>> धारगळ-सुकेकुळण येथे ट्रकने दुचाकीचालकास चिरडले; एक जखमी; संतप्त जमावाने रास्ता रोको करत 2 क्रेन्स पेटवल्या
धारगळ-सुकेकुळण ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा ‘लिंक रोड’ तयार करणाऱ्या कंत्राटदार अशोका कंपनीच्या ट्रकच्या धडकेत काल एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला. सकाळी धारगळ-सुकेकुळण येथे हा अपघात घडला. मृत दुचाकीचालकाचे नाव नामदेव नारायण कांबळी (63, रा. शेमेचे आडवण) असे आहे. या अपघातानंतर संतप्त बनलेल्या जमावाने रास्ता रोको केला, तसेच अशोका कंपनीच्या यंत्रसामुग्रीची नासधूस करण्याबरोबरच दोन क्रेन्स देखील पेटवून दिल्या. तसेच जोपर्यंत मृत आणि जखमी व्यक्तीला नुकसानभरपाई आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत नामदेव कांबळी यांचा मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मोपा विमानतळ पोलीस आणि पेडणे पोलीस मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. अखेर कंत्राटदाराने नुकसानभरपाई देण्याची ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर आणि पोलिसांसमक्ष दिल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत हलवण्यात आला. दरम्यान, शेमेचे आडवण येथे काल रात्री नामदेव कांबळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर माहितीनुसार, काल सकाळी 11च्या सुमारास नामदेव कांबळी आणि काशिनाथ तुकाराम शेट्ये (64) हे दुचाकीवरून (क्र. जीए-11-सीसी-0838) धारगळ येथे जात होते. त्याचदरम्यान अशोका कंपनीच्या एका ट्रकची (क्र. एमएच-46-बीबी-2448) धडक बसून नामदेव कांबळी हे दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले, तर काशिनाथ शेट्ये हे बाहेर फेकले गेले. तेवढ्यावरच न थांबता ट्रकचालकाने 200 मीटरपर्यंत नामदेव कांबळी यांना फरफटत पुढे नेले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वसंत यादव याने लगेचच पळ काढला. त्यानंतर जखमी शेट्ये यांना लगेचच म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत मृत नामदेव कांबळी व जखमी व्यक्तीला नुकसानभरपाई दिली जात नाही, तसेच ट्रकचालकाला घटनास्थळी हजर केले जात नाही, तोपर्यंत ट्रकच्या चाकाखाली सापडलेला कांबळी यांचा मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. तसेच या ठिकाणची वाहतूक काही काळासाठी रोखून धरली. सोबतच अशोका कंपनीच्या दोन क्रेन्सना देखील आग लावली. त्यात दोन्ही क्रेन्स जळून खाक झाल्या.
सुके कुळण येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच पेडणे पोलीस आणि मोपा विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर हेही घटनास्थळी पोहोचले. जवळपास 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात होता.
यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु जोपर्यंत ट्रकचालक घटनास्थळी येत नाही आणि नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि मृतदेह सुद्धा हलवायला देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी कायम घेतली. त्यावर प्रवीण आर्लेकर यांनी संतप्त जमावाला शांत करत सर्व जबाबदारी आपण घेत असून, नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करू अशा प्रकारे आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावरही ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.
या लिंक रोडच्या कामाच्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यापूर्वी याच परिसरात झालेल्या अपघातात दोन स्थानिक व्यक्ती जायबंदी झाले आहेत. त्यांना ना सरकारने आणि ना कंपनीने नुकसानभरपाई दिली. त्यामुळे या प्रकरणात आत्ताच नुकसानभरपाई मिळावी, ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. अखेर कंत्राटदाराने नुकसानभरपाई देण्याची ग्वाही प्रवीण आर्लेकर आणि पोलिसांसमक्ष ग्रामस्थांना दिल्यानंतर 4 तासांनी पंचनामा करण्यात आला आणि ट्रकच्या चाकाखालून मृतदेह बाहेर काढून तो बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात हलवण्यात आला.
आग विझवण्यापासून अग्निशमन दलाला रोखले
संतप्त जमावाने अशोका कंपनीच्या दोन क्रेन जाळून टाकल्यानंतर त्यांना लागलेली आग विझवण्यासाठी म्हापसा आणि पेडणे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले; मात्र ग्रामस्थांनी दोन्ही बंब अडवले आणि त्यांना आग विझवण्यास मनाई केली.
नामदेव कांबळी यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार
या अपघातात मृत पावलेले नामदेव कांबळी यांच्यावर शेमेचे आडवान तुळसकरवाडी येथे रात्री साडेआठनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा विवाहित मुलगा, सून आणि दोन अविवाहित मुलगे असा परिवार आहे. नामदेव कांबळी हे पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेमध्ये काम करून निवृत्त झाले होते.