दिव्यत्वाची जेथे प्रचिती…

0
12
  • मिलिंद कारखानीस

गेली वीस वर्षे या सात्विक व प्रामाणिक चळवळीला तन-मन-धनाने वाहून घेतलेले आदरणीय श्री. कामत सर यांनी कृपया मंचावर यावे अशी नम्र विनंती आहे- मंचावरून घोषणा झाली. मी पहिल्यांदाच ‘विद्या भारती’च्या एका बैठकीत बसलो होतो. पाच मिनिटांनी पांढऱ्या केसांचे एक तरुण गृहस्थ मंचाकडे जाताना दिसले. पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला खरा, पण तो स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, विशेष आनंद, उपकृतता इत्यादी भावांचा मागमूसही दिसला नाही. दिसत होती ती मुख्यत्वेकरून कार्यक्रमाच्या पुढील प्रक्रियेच्या व्यवस्थेची ओढ!
नाव पुरुषोत्तम पांडुरंग कामत. जन्म 23-6-1942 रोजी बावळवाडा, माजाळी, जिल्हा कारवार येथे घरातच झाला. वडील वारले तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्यानंतर त्या सगळ्यांना त्यांच्या थोरल्या काकांनी आधार दिला. त्यांचं आजोळ अंकोल्यातलं बेळंबार.

1957 मध्ये पुरुषोत्तम सातव्या इयत्तेत असताना कारवार भागातून गोवामुक्तीच्या मागणीसाठी स्वयंप्रेरणेने बरेच लोक गोव्याच्या हद्दीत जाताना ते बघायचे. तिथे ते पोर्तुगीज सैनिकांकडून पकडले जायचे. त्यांना पोर्तुगीजांकडून मारहाण व्हायची व डोकी भादरून त्यांना माजाळीमार्गे गोव्याबाहेर पाठवलेले त्यांना बघायला मिळायचे.
कामत सर सांगत होते ः आमच्या पाच गावांचं एसएससी परीक्षेचं केंद्र सदाशिवगडला होतं. त्यावेळी 1961 मध्ये त्या परीक्षा केंद्रात सुमारे 400 मुले होती. त्या सगळ्यांमध्ये मी पहिला आलो होतो! त्याच वर्षी कारवारमध्ये आर्ट्स्‌‍ व सायन्स कॉलेज नव्यानेच सुरू झाले होते, तिथे मी प्रवेश घेतला व 1965 मध्ये बी.एस्सी. झालो. त्यानंतर मी युनियन हायस्कूल, माजाळी येथे दोन वर्षं शिक्षकाचं काम केलं. 1967 मध्ये धारवाडला युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये बी.एड्‌‍.चा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर गोव्यातील मांद्रे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून मी रूजू झालो आणि तेव्हापासून गोव्यात आहे. ती शाळा मराठी माध्यमातली होती. गोव्यातल्या त्या वेळच्या 80% शाळा या 1976 पर्यंत मराठी माध्यमाच्या होत्या. माझे शिक्षण कानडीमध्ये झाल्याने मला सुरुवातीला मराठी जरा जड जात असे. पण हळूहळू सवय झाली. तिथे मी तीन वर्षे होतो.

जून 1971 मध्ये तिथून मला कोरगावच्या कमलेश्वर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाच्या पदासाठी पाचारण करण्यात आले. मी तिथे रुजू झालो. तीही मराठी माध्यमाची शाळा होती. तिथे मी दहा वर्षे नोकरी केली. तिथे आमच्या शेजारी कामुलकर हायस्कूल नावाची एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती. ती इंग्रजी माध्यमाची असल्याने तिथे प्रवेश घेण्याकडे आसपासच्या गावांमधील विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असायचा. त्याच्या परिणामस्वरूप आमच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत होती. दोन्ही शाळांच्या व्यवस्थापकांमध्ये खटके उडायला लागले होते. अशा परिस्थितीत या दोन चांगल्या शिक्षणसंस्थांच्या संबंधांमध्ये वितुष्ट येऊ नये या हेतूने मी त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. वर्गीस यांच्याशी संपर्क साधून चर्चा घडवून आणून दोन्ही शाळांचे काही एकत्रित असे जोड-कार्यक्रम सुरू केले. त्याचा परिणाम चांगला झाला. पण त्याच्या पुढील वर्षी अचानक त्या इंग्रजी शाळेचे सरकारी अनुदान कर्मधर्मसंयोगाने बंद झाले. त्या शाळेची सरकारी मान्यता काढून घेण्यात आली व त्या शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग दोहोंना आमच्या कमलेश्वर शिक्षण संस्थेत विलीन करून घेण्यासंबंधी सरकारी आदेश निघाले. तेव्हा व्यवहाराचा पसारा प्रमाणाबाहेर वाढला खरा, पण आमच्या कमलेश्वर शिक्षण संस्थेने कालांतराने गाडी व्यवस्थित रुळावर आणली.

निवडणुकी दरम्यान उमेदवार श्री. विश्वनाथ आर्लेकर यांचे चिरंजीव श्री, राजेंद्र आर्लेकर यांची माझ्याशी ओळख झाली होती. त्यायोगे निवडणूक झाल्यानंतर एके दिवशी ते श्री. सुभाष देसाई व श्री. सुभाष वेलिंगकर यांना घेऊन कोरगावला माझ्या घरी आले व त्यांनी माझी वैचारिक दिशा राजकारणाकडून समाजकार्य व राष्ट्रकार्याकडे वळवली. त्यापूर्वी कधीही माझा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला नव्हता व संघकार्यात मी गुंतत गेलो.
1981 साली मला पार्से गावी सुरू असलेल्या श्री दुर्गा इंग्लिश स्कूल या आठवीपर्यंतच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक पद स्वीकारण्याचा प्रस्ताव आला. एक नवीन काम उभे करण्याचे आव्हान असल्याने तो प्रस्ताव मी स्वीकारला व दि. 1 जुलै 1981 रोजी त्या शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. कालांतराने व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमुळे नवी इमारत उभी होऊन ती शाळा चांगली वाढली. 2001 पर्यंत मी तिथे मुख्याध्यापक या नात्यानं माझं कर्तव्य बजावलं. त्यानंतर मी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला व दि. 30 एप्रिल 2001 या दिवशी शाळेच्या जबाबदारीतून मुक्त झालो.
एक दिवस मी कोणत्या तरी कामाच्या योगाने पर्वरीला प्रबोधन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीयुत सुभाष वेलिंगकर सर यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी सहजच त्यांनी मला ‘आता निवृत्तीनंतर तुमचा काय विचार आहे?’ असा प्रश्न केला. तेव्हा लगेच ‘मी कोणतेही समाजोपयोगी काम करायला तयार आहे’ असं त्यांना तितक्याच सहजपणे सांगितले.

तेव्हा राज्यातल्या शिक्षण क्षेत्राची प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी होती की व्यवस्थित चालत असलेल्या मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळा राज्य सरकारने सरळ सरळ बंद केल्या होत्या! राज्य सरकारच्या या अनपेक्षित पावित्र्यामुळे आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षण मराठीमधून देऊ इच्छिणाऱ्या गोमंतकीय पालकांवर मोठेच सांस्कृतिक संकट कोसळले होते! वेलिंगकर सरांनी ‘विद्याभारती- गोवा’ या संघपरिवाराच्या संस्थेच्या पुढाकाराने त्या सगळ्या 31 शाळा चालवायला घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवला. त्याला सरकारने मोठ्या मिनतवारीने मान्यता दिली खरी! पण अटीही घातल्या. श्री. सुभाष वेलिंगकर सरांनी सदर सगळ्या म्हणजे 31 शाळांच्या दैनंदिन व्यवस्थापनाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा आपला मानस सांगितला. हे महत्त्वाचे सामाजिक कार्य असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले आणि मी त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर आम्हाला अनेक दिव्यातून जावे लागले.
आता गेली दोन दशकांच्या वर मी विद्याभारती संस्थेच्या कामात आहे. मी व माझी सौभाग्यवती आम्हा दोघांना पुरेसे निवृत्तिवेतन मिळते. विद्याभारती संस्थेचे काम मी समाजऋण फेडण्यासाठी करत असल्यामुळे, पहिल्यापासून संस्थेकडून काहीही आर्थिक मदत स्वीकारली नाही आणि मला त्याची अपेक्षाही नाही. हे काम मी स्वेच्छेने करत आलोय व मला त्यात आयुष्याचे समाधान आहे.