दोन वर्षांत गोव्यातील सर्व खाणी सुरू होणार

0
8

>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे म्हापशातील प्रचारसभेत गोमंतकीयांना आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल म्हापशात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील खाण व्यवसायाबाबत दिलासादायक भाष्य करत गोमंतकीयांना आश्वस्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाला होता; मात्र केंद्र व राज्य सरकारच्या अथक प्रयत्नानंतर गोव्यातील 8 खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आणि आजच्या घडीला एका खाणीत खनिज उत्खननही सुरू झाले आहे. एवढेच नाही, तर येत्या 2 वर्षांत गोव्यातील सर्व खनिज खाणी सुरू होतील ही ‘मोदींची गॅरंटी’ आहे, असे आश्वासन अमित शहांनी या सभेत काल दिले.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने गोव्यातील खाण व्यवसाय ठप्प झाला. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक वेळा दिल्लीत खाणींच्या विषयावरून शिष्टमंडळ नेऊन आपल्यासोबत चर्चा केली. पंतप्रधानांची भेट घेतली आणि गोव्यातील खाणींचा लिलाव झाला. पहिल्या टप्प्यात 8 खाणपट्ट्यांचा लिलाव झाला असून, एका खाणपट्ट्यातून खनिज उत्खननही सुरू झाले आहे, असेही शहा म्हणाले.

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या समोरील नवीन बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत काल भाजपची विजय संकल्प रॅली पार पडली. या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, उमेदवार श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपो, मंत्री विश्वजीत राणे, रवी नाईक, सुदिन ढवळीकर, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, आमदार दिगंबर कामत, ज्योशुआ डिसोझा, उल्हास तुयेकर, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई आदी उपस्थित होते.

यावेळी शहांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. गोमंतकीय केवळ श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपो यांना मत देणार नाहीत, तर त्यांचे मत हे थेट मोदींना जाईल आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील. एका बाजूला 12 लाख कोटींचा घोटाळा करणारी इंडिया आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला 13 वर्षे मुख्यमंत्री व 10 वर्षे पंतप्रधानपदी असताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारे नरेंद्र मोदी आहेत, असे शहा म्हणाले.

काश्मीरचा गोवा आणि राजस्थानशी संबंध काय, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात. खर्गे 80 वर्षांचे आहेत; पण ते गोव्याच्या लोकांना ओळखत नाहीत. गोव्यातील प्रत्येक जण काश्मीरसाठी आपल्या प्राणांचे बलिदान द्यायला तयार आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून कलम 370 हटवले. आज श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा डौलाने फडकत आहे. मोदींनी काश्मीरला देशाशी जोडले, असेही शहा म्हणाले.

काँग्रेसने अनेक दशके राम मंदिराचा मुद्दा भरकटवला, लटकवत ठेवला; पण मोदींनी पाच वर्षांतच राम जन्मभूमीचा खटला जिंकला, भूमिपूजन केले आणि 22 जानेवारीला भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणपतिष्ठापनाही केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवारांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण पाठवले, पण ते आले नाहीत. ते ‘व्होट बँके’ला घाबरतात, अशी टीकाही शहा यांनी केली.
आजच्या घडीला काशी-विश्वनाथ कॉरिडोर बनतोय, सोमनाथ मंदिराला पुन्हा सुवर्णझळाळी मिळणार आहे. बद्रीनाथ, केदारनाथ या धार्मिक स्थळांचाही जीर्णोद्धार मोदी सरकारच्या काळात होत आहे. गोव्यात शिवरायांनी नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या मंदिराचा पुरातन वारसा कायम ठेवत त्याचे नूतनीकरण केले आहे, असेही शहा म्हणाले.

4 जूननंतर ‘काँग्रेस शोध यात्रा’ काढावी लागणार
काँग्रेसने मधल्या काळात भारत जोडो यात्रा काढली; पण ते गोव्यात आले नाहीत. ते छोट्या राज्यांना महत्त्व देत नाही. प्रदेश केवढाही छोटा असो, तो भारताचा हिस्सा आहे आणि गोवा भारतमातेच्या ललाटावरील तिलक आहे, जो पूर्ण ललाटाची सुंदरता वाढवतो. काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली खरी; पण 4 जूननंतर ‘काँग्रेस शोध यात्रा’ काढावी लागेल हे मात्र नक्की; कारण काँग्रेस शोधूनही सापडणार नाही, अशी खोचक टीका अमित शहांनी केली.

10 वर्षांत गोव्याला 35 हजार कोटी
पहिल्यांदा केंद्रात 10 वर्षे काँग्रेस सत्तेत होती, तर त्यानंतर 10 वर्षे भाजप सत्तेत आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने त्यावेळी गोव्याला 10 वर्षांत फक्त 6300 कोटी पाठवले. त्याउलट मोदींनी गेल्या 10 वर्षांत गोव्याला 35 हजार कोटींचा निधी दिला. तसेच पायाभूत सुविधांसाठी 11 हजार कोटी रुपये दिले, ही बाब देखील अमित शहांनी अधोरेखित केली.

गोव्यात हजारो कोटींचे मोठे प्रकल्प
मोदी सरकारने गोव्यातील विविध प्रकल्पांसाठी हजारो कोटींचा निधी दिला, त्यात मनोहर विमानतळासाठी 3000 कोटी, महामार्गांसाठी 1600 कोटी, झुआरी पुलासाठी 1500 कोटी, एमईएस जंक्शन ते बोगमाळो जंक्शन चारपदरी उड्डाणपुलासाठी 800 कोटी, केंद्राच्या 47 योजना राबवण्यासाठी 1000 कोटी, एनआयटीसाठी 400 कोटी निधी दिला, असेही अमित शहांनी सांगितले.

सभास्थळी 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
म्हापशातील अमित शहांच्या कालच्या सभेला उपस्थिती लावलेल्या कुडणे-साखळी येथील बाबुसो उत्तम वेरेकर या 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सभास्थळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना लगेचच आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मोदी सरकारच्या कामगिरीचा अमित शहांनी घेतला आढावा

यावेळी अमित शहांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला. मोदींनी 80 कोटी गरिबांच्या विकासासाठी काम केले. त्यांना मोफत रेशन पुरवले. 12 कोटी शौचालये बांधली, 4 कोटी लोकांना घरे दिली, 10 कोटी लोकांना गॅस कनेक्शन, 14 कोटी लोकांना नळजोडणी, 50 कोटी लोकांना आयुषमान भारत योजनेचा लाभ दिला. 130 कोटी लोकांना कोरोनाविरोधी लसीचे मोफत लसीकरण केले. उत्तर गोव्यासाठी केंद्राने किती निधी दिला, त्याची माहिती देखील शहांनी यावेळी दिली.

‘त्या’ माळेत गोव्याची दोन कमळे जोडा
देशाला नरेंद्र मोदी हेच सुरक्षित व समृद्ध करू शकतील हे ध्यानात ठेवून भाजपच्या उमेदवारांना निवडा. मला विश्वास आहे की गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळतील. निकालानंतर जी 400 कमळांची माळ बनेल, त्यात निश्चितच गोव्याची दोन कमळे असतील, असेही अमित शहा म्हणाले.

मोदींमुळे आज देश सुरक्षित
गेली 10 वर्षे नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित ठेवला. त्यापूर्वी 10 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी पाकिस्तानातून कोणीही उठसूठ येत होते, बॉम्बस्फोट करत होते आणि पळून जात होते. मात्र गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने दहशतवाद्यांचा समूळ नाश केला. पाकने उरी आणि पुलवामा हल्ला केला; पण 10 दिवसांतच त्यांच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला, असेही अमित शहा म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधान कोण होणार?
देव न करो, पण इंडिया आघाडीला बहुमत मिळाले तर पंतप्रधान कोण बनणार, असा सवाल अमित शहांनी केला. ममता बॅनर्जी, शरद पवार, स्टॅलिन, उद्धव ठाकरे की राहुल गांधी? हे लोक देश सांभाळू शकत नाहीत. जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार, अशी टीका त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या एका नेत्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, तुम्ही बहुमत मागताय; पण बहुमत मिळाले तर पंतप्रधान कोण होणार? त्यावर, आम्ही आळी-पाळीने हे पद वाटून घेऊ, असे तो म्हणाला. त्यांना पंतप्रधानपदाचे गांभीर्यच नाही, असे शहा म्हणाले.

‘इंडिया’कडून फक्त कुटुंबाचा विचार
दहशतवाद, नक्षलवाद यापासून देशाला इंडिया आघाडी सुरक्षित ठेवू शकत नाहीत. ते फक्त आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करतील. शरद पवारांना आपल्या मुलीची चिंता आहे, उद्धव ठाकरेंना मुलाची, ममता बॅनर्जींना भाच्याची, स्टॅलिन यांना पुत्राची आणि सोनिया गांधींना राहुल गांधींची चिंता आहे. जे आपल्या कुटुंबाचा विचार करतात, ते देशाचा, गोव्याचा विचार करू शकत नाही, असेही अमित शहा म्हणाले.