नवेवाडे-वास्को येथे नानकनगर परीसरात तब्बल सहा दुचाक्या पेटवून दिल्याची घटना मंगळवारी पहाटे 3.30 वाजता घडली. वास्को पोलिसांत याप्रकरणी अज्ञाताविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवेवाडे-वास्को येथे मंगळवारी पहाटे 3.30 च्या दरम्यान दुचाक्यांना आग लावल्याचा प्रकार घडला. आधी चार दुचाक्यांना आग लावण्यात आली, त्यात चारही दुचाक्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यानंतर आणखी दोन दुचाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. स्थानिकांना याची चाहूल लागताच त्यांनी आग विझविण्याचा अथक प्रयत्न केला; मात्र चार दुचाक्या जळून खाक झाल्या, तर दोन दुचाक्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.
ॲक्टिव्हा 125 (जीए-06-एसी-0241), हिरो मायस्ट्रो (जीए-06-जे-9764), होंडा डिओ (जीए-06-एच-0262), ॲक्टिव्हा 125 (जी-06-क्यू-0915) या गाड्या या आगीत जळून खाक झाल्या, तर हिरो होंडा पॅशन प्रो (जीए-06-एच-1741) आणि एका पल्सर या दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वास्को पोलिसांना या घटनेचा पंचनामा केला. दुचाकीमालकांनी याबाबत संशय व्यक्त करून वास्को पोलिस स्थानकांत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वास्को पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक विठोबा देऊळकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.