देखावा कशाला?

0
45

हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी अमली पदार्थ प्रकरणात गोवा पोलीस सहकार्य करीत नसल्याचा केलेला जाहीर आरोप गोव्याच्या पोलीस यंत्रणेच्या प्रतिष्ठेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगून गेला आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचे हैदराबाद पोलिसांनी अशा प्रकारचे कोणतेही सहकार्य गोवा पोलिसांकडे मागितले नव्हते, असे जरी स्पष्टीकरण दिले असले, तरी ‘बूँदसे गयी सो हौदसे नही आती’ म्हणतात ते घडले आहे. नुकतेच घडून गेलेले सोनाली फोगट हत्याप्रकरण आणि आता हा एका परराज्यातील जबाबदार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने केलेला हा गंभीर आरोप यामुळे गोव्याची केवळ देशभरच नव्हे, तर जगभरात नाचक्की झाली आहे.
हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांविरुद्ध मोठी आघाडी उघडली आहे, कारण तेलंगणामध्ये आणि शेजारच्या आंध्र प्रदेशामध्ये जो अमली पदार्थ व्यवहार होतो, तो गोव्यातूनच होतो याचे पक्के धागेदोरे हैदराबाद पोलिसांना मिळाले आहेत आणि त्यांची कारवाई गेले कित्येक महिने सातत्याने व निर्धारपूर्वक सुरू आहे. गोव्यातील एका तरुणाला गेल्या महिन्यात हैदराबादेत त्याबद्दल रंगेहाथ अटकही झाली. या संदर्भात अधिक चौकशीसाठी वा तपासासाठी हैदराबाद पोलिसांचे विशेष पथक गोव्यात आले असेल आणि त्यांनी गोवा पोलिसांना पूर्वसूचना दिलेली नसेल तर किनारपट्टीतील पोलिसांकडून संबंधित संशयितांना पूर्वसूचना दिली जाऊ शकते आणि आपली कारवाई फसू शकते हीच भीती त्यामागे असावी हे उघड आहे. सामान्य गुन्ह्यांमध्ये स्थानिक पोलिसांना विश्‍वासात घेण्याची प्रथा असली तरी अमली पदार्थांसारख्या आंतरराज्य गुन्ह्यांमध्ये अगदी शेवटच्या क्षणी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात असते, कारण अन्यथा बातमी बाहेर फुटण्याची आणि संशयित सावध होण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी पेडणे पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता गोव्याच्याच एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याने हरमल येथील अमली पदार्थ व्यावसायिकावर छापा मारला होता याचीही आठवण येथे करून द्यायला हरकत नसावी.
अमली पदार्थांसंदर्भात सरकार कितीही गर्जना करीत असले तरी प्रत्यक्षात राज्यात फोफावलेल्या या गैरव्यवहारावर अंकुश आणण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे हे सोनाली फोगट प्रकरणात पुन्हा एकदा सिद्ध झालेच आहे. हणजूणच्या शॅकमध्ये ज्या सहजतेने त्यांना अमली पदार्थ मिळाले ते पाहिल्यास हा व्यवसाय राज्यात, विशेषतः किनारपट्टीमध्ये किती खुलेआम चालला आहे याची पूर्ण कल्पना येते. हैदराबाद पोलिसांनी गेले काही महिने अमली पदार्थांविरोधात मोठी आघाडी उघडलेली आहे. त्यांनी तेलंगणातील जवळजवळ सहाशे अमली पदार्थ ग्राहकांची यादीच बनवली. त्यातील १७४ जणांची त्यांनी ओळख पटवली आणि त्यांना अमली पदार्थ कोण पुरवीत होते, त्याची तपशीलवार माहिती घेतली. त्यासाठी पूर्वी अमली पदार्थ तस्करीसाठी पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांची आणि बनावट ग्राहकांचीही मदत घेतली गेली. त्यातून जे समोर आले आहे ते धक्कादायक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येणारे सर्व अमली पदार्थ गोव्यातून तेथे पोहोचवले जातात हे त्या चौकशीतून समोर आले आणि त्याच माहितीच्या आधारे त्यांनी टाकलेल्या छाप्यात गोव्याचा तरुण पकडला गेला होता. मात्र, तेलंगण पोलिसांकडून चाललेल्या कारवाईमध्ये अडथळे आणण्याचे पद्धतशीर प्रयत्न गोव्यातून झाले. त्यासाठी तो तरुण बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांच्या माध्यमातून पोलिसांत नोंदवण्यात आली. संबंधित तरुण हा या व्यवसायातील छोटा मासा आहे. त्याला गोव्यातील जे मोठे मासे अमली पदार्थ पुरवीत होते, त्यांची नावे त्याने चौकशीत सांगितली आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात हैदराबाद पोलीस आहेत आणि त्याच कारवाईमध्ये खो घालण्याचा प्रयत्न गोव्यातील किनारपट्टी भागातील पोलिसांनी केला असे हैदराबाद पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे जसपाल सिंग यांनी सारवासारव करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हैदराबाद पोलिसांकडून या अमली पदार्थ तस्करीबाबत माहिती घेऊन कारवाईची चक्रे फिरवावीत. गदारोळ झाल्यानंतर परवा दोन छापे टाकण्याचा देखावा झाला. म्हणे १० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त झाले! ही काय चेष्टा आहे काय? अमली पदार्थांचा कोट्यवधींचा व्यवहार येथून होत असल्याचे पक्के पुरावे समोर असताना हे किरकोळ छापे कशासाठी? किनारपट्टीतील पोलीस स्थानकांत ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांची मालमत्ता तपासावी, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध राज्यभरात एक धडक कारवाई हाती घ्यावी आणि या बड्या माशांचा आणि त्यांच्या पोलीस आणि राजकारण्यांशी असलेल्या हातमिळवणीचा बीमोड करावा.