दहशतवादाचे दूत

0
13

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित एकाला कुर्टी – फोंडा येथून राष्ट्रीय तपास संस्थेने नुकतीच अटक केली. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे जरूरी आहे, ती म्हणजे पीएफआयला अद्याप सरकारने दहशतवादी संघटना घोषित केलेले नाही. मात्र, तिला बेकायदेशीर संघटना ठरवलेले आहे व तिच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातलेली आहे. म्हणजे, एनआयएने यूएपीए कायदा, 1967 च्या कलम 35 खाली देशातील ज्या 54 संघटनांना दहशतवादी संघटना घोषित केलेले आहे, त्यात ‘सिमी’ येते, पण ‘सिमी’ वरील बंदीनंतर केरळ, कर्नाटक व तामीळनाडूतील तीन संघटनांच्या विलीनीकरणाने बनलेली ‘पीएफआय’ येत नाही. मात्र, याच कायद्याच्या कलम 3 खाली ज्या 14 संघटना ‘बेकायदेशीर’ घोषित केल्या गेल्या आहेत, त्यात पीएफआय आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटना, म्हणजे कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, नॅशनल विमेन्स फ्रंट, ज्युनियर फ्रंट, रहब इंडिया फाऊंडेशन, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन, ऑल इंडिया इमाम्स कौन्सील, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईटस्‌‍ ऑर्गनायझेशन यांचा समावेश होतो. या संघटनांची नावे साळसूद आहेत. लोकशाहीचे आणि मानवाधिकारांचे कैवारी असल्याचा आव आणून, परंतु प्रत्यक्षात या सर्व संघटनांच्या माध्यमातून देशाला 2047 सालापर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या एका व्यापक ध्येयाखाली ही संघटना कार्यरत होती असे सरकारचे म्हणणे आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दहशतवाद, हत्या, हिंसक हल्ले, कायदेभंग असे गंभीर गुन्हे असल्याने गेल्या वर्षी त्या संघटनेवर बंदी घातली गेली व गोव्यासह देशाच्या विविध भागांत तिच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली. बंदी असूनही या संघटनेचे विघातक कार्य देशाच्या विविध भागांत सुरू असल्याचे एनआयएच्या ध्यानी आले आणि त्यातूनच परवाची कारवाई झाली आहे.
बिहारमधील फुलवारी शरीफ येथे गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन दिवसांचे एक शारीरिक प्रशिक्षण शिबिर झाले होते. त्या शिबिरात जे सामील झाले होते, त्यांच्या कुंडल्या एनआयएने मांडल्या आणि त्यांच्याच आधारे देशभरात सतत छापे पडत आहेत. परवा गोव्याबरोबरच बिहारमधील आठ जिल्ह्यांत, तसेच उत्तर प्रदेशमध्ये दोन ठिकाणी आणि पंजाबमध्ये एका ठिकाणी छापा पडला. गोव्यात केवळ कुर्टी येथे छापा मारला गेला आहे. तो फातोर्ड्यात मारला गेल्याची अफवा राजकारणप्रेरित दिसते. एनआयएने केलेली कारवाई त्यांच्या हाती असलेल्या पक्क्या माहितीच्या आधारेच केलेली असेल, त्यामुळे त्याबाबत कोणी शंका घेण्याचे कारण नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठीच फोंड्यातील सदर छापा पहाटे चार वाजता मारला गेला हे उघड आहे. परवाच्या छापेमारीत एकूण सोळा संशयितांना ताब्यात घेतले गेले आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत फुलवारी शरीफच्या त्या प्रकरणात एकूण साठ ठिकाणी छापे पडले आहेत आणि तेरा लोकांना अटक झालेली आहे. त्या तेराजणांशी या संशयितांचा काय संबंध होता याची छानबिन आता एनआयए करील व त्यानुसार पुढील कारवाई होईल.
पीएफआयच्या कारवाया इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही सुरू होत्या हे यापूर्वी दिसलेच आहे. गोव्यातील सामाजिक सलोख्याला सुरुंग लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न या संघटनेच्या म्होरक्यांकडून साळसूदपणे चालले होते. एनआयएच्या हाती हे प्रकरण गेले आणि हा बुरखा फाटला. समाजामध्ये आणि विशेषतः मुसलमान समाजामध्ये धर्मांधतेचे आणि अराष्ट्रीयत्वाचे विष कालवू पाहणाऱ्या अशा संघटना आणि व्यक्तींची कड घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. एनआयएला तिचे काम करू द्यावे. अशा व्यक्ती समाजात साळसूद चेहऱ्यानेच वावरत असतात. पुण्यात अलीकडेच पडलेल्या छाप्यात तर एका शाळेचे दोन मजले दहशतवादी प्रशिक्षणासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कुर्टी फोंड्यात पकडल्या गेलेल्या या संशयिताची कसून चौकशी झाली पाहिजे. तो ‘मुफ्ती’ आहे, म्हणजे इस्लामी कायद्याचा जाणकार म्हणवतो आहे. परंतु तो येथील मुसलमान समाजामध्ये कोणते विष कालवत होता, कोण कोण त्याच्या संपर्कात आलेले होते, कोणती कटकारस्थाने त्याच्या घरी शिजत होती या साऱ्याचा गोवा पोलिसांनीही समांतर तपास करावा लागेल. पीएफआयच्या संपर्कात आलेले लोकच पुढे आयसिसला जाऊन मिळाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दहशतवादी निर्मितीचे हे संभाव्य कारखाने वेळीच उद्ध्वस्त केले जाण्याची गरज आहे. अशाच विषारी प्रचारातून दहशतवादी निर्माण होत असतात आणि पुढे निरपराधांचा जीव घेत असतात. आज देशातील दहशतवाद जर नियंत्रणात असेल, तर त्याचे खरे कारण एनआयएने अशा लोकांच्या आवळलेल्या मुसक्या हेच आहे.