दूरचित्रवाणी माध्यमांच्या विश्वाची सफर ‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’

0
174

एडिटर्स चॉइस
–  परेश प्रभू

वरवर पाहता हे पुस्तक भारतात पाय रोवलेल्या एका विदेशी दूरचित्रवाणी समूहाविषयी आहे असे जरी भासले, तरी प्रत्यक्षात तो भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाच्या प्रांतातील मूलगामी स्थित्यंतरांचाच जणू इतिहास आहे. भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांचा चढउतारांचा प्रवास अतिशय समर्थपणे त्यात चित्रित करण्यात आला आहे.

कौन बनेगा करोडपती

खरे तर ‘कौन बनेगा करोडपती’ हे ‘हू वॉंटस् टू बी अ मिलिअनेर’ या ब्रिटीश कार्यक्रमाचे भारतीय रूप होते. त्याचे सुरवातीचे नाव ठेवले गेले होते, ‘कौन बनेगा लखपती’ कारण त्याचे संकल्पित बक्षीस होते एक लाख रुपये. या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती जेव्हा रूपर्ट मर्डोकला दिली गेली, तेव्हा त्याने एक लाख रुपये म्हणजे किती डॉलर असा प्रश्न केला. त्यावर उत्तर आले, ‘२१३३ डॉलर!’ मर्डोकला ही रक्कम किरकोळ वाटणे अगदी स्वाभाविक होते. त्याने पुढचा प्रश्न केला, ‘‘भारतीयांना किती रुपये जिंकणे हे स्वप्नवत वाटेल?’’ त्यावर उत्तर आले, ‘एक करोड!’ एक कोटी ही रक्कम भारतीयांसाठी आजही मोठीच आहे. मर्डोकने विचारले, ‘एक करोड म्हणजे किती डॉलर?’ समोरून उत्तर आले, ‘२१३३० डॉलर!’ लगेच मर्डोकचे फर्मान निघाले, ‘बक्षीस एक करोड करा…!’ मर्डोकच्या भव्यदिव्य कार्यपद्धतीची झलक दाखवण्यास हा किस्सा पुरेसा आहे.

प्रसारमाध्यमांचे विश्व विस्तारत चालले आहे. दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रातील समीकरणे उलटीपालटी करीत चालले आहे. एक काळ निर्विवादपणे वर्तमानपत्रांचा होता. त्याच्यापुढे दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांचे आव्हान उभे राहिले. वृत्तवाहिन्यांना सध्या न्यूजपोर्टल आणि मोबाईल ऍप्सनी आणि मनोरंजन वाहिन्यांना ऑनलाइन वेबसीरिजनी पछाडले आहे. हे चक्र चालूच राहणार आहे. परंतु या बदलत्या काळामध्ये देखील ठामपणे पाय रोवून उभे राहणे हे यातील प्रत्येक माध्यमापुढील खरे आव्हान आहे आणि आपापल्या परीने ही माध्यमे हे आव्हान पेलत आली आहेत.
भारतीय मनोरंजन उद्योग सध्या पूर्वीपेक्षा कैकपटींनी वाढला, विस्तारलेला आहे आणि दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चाललेला आहे.

एक काळ सरकारी मनोरंजन माध्यमांचा होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनला पर्याय नव्हता. हे सक्तीचे मनोरंजन जनतेच्या माथी मारले जात होते. परंतु हळूहळू का होईना, हे चित्र पालटत गेले आणि खासगी क्षेत्राने माध्यमांच्या क्षेत्रामध्ये चंचुप्रवेश करून आता सगळा आसमंत काबीज करून टाकलेला आहे. आज देशामध्ये अक्षरशः शेकडो खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यातही काही बड्या समूहांनी वर्तमानपत्रांपासून दूरचित्रवाणीपर्यंत आणि डीटीएचपासून ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप ऍप्सपर्यंत आपले बस्तान बसवले आहे. या सगळ्या घडामोडींचा सर्वंकष वेध घेणारे एक नवे कोरे पुस्तक या आठवड्यात वाचनात आले. वरवर पाहता ते भारतात पाय रोवलेल्या एका विदेशी दूरचित्रवाणी समूहाविषयी आहे असे जरी भासले, तरी प्रत्यक्षात तो भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाच्या प्रांतातील मूलगामी स्थित्यंतरांचाच जणू इतिहास आहे. भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांचा चढउतारांचा प्रवास अतिशय समर्थपणे त्यात चित्रित करण्यात आला आहे. पुस्तकाचे नाव आहे, ‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’ आणि लेखिका आहेत सुप्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ वनीता कोहली – खांडेकर. वर म्हटल्याप्रमाणे हा केवळ स्टार टीव्हीच्या भारतातील आगमनाचा आणि बस्तानाचा लेखाजोखा नाही; एकूणच माध्यम जगतामधील अटीतटीची स्पर्धा, आपले स्थान भक्कम करण्यासाठीचा संघर्ष, त्यावरील कार्यक्रम, मालिकांमागील आर्थिक गणिते अशा सर्वसामान्य प्रेक्षकांना बहुधा अज्ञात असलेल्या गोष्टींची सखोल, सविस्तर माहिती देणारे हे एक वाचनीय पुस्तक आहे.

‘स्टार टीव्ही’ म्हटले की अजूनही डोळ्यांसमोर पहिले नाव येते ते जागतिक माध्यमसम्राट रूपर्ट मर्डोकचे. एकेकाळी मर्डोकने जेव्हा भारतामध्ये ‘स्टार टीव्ही’च्या माध्यमातून पाऊल ठेवले, तेव्हा आता आपल्या संस्कृतीचे कसे होणार, आपल्या भारतीय मूल्यांचे काय होणार ही चिंता संस्कृतीप्रेमींना सतावत होती. परंतु आज मागे वळून पाहताना दिसते की उलट ‘स्टार’लाच भारतीय रूपरंग धारण करणे भाग पडले. स्थानिक भाषांतून कार्यक्रम प्रसारित केल्यावाचून तरणोपाय नाही हाही धडा त्यांना मिळाला. स्टार वाहिनीसमूहाची भारतातील ही सारी वाटचाल, त्यातील अडथळे, आव्हाने आणि त्यावर केलेली मात या सगळ्याचा लेखाजोखा या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो.

भारतामध्ये दूरदर्शनची मक्तेदारी प्रथमतः मोडीत काढली ‘झी’च्या सुभाष चंद्रांनी. त्यांचे ‘झी फॅक्टर’ हे आत्मचरित्र आधी इंग्रजीत व नंतर मराठीतही आलेले आहे. भारतातून खासगी वाहिन्यांना त्या काळात ‘अपलिंकिंग’ करण्यास परवानगी न दिल्याने हॉंगकॉंगमधून उपग्रहाला कार्यक्रमांचे ‘अपलिंकिंग’ करावे लागे. अवकाशात पाठवला गेलेला एक उपग्रह चुकीच्या जागी फेकला गेल्याने निकामी झाला होता. ‘नासा’ने तो वाचवला आणि आशियाई गुंतवणूकदारांना विकला. हा उपग्रह म्हणजे ‘एशियासॅट – १’ त्यावरील ट्रान्सपॉंडरांच्या मदतीनेच उपग्रह वाहिन्यांचे हे पर्व सुरू झाले. या उपग्रहावर मालकी असलेला हॉंगकॉंगचा उद्योगपती रीचर्ड ली याने या उपक्रमाला नाव दिले ‘सॅटलाइट टेलिव्हीजन एशिया रीजन’ म्हणजेच ‘स्टार!’ रीचर्ड लीकडून १९९३ साली माध्यम सम्राट रूपर्ट मर्डोकने आपल्या ‘न्यूजकॉर्प’च्या माध्यमातून तब्बल ८७० दशलक्ष डॉलरना ‘स्टार’समूहावर ताबा मिळवला. हीच ‘न्यूजकॉर्प’ नंतर ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ बनली. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ‘द वॉल्ट डिस्ने कंपनी’ ने मर्डोकची ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ तिच्या भारतातील व्यवसायासह विकत घेतलेली आहे.

त्यामुळे आज ‘स्टार’ च्या भारतातील ७० कोटी जनतेपर्यंत रोज पोहोचणार्‍या साठ वाहिन्यांवर ‘डिस्ने’ची मालकी आहे. एकेकाळची ‘स्टार न्यूज’ कोलकात्याच्या आनंदबझार पत्रिका समूहाच्या मालकीमुळे (जे इंग्रजी ‘टेलिग्राफ’ व बंगाली ‘आनंदबझार पत्रिका’ चालवतात) ‘एबीपी न्यूज’ बनलेली आहे. एकेकाळी केवळ दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मालकी असलेल्या ‘स्टार’चेच ‘हॉटस्टार’सारखे ओव्हर द टॉप किंवा ओटीटी मोबाईल ऍप आज तरुणाईत धुमाकूळ माजवीत आहे. या सगळ्या बदलांना आणि स्थित्यंतरांना समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.
‘स्टार’च्या माध्यमातून रुपर्ट मर्डोकने भारतामध्ये ज्या वाहिन्या उतरविल्या, त्यांनी येथील दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकांची आवडनिवडच पालटून टाकली. एकेकाळी दूरदर्शनवरील ‘रामायण’, ‘महाभारत’मुळे रस्ते ओस पडायचे, तो चमत्कार अमिताभ बच्चन संचालित ‘कौन बनेगा करोडपती’ने सुरवातीच्या काळात घडवून दाखवला, ‘क्यूंकी सॉंस भी कभी बहु थी’ने घराघरातील ‘किचन पॉलिटिक्स’ ची झलक दाखवली. ‘चॅनल व्ही’ने संगीताला वाहिलेली देशातील पहिली दूरचित्रवाणी वाहिनी होण्याचा मान मिळवला. ‘स्टार न्यूज’ ही देशातील पहिली खासगी वृत्तवाहिनी ठरली, बंगलुरूत स्टार समूहाने सुरू केलेली ‘न्यूजसिटी’ ही एफ एम वाहिनी देशातील पहिली खासगी एफ एम वाहिनी ठरली. हे एकेक टप्पे गाठताना अनंत अडचणी आल्या, ‘स्टार’ च्या ‘विदेशी’ असण्याचे धक्के तिला वारंवार खावे लागले, त्या सगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे. रीचर्ड ली, रुपर्ट मर्डोक, दूरदर्शनचे महासंचालकपद सोडून ‘स्टार’चे प्रमुखपद स्वीकारलेले रतिकांत बसू, सनसनाटी माजवणार्‍या शीना वोरा हत्या प्रकरणामुळे सध्या तुरुंगात असलेले ‘स्टार’चे माजी प्रमुख पीटर मुखर्जी, सध्याचे प्रमुख उदयशंकर ही सगळी या कहाणीतील मुख्य पात्रे आहेत. या प्रत्येकाने ‘स्टार’च्या भारतातील जडणघडणीत आणि एकूणच येथील दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्राला, मनोरंजन उद्योगाला दिलेले योगदान याचा हा सखोल वेध आहे.

अगदी सुरवातीच्या काळामध्ये ‘झी’ आणि ‘स्टार’ची हातमिळवणी होती. दोघांच्या करारात ठरले होते की ‘झी’ने केवळ हिंदीत आपल्या वाहिन्या चालवायच्या आणि ‘स्टार’ ने केवळ इंग्रजीत. त्यामुळे ‘स्टार’ने जेव्हा भारतात पाऊल ठेवले तेव्हा ‘द बोल्ड अँड ब्यूटीफूल’, ‘सांता बार्बारा’, ‘बेवॉच’ यासारखे पाश्‍चात्त्य माध्यमविश्वातील दुय्यम दर्जाचे कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. मर्डोकने पाश्‍चात्य माध्यम विश्वात अवलंबिलेल्या ‘टॅब्लॉईड संस्कृती’ला भारतात उतरवण्याचाच हा प्रयत्न होता, परंतु तो एका मर्यादेपलीकडे चालला नाही. त्यामुळे ‘स्टार’ ला गरज भासली भारतीय कुटुंबवत्सल प्रेक्षकांना साद घालतील अशा कार्यक्रमांची. असा एक कार्यक्रम त्यामुळे साकारला ज्याने पुढे इतिहास घडवला. तो कार्यक्रम होता, ‘कौन बनेगा करोडपती’! सुपरस्टार अमिताभ बच्चनने त्या कार्यक्रमाचे संचालकपद स्वीकारले आणि तेव्हा ‘स्टार प्लस’वरील त्या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले आणि ‘स्टार’ हे नाव घरोघरी पोहोचवले! एकता कपूरच्या बाबतीतही तसेच घडले. तिच्या बालाजी टेलिफिल्मस्‌ने ‘क्यूंकी सांस भी कभी बहू थी’ सुरू केली आणि ती मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली. घरोघरी पोहोचली. मग हा सिलसिला सुरू झाला. बातम्यांच्या बाबतीत सरकार विदेशी वाहिन्यांना परवानगी द्यायला तयार नव्हते. त्यामुळे सुरवातीला दूरदर्शनसाठी वृत्तविषयक कार्यक्रम निर्मिती करणार्‍या ‘एनडीटीव्ही’ ला स्टारने आपल्या दिमतीला घेतले आणि सुरू झाली वृत्तवाहिनी ‘स्टार न्यूज’. दूरचित्रवाणीवरील वृत्त सादरीकरणाचे सारे पारंपरिक आडाखेच त्यांनी उलटेपालटे केले.

‘स्टार’ चे भारतातील योगदान केवळ दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बाबतीतच नाही. आज घरोघरी जे डीटीएच पोहोचले, त्यासाठी देखील ‘झी’ सोबत हातमिळवणी करून ‘स्टार’ समूहाने सरकारशी संघर्ष केला आहे. तत्पूर्वी वाहिन्यांचे सारे वितरण गावोगावच्या केबलचालकांद्वारे व्हायचे आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड अंदाधुंदी होती. अंडरवर्ल्डच्या हाती शहरांतील केबलसेवांच्या नाड्या होत्या. डीटीएच आले आणि थेट ग्राहक आणि वाहिन्या यांचा संंबंध आला आणि व्यवहार पारदर्शक झाला. वास्तविक डीटीएचसाठी ‘स्टार’ने आधी अर्ज केला होता, परंतु ‘झी’ च्या डीश टीव्हीला आधी परवानगी मिळाली. ‘स्टार’ने २०ः८० या प्रमाणात टाटा समूहाशी हातमिळवणी केली आणि त्यातून जुलै २००५ साली साकारले ‘टाटा स्काय’, जो आज देशातील आघाडीचा डीटीएच ब्रँड आहे.

दरम्यानच्या काळात देशात अनेक नव्या वाहिन्या अवतरल्या. ‘स्टार’लाही ‘सोनी’, ‘कलर्स’ असे स्पर्धक निर्माण झाले. अशा वेळी ‘स्टार’ने भारतीय भाषांमध्ये उतरण्याचे ठरवले आणि त्यातूनच ‘स्टार प्रवाह’(मराठी), ‘स्टार जलसा’ (बांगला) वगैरे वगैरे प्रादेशिक वाहिन्यांचे युग आले. केरळचा एशियानेट समूह त्यांनी विकत घेतला, आंध्रचा ‘मा टीव्ही’ घेतला आणि बघता बघता ‘स्टार’समूहाने देश व्यापला. मग आले क्रीडाविषयक वाहिन्यांचे युग. ‘प्रो कबड्डी’,‘आयपीएल’ आदींच्या माध्यमातून ‘स्टार’ने क्रीडा प्रसारणामध्ये आघाडी घेतली आणि आजही त्या क्षेत्रात ‘स्टार स्पोर्टस्’ हे प्रमुख नाव आहे.

माध्यमांच्या दुनियेमध्ये आज नव्या तंत्रज्ञानानिशी नवे स्पर्धक तयार झाले आहेत. अमेरिकेत ‘नेटफ्लीक्स’ ह्या व्हिडिओ रेन्टल सेवेने व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा द्यायला सुरूवात केली आणि बघता बघता लोकप्रियता मिळवली. आज ‘नेटफ्लीक्स’ भारतात आली आहे आणि ठराविक मासिक वर्गणीत हवे ते कार्यक्रम, चित्रपट त्यावर पाहता येतात. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून ‘स्टार’ने आपली ‘हॉटस्टार’ ही सेवा विकसित केली आहे. आज या क्षेत्रात अनेक स्पर्धक अर्थातच आहेत. गुगलची ‘यू ट्यूब’ तर मोफतच आहे. शिवाय टाइम्स समूहाचा ‘एमएक्स प्लेयर’, रिलायन्सची मालकी असलेल्या वायकॉम १८ (कलर्स वाहिन्या) चे ‘वूट’, सोनीचे ‘सोनीलाइव्ह’, बालाजी टेलिफिल्म्सचे ‘ऑल्टबालाजी’, ‘इरॉस’ वाल्यांचे ‘इरॉसनाऊ’ असे कित्येक नवे पर्याय आज पारंपरिक दूरचित्रवाणी माध्यमांच्या दुनियेला नव्या वळणावर घेऊन जायला सिद्ध झाले आहेत. रिलायन्सच्या ‘जिओ’ने इंटरनेटच्या दरांमध्ये क्रांती घडवली त्यावर स्वार होत या सार्‍या इंटरनेट आधारित सेवा घोडदौड करीत आहेत.

आज ‘स्टार इंडिया’ ची मालकी असलेली मर्डोकची ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ ‘डिस्ने’च्या मालकीखाली आलेली आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘स्टार’ काय करणार याबाबत उत्सुकता आहे. ‘झी’ समूहापुढेही नवी आव्हाने उभी आहेत. ‘इंडिया टुडे’च्या ताज्या अंकातील भारतातील ‘द हाय अँड मायटी पॉवरलिस्ट’च्या नामावलीतून सुभाष चंद्रा गायब झालेले दिसताहेत. ‘झी’ समूह आपले काही भांडवल विकण्याच्या विचारात आहे. या सगळ्या आगामी घडामोडींचे नीट आकलन होण्यासाठी आजवरची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे आणि वनीता कोहली खांडेकर यांचे ‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’ त्यासाठीच आहे! भारतीय दूरचित्रवाणी माध्यमांच्या जगाची ही धावती सफर आपल्यालाही नक्कीच खिळवून ठेवील!
—–