24 C
Panjim
Friday, November 27, 2020

दसरा सण मोठा…

  • मीना समुद्र

घट हे मानवी देहाचेच प्रतीक आणि तेवता दीप म्हणजे त्या देहात जागणारे चैतन्य. ते चैतन्य कामाधामातून उत्साहाने सळसळत राहते, नाना कलांद्वारे व्यक्त होते, नाना कल्पना समूर्त करते. या भावना, चेतना, कल्पनांवर प्रेमाचे, स्नेहाचे सिंचन केले की त्या घटातल्या बीजासारख्या अंकुरतात, तरारतात आणि त्या सृजनाचा आनंद प्रथम देवाला अर्पण करून मग आपण वर्षभर तो वाटतो, लुटतो.

आज आश्‍विन शुक्ल दशमी म्हणजेच दसर्‍याचा वर्षसण. संपूर्ण वर्षभरातील साडेतीन सुमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेला हा संपूर्ण शुभदिवस. अत्यंत पवित्र दिवस. यंदा तर आजपासून उद्यापर्यंत दसर्‍याची पर्वणी असल्याने कोणतेही नवीन काम, धार्मिक कार्य, गृहप्रवेश, मंगलसमारंभ या दिवशी आपण सुरू करू शकतो आणि ती सुयशदायी, सुफल होण्याची मंगलकामना मनात बाळगतो.

नवरात्राची समाप्ती होऊन असा दसरा उजाडला की आजही ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या शालेय वयातल्या ओळी ओठांवर येतात आणि मनात एक लहान मूल आनंदानं नाचू लागतं. खरं तर घटस्थापनेपासूनच या आनंदाची प्रतिष्ठापना व्हायला सुरुवात होते, आणि घटात पेरलेल्या नवधान्यांचे बीजांकुर वाढत जातात तसतसा मनालाही रसरसत्या चैतन्याचा हिरवा तजेला चढू लागतो आणि घटात किंवा घटाजवळ लावलेला नंदादीप मनात नवआशा उजळत तेवत राहतो. घट हे मानवी देहाचेच प्रतीक आणि तेवता दीप म्हणजे त्या देहात जागणारे चैतन्य, त्यातले प्राण. ते चैतन्य कामाधामातून उत्साहाने सळसळत राहते, नाना कलांद्वारे व्यक्त होते, नाना कल्पना समूर्त करते. या भावना, चेतना, कल्पनांवर प्रेमाचे, स्नेहाचे सिंचन केले की त्या घटातल्या बीजासारख्या अंकुरतात, तरारतात आणि त्या सृजनाचा आनंद प्रथम देवाला अर्पण करून मग आपण वर्षभर तो वाटतो, लुटतो.

दसर्‍याच्या या आनंदाची कारणेही अनेक. वातावरणातला बदल हे त्याचे मुख्य कारण. पाऊसकाळात सर्वत्र काळोख आणि मळभदाटी असल्याने एक साचेलपण मनातही दाटते. पण नवरात्रीचा काळ म्हणजे या काळोखावर, या अंधारावर प्रकाशाची मात. बद्धतेवर मुक्ततेची मात. काबाडकष्टातूनच निर्माण होणार्‍या सुफलतेची कष्टावर मात. नैराश्यावर आशेची मात. दुष्ट, संतप्त प्रवृत्तींवर गारव्याची मात. अशुभावर शुभाची आणि अमंगलावर मंगलाची मात. ही मात करताना अभूतपूर्व धैर्य, संयम अंगी बाळगावा लागतो आणि आपल्या सार्‍या शक्ती, सामर्थ्य एकवटून प्राणपणाने झुंजावे लागते. आणि मग जो विजय प्राप्त होतो तो निर्भेळ, निर्भर आनंदाचाच असतो.
नवरात्रीत सरस्वती, लक्ष्मी, अंबा, दुर्गा, कालिका अशा सार्‍या शक्ती एकवटल्या. दुर्गेला सर्व दैवी, नवविधा शक्ती साहाय्यभूत झाल्या आणि नऊ दिवस युद्ध करून दुर्गेने दुष्ट आसुरी शक्तींचा निःपात केला. महिषासुराचा वध केल्याने ती महिषासुरमर्दिनी झाली आणि या विजयाचा आनंद म्हणून १० व्या दिवशी ‘विजयादशमी’ साजरी करण्याची प्रथा पडली. महाबलाढ्य लंकेश्‍वर रावणावर श्रीरामाने विजय मिळविला तोही याच दिवशी. विजय साजरा करणे म्हणजेच आनंद साजरा करणे. हा आनंद मग रंगीत रांगोळ्या, गुढ्या-तोरणे उभारून सार्‍या प्रजाजनांनी आणि सार्‍या लोकांनी त्याकाळी व्यक्त केला. त्याचीच सुखदायी आठवण म्हणून आपण मोठ्या जल्लोषात दसरा साजरा करतो. ज्ञानदायिनी सरस्वतीची पूजा करतो. सर्व आयुधांची- विजय मिळवून देणार्‍या साधनांची- आणि पुढे मग आजही आपल्याला सर्वप्रकारे सुसह्य, सुविहित जीवन जगण्यासाठी साहाय्यभूत होणार्‍या सार्‍या साधनांची कृतज्ञतेने आठवण करून त्यांना फुलं, हारांनी नटवतो, सजवतो. केशरी, सोनपिवळ्या झेंडूची आणि अतिशय पवित्र, शुभ अशा आंब्याच्या पानांची गुंफण करून घरांना तोरणे लावतो. आणि घराबाहेरही आनंदप्रकटन गुढ्या-पताकांनी करतो. दुःख, दारिद्य्र, अज्ञान, अनारोग्य, अशुभ, अभद्र, अमंगल दूर करणार्‍या आणि वांछित, ऐहिक, आध्यात्मिक सुखे प्रदान करणार्‍या देवीचे स्तवन करतो. सप्तशतीपाठाचे वाचन करतो. विश्‍वमंगलाची प्रार्थना करतो.

कुठलाही आनंद हा फक्त स्वतःपुरता न ठेवता तो वाटायचा असतो. त्यामुळे तो द्विगुणितच नव्हे तर शतगुणित होतो. रामविजयाचा आनंद प्रतीकरूप रावणदहन करून आपण साजरा करतो. घरात सणासुदीचे पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदीसारखे गोडधोड पदार्थ बनवून आपण भोजन करतो. पूजाअर्चा, नवीन नवीन वस्त्रे, कार्यारंभ किंवा शुभारंभ, विद्यारंभही करतो. या सगळ्या गोष्टींबरोबरच सीमोल्लंघन करून सोने लुटून आणून ते सर्वांना वाटतो हेही त्या आनंदाचे रूप. हे सोने म्हणजे काय असते? आपट्याची जोडपाने. असेच हे सोने लुटून सर्वांची हृदये आनंदाने जोडलेली राहावीत हीच कल्पना यामागे असावी. शिवाय घटात छोट्या स्वरूपात लावलेले अंकुरलेले तृणांकूर म्हणजेही आपल्या शेताभातातील पिकांचे प्रतीक. अन्नधान्य म्हणजेही सोनेच. तेही आपण लुटतो.
प्राचीन भारतासारख्या समृद्ध देशात सोन्याचा धूर निघत असे, तिथेही सोन्याच्या लुटण्या-वाटण्याची गोष्ट खरेच घडत असावी असे वाटल्यास नवल नाही. पण ही पाने आपट्याचीच का हे सांगणारी कथा भारतीयांच्या नीतिमूल्यांचे दर्शन घडविणारी म्हणूनच ती कथा खूप भावून जाते, मनाला भिडते.

उदात्त नीतिमूल्ये असणारी, ती जिवापाड जपणारी, स्वतःशी प्रामाणिक असणारी आपल्या देशाची परंपरा! आजच्या घोर संकटकाळात आणि एकूणच आजच्या काळात स्वार्थांध लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक आणि लूट करतात. ती मात्र या परंपरेला साजेशी नसून मानवतेला कलंक लावणारी आहे. आपले ते आपले आणि दुसर्‍याचे तेही आपलेच म्हणणार्‍या स्वार्थी, भ्रष्टाचारी लोकांना कौत्साच्या कथेची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. सहयोग, संयम, निःस्वार्थता, निरपेक्षता यांची कास धरून योग्य ती काळजी घेत, कोरोनावर विजय मिळवून खरी विजयादशमी आपण साजरी करूया. माणुसकीचा हा संकल्प सिद्धीला जाऊन सर्वांची विजयादशमी मोठ्या आनंदात साजरी होवो हीच शुभेच्छा!!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

कर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा

ज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...

बांधकाम उद्योगाला चालना

शशांक मो. गुळगुळे बांधून तयार असलेली पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही...

‘आयएसएल’चा थरार

सुधाकर रामचंद्र नाईक अखिल भारतीय ङ्गुटबॉल महासंघाच्या सहयोगात २०१४ पासून ‘हिरो आयएसएल’ या प्रतियोगितेस प्रारंभ झालेला असून सातवे...

बालपण दे गा देवा!

मीना समुद्र ही लहानगी सदासतेज, चैतन्याने रसरसलेली, कुतूहलानं टुकूटुकू सगळं पाहणारी, बोबड्या चिमखड्या बोलांनी सर्वांना रिझवणारी, गळामिठी घालून...

शेती-संस्कृतीचा दीपोत्सव

डॉ. जयंती नायक दिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने...