धारगळ येथे अपघातात पुण्यातील युवकाचा मृत्यू

0
5

>> दुर्घटनेत दोघेजण जखमी

स्विफ्ट कार आणि क्रेन यांच्यात झालेल्या अपघातात पुणे येथील रिकी रवी बिनावत (२६) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्या वाहनातील दोन जखमी झाले. त्यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार चालू आहेत.

धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पणजीमार्गे पुण्याला जाणारी स्विफ्ट कार (एमएच १२ एचझेड २४१९) व क्रेन यांच्यात सकाळी आठ वाजता हा अपघात झाला. अपघातात निधी गोडसे (२७, कराड) व सुनील (कराड) हे दोघे गंभीर जखमी झाले.
मोपा विमानतळासाठी लिंक रस्ता करणार्‍या कंपनीच्या क्रेन सर्विस रस्त्याच्या खाली बाजूला वळवण्यात आली होती. त्याचवेळी वेगाने येणार्‍या स्विफ्ट कारने या क्रेनला धडक दिल्याने हा अपघात झाला.

मोप लिंक रस्त्यासाठी काम करणारी अनेक वाहने व मोठ्या क्रेन कार्यरत आहेत. अपघाताची माहिती स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व विचारपूस केली.

पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी या घटनेचा पंचनामा करून जखमींना इस्पितळामध्ये हलवण्यात आले. तर मृत्यू झालेल्या रिकी याचा मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.