देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाऊन कायम

0
150

 

देशातील सध्याचा लॉकडाऊन उद्या दि. ३ मे रोजी संपणार असतानाच काल केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यात आणखी दोन आठवड्यांनी वाढ केली.या अनुषंगाने वरील मंत्रालयाने आपत्कालीन व्यवस्थान  कायदा २००५ साली काल एक आदेश जारी केला. त्यानुसार आता राष्ट्रीय लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ मार्च रोजी सर्व प्रथम लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर त्यात वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे.

पंतप्रधान मोदी व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात नुकत्याच झालेल्या व्हिडिओ बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याच्या काही राज्यांकडून सूचना झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर वरील निर्णय झाला आहे.

लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आतापर्यंत तो निर्णय लाभधारक ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विविध पातळ्यांवरील सर्वंकष आढावे व  फेरआढावे आणि देशातील सध्याच्या कोविड-१९ च्या स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ खाली लॉकडाऊनचा कालावधी ४ मे च्या पुढे वाढविण्याचा आदेश मंत्रालय जारी करीत आहे असे सदर आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही झोनमध्ये

देशभर ‘यांच्यावर’ बंदी

या आदेशानुसार लाल विभाग व कंटेनमेंट झोन्सबाहेर सायकल रिक्षा वाहतूक, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब, आंतर जिल्हा बसेस, केश कर्तनालये, स्पा-सलून्स यांच्यावर देशभरात बंदी राहणार आहे.

देशातील लाल, नारंगी किंवा हरित अशा कोणत्याही झोनमधील क्षेत्रांमध्ये विमान, रेल, मेट्रो, रस्तामार्गे आंतरराज्य प्रवासी वाहतूक, शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था या खुल्या ठेवता येणार नाहीत असे आदेशात म्हटले आहे. यांच्याप्रमाणेच धार्मिक स्थळे, हॉटेल्स, उपहारगृहे, क्रीडा मैदाने, चित्रपटगृहे, मॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, व्यायाम शाळा यांच्यावरही बंदी राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.