दुसऱ्या पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

0
21

पत्नीच्या खून प्रकरणात पती अमितकुमार दास (49 वर्षे) याला जन्मठेप आणि 1.10 लाख रुपये दंडाची शिक्षा काल येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. कुडचिरे-डिचोली येथे वर्ष 2016 अमितकुमार याने दुसरी पत्नी हेलन सरकार (31) हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यापूर्वी अमितकुमार दास याने हणजूण येथे पहिली पत्नी मनदीपा हिचा देखील खून केल्याची कबुली दिली होती. या प्रकरणाचा खटला अद्यापही सुरू आहे.

अमितकुमार याने फेब्रुवारी 2016 मध्ये आसाममधील हेलन सरकार हिच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यानंतर पत्नी हेलन आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या पाच वर्षाच्या मुलीसोबत कुडचिरे-डिचोली येथे राहत होता. अमितकुमार हा सेल्समन म्हणून काम करत होता. 24 मार्च 2016 या दिवशी अमितकुमार आणि हेलन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर, अमितकुमार याने तिचा गळा आवळून खून केला होता आणि एका चिऱ्याच्या खाणीत तिचा मृतदेह फेकून दिला होता. मृतदेहावर मोठा दगड सुध्दा टाकला. त्या चिऱ्याच्या खाणीतून दुर्गंधी येत असल्याने डिचोली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास काम सुरू केले. त्यावेळी अमितकुमार याने पोलिसांना दगड पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी सखोल चौकशीमध्ये अमितकुमार याने हेलन हिचा खून केल्याची कबुली दिली.
तसेच, पहिली पत्नी मनदीपा हिचा हणजूण येथे समुद्र किनाऱ्यावर खून केल्याची कबुली दिली होती. पहिल्या पत्नीच्या खुनाचा खटला न्यायालयात सुरू आहे.