्यवसायाची (क्राफ्ट) पहिली शिकलेली गोष्ट ही कागदाची नावच असेल. तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या पातळ्या सांगितल्यायत. आनंद-अत्यानंद-महानंद-परमानंद-ब्रह्मानंद! या साऱ्या आनंत-पातळ्यांचा अनुभव मुलांना कागदाची नाव बनवताना, ती पाण्यात सोडताना, ती पाण्यावरून तरंगत जाताना, काही अंतर वाहत गेल्यावर नाव बुडताना आणि आपल्या नावेबरोबर इतर सवंगड्यांच्या नावा बुडताना होणारा आनंद असाच वाढत जाणारा असतो. हरपलं ते निर्व्याज, निरागस बालपण. हा पूर्वीचा अनुभव आता येत नाही, कारण जीवनात बालपण येतच नाही. असो.

पूर्वी व्यक्तीचं नाव लिहिताना ‘ना’वर अनुस्वार देऊन ‘नांव’ असं लिहिलं जायचं. पाण्यातली नाव मात्र अनुस्वाराशिवाय असायची. अर्थात अनुस्वाराचा उच्चार करायचाच नसे.

तर अशा या नावेचा इतिहास फार प्राचीन आहे. ऋषिकुलातील अभ्यासक्रमात नौकाबांधणी, नौकानयन असे विषय असतात. आपण कौतुक करतो ते कोलंबस, वास्को-द-गामा अशा पाश्चात्त्य खलाशांचे. पण यांच्याही पूर्वी अनेक शतकं ऋषी अगस्ती आणि त्यांचे शिष्य इतिहासातले पहिले दर्यावर्दी होते. जावा, सुमात्रा, बाली अशा बेटांवर अगस्तीनी आपल्या संस्कृतीचा झेंडा रोवला तो नावेतून प्रवास करूनच. आजही बाली बेटावर अगस्ती ऋषींचे पुतळे नि रस्त्यांना दिलेले त्यांचे नाव सर्वांना पाहायला मिळते. आपल्याला हे असले काही माहीत नसते. आहे कीनई गंमत!

रामायणातला गुटक प्रसंग हृदयस्पर्शी आहे. गंगा नदी पार करून राम-सीता-लक्ष्मण यांना गुटक नावाडी पैलतीरावर पोचवतो. ‘गीतरामायणा’तील ते प्रसिद्ध नौकागीत आठवतं? ‘नकोस नौके परत फिरू… श्रीरामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू…’ या भक्तीपूर्ण निरपेक्ष सेवेचं पारिश्रमिक (बिदागी) नव्हे तर पारितोषिक गुटकाला काय मिळतं? तर साक्षात विष्णू भगवंताचा अवतार असलेल्या श्रीरामाचं आलिंगन!

‘भागवत’ हा ग्रंथच एक नाव आहे हे माहीत आहे का? संस्कृत भाषेतील प्रत्येक अक्षरात स्वतःच्या तपःसामर्थ्याने अन्‌‍ चिंतनाने पूर्वीच्या ऋषिमुनींनी सखोल अर्थ भरून ठेवलाय. ‘अमंत्रं अक्षरं नास्ति’ म्हणजे असं एकही अक्षर नाही की ज्यात मंत्रसामर्थ्य भरलेलं नाही. ‘ज्ञ’ यज्ञातला किंवा ज्ञानातला जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच ‘ढ’ ढगातला सामर्थ्यवान आहे. व्यवहारातला ‘ढ’ नि ‘ज्ञ’ अक्षरांचा अर्थ दुय्यम आहे. हेच पहा ना… भा-ग-व-त या चार अक्षरांचा अर्थ आहे ‘भा’ म्हणजे प्रकाश (ज्ञानाचा, भक्तीचा, मुक्तीचा प्रकाश). या प्रकाशाच्या दिशेने ‘ग’ म्हणजे गमन किंवा प्रवास करण्यासाठी, ‘व’ म्हणजे वरेण्य म्हणजे श्रेष्ठ असलेली, ‘त’ म्हणजे तरणी म्हणजे नौका किंवा नाव. थोडक्यात म्हणजे, या संसारसागरातून तरून जाण्यासाठी समर्थ नाव म्हणजे पवित्र भागवत ग्रंथ. जशी श्रीरामनाम-नौका भवसागरी तराया.

एकदा स्वामी विवेकानंद नदी पार करण्यासाठी ऐलतीरावर उभे होते. ते पैलतीरी गेलेली नाव परतण्याची वाट पाहत होते. इतक्यात एक साधू आला नि म्हणाला, ‘एवढे मोठे स्वामी तुम्ही अन्‌‍ तुम्हाला नदी पार करण्यासाठी नावेची गरज भासते? मी पाण्यावरून चालण्याची सिद्धी मिळवली आहे. हे पहा…’ असं म्हणून तो सिद्ध साधू खरंच पाण्यावरून चालत गेला. नदी पार करून परतला. अशा तीन फेऱ्या मारल्या. विवेकानंदांकडे विजयी मुद्रेने पाहत असतानाच नाव परतली. नावाड्याला दोन पैसे देताना स्वामीजी त्या साधूला म्हणाले, ‘बारा वर्षं कठोर परिश्रम करून तुम्ही जी सिद्धी प्राप्त केली त्याची किंमत फक्त दोन पैसे एवढीच. कळलं ना?’ साधू अंतर्मुख झाला.

रामकृष्ण परमहंस एक कथा रंगवून सांगत. एका विद्वान पंडिताला परिसंवादात भाग घेण्यासाठी नदीच्या पलीकडे जायचे होते. त्याने विविध विषयांवरचे जाड-जाड ग्रंथ संदर्भासाठी बरोबर घेतले होते. नावेचा प्रवास सुरू झाल्यावर पंडितबुवा नावाड्याला म्हणाले, ‘तुला व्याकरण येते?’ ‘नाही बा!’ या नावाड्याच्या उत्तरावर पंडित म्हणाले, ‘मग तुझे एक चतुर्थांश जीवन वाया गेले. बरे गणित येते?’ ‘नाही बा’ या नावाड्याच्या भाबड्या उत्तरावर विद्वानमहाशय उद्गारले, ‘अरेरे, तुझे अर्धे जीवन वाया गेले.’ पुढे काही बोलणार इतक्यात नाव पाण्यातल्या भोवऱ्यात अडकून गरगरत पाण्याखाली जाऊ लागली. नावाड्याने नावेतून उडी मारताना पंडिताना विचारलं, ‘आपल्याला पोहायला येतं का?’ यावर नकारात्मक उत्तर दिल्यावर तो नावाडी त्यांना म्हणाला, ‘पोहायला येत नाही? मग तुमचं सारं जीवन वाया गेलं!’ आहे की नाही गंमत!

पू. गोंदवलेकर महाराजांचा एक मौलिक विचार आहे. ‘नाव जशी तुमच्या पायाला पाणीही न लागता तुम्हाला महासागरावरून नेते तशी नाम (रामनाम) ही नौका जीवनातील भोग भोगताना प्रतिकूल परिस्थितीचा पायांना स्पर्शही न होता आरामात हा भवसागर पार करून नेते. आपण ‘आ-रामात’ म्हणजे सर्वकाळी, सर्वस्थळी, सर्व प्रसंगात रामनामात म्हणजे कोणत्याही देवाच्या किंवा संतसद्गुरूच्या नामस्मरणात मात्र राहिलं पाहिजे.’ अर्थात ही स्वानुभवाची गोष्ट आहे. अखंड नामनौकेत राहून जीवनप्रवास आनंदात करूया.