दोन चिरेखाणींत बुडून दोन युवकांचा मृत्यू

0
7

>> रेवोडा आणि नानोडा येथील घटना

रेवोडा येथील चिरेखाणीत मडगाव येथील राज लोटलीकर (21) या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची घटना काल रविवारी घडली. त्याचप्रमाणे नानोडा भटवाडी येथील एका चिरेखाणीत संतोष शेळके (19) हा धनगर समाजातील युवकाचा बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या संचालकांनी दिली.

मडगाव येथून सहा ते सातजणांच्या मित्रांचा एक गट रेवोडा येथे चिरेखाणीजवळ पिकनिकसाठी गेला होता. बंद असलेल्या व पाण्याने भरलेल्या या चिरेखाणीत हे मित्र आंघोळीसाठी उतरले असता त्यातील राज लोटलीकर हा युवक पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांना सापडू शकला नाही.

घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस व म्हापसा अग्निशामक दलाने धाव घेऊन अथक प्रयत्नांनंतर मृतदेह पाण्याबाहेर काढला. राज लोटलीकर हा फोंडा येथील नागेश फार्मच्या मालकाचा मुलगा आहे.
काही दिवसापूर्वी कासावली येथील चिरेखाणीच्या खंदकात एका 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच धारबांदोडा येथेही चिरेखाणीच्या खंदकात बुडून महिलेचा मृत्यू झाला होता. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या चिरेखाणींच्या खंदकांचा प्रश्न चर्चेस आला होता. या खाणींचे खंदक सभोवती कुंपण घालून बंद करावेत अशी मागणी सभागृहात सदस्यांनी केली होती आणि तसे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सभागृहात दिले होते.

नानोड्यात युवक बुडाला
भटवाडी – नानोडा येथील घटनेत सुमारे पंचवीस जणांचा गट या ठिकाणी सकाळपासून आला होता. संध्याकाळी चारच्या आसपास सदर युवक बुडाल्याची घटना घडल्याचे या वेळी सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डिचोली अग्निशामक दल व त्यानंतर नौदलाची जवान दाखल झाले. त्यांनी याठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली होती. त्यानतंर रात्री उशिरा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना मिळताच ते जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच पद्माकर मळीक तसेच स्थानिक सरपंच दिलीप वरक यांच्याबरोबर घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी डिचोलीचे मामलेदार यांना बोलावून घेतले तसेच याबाबतची माहिती डिचोली पोलीस स्थानकाला दिली. अशा खाणी बंदिस्त ठेवण्यात याव्यात असे निर्देश आमदारांनी मामलेदार आणि पोलिसांना दिले आहेत.