23.8 C
Panjim
Friday, November 27, 2020

दसरा आणि सीमोल्लंघन

  • प्रा. रमेश सप्रे

पूर्वीची सांस्कृतिक कोवळीक जाऊन आजकाल याला बाजारू स्वरूप आलंय. संस्कृती कुठे नि केव्हा निसटली हे सांगता येत नाही; पण कशी निसटली हे सांगता येईल. सध्याच्या मार्केटिंगच्या माहोलात असं घडणं अनिवार्यच होतं कदाचित…

गणेशोत्सव झाला की जशी स्मरणसाखळी असते तशी सणसाखळी सुरू होते. नवरात्री, दसरा, दिवाळी असे एकाहून एक दमदार सण येतात नि ते उमेदीने, उत्साहाने साजरेही केले जातात.
आश्‍विन उजाडला की शरद ऋतू आरंभ होतो. शरदाची वैशिष्ट्ये दोन. एक म्हणजे याला पूर्तीचा ऋतू मानतात. पावसानंतर जलाशय भरलेले असतात. अगदी अंगणातली माहेरवाशीण विहीरसुद्धा. शेतातली पिकं कापून कोठारं भरली जातात. म्हणूनच वसंत ऋतू कितीही काव्यात्म, रोमँटिक असला तरी शुभेच्छा देताना ‘जीवेत् शरदः शतम्’ असं म्हटलं जातं. शरदाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शरदाचं चांदणं. प्रत्येक रात्र अधिकाधिक उजळत जाते. निथळत राहते चंद्रप्रकाशानं. याचा कळस म्हणजे शरदपौर्णिमा… आपली कोजागरी पौर्णिमा! भाद्रपदातल्या महालयानंतर (महाळानंतर) नव्या सृष्टीची बीजं घेऊन येते आश्‍विन शुद्ध प्रतिपदा… घटस्थापना… नवरात्रीतली पहिली प्रसन्न रात्र.

घटस्थापना म्हणजे नुसती घटाची स्थापना नव्हे, तर घटात चैतन्याची स्थापना. नवसर्जनाच्या बीजाची- अंकुराची स्थापना. त्याचबरोबर अनेक द्वारं (छिद्रं) असलेल्या घटासारख्या दीपाच्या आत प्रकाशबीजाची- ज्योतीची स्थापना. याला म्हणतात दीपगर्भा. हा दीप ज्यातून सर्व दिशांनी प्रकाश बाहेर प्रकटतो- त्याला मध्ये केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती केलं जाणारं पारंपरिक लोकनृत्य गर्भा किंवा गरबा. पूर्वीच्या या हृद्य सणाला आज काहीसं उत्सवी, प्रदर्शनी, दिखावटी रूप येऊ लागलंय. श्रीकृष्णगोपींची रासक्रीडा मागे पडून आता फक्त झगमगीत वस्त्रीत, रंगीबेरंगी प्रकाशात, अतिशय मोठ्या (क्वचित् कर्णकर्कश्श) आवाजात दांडीनृत्याचं (खरं तर दांडीडान्सचं) भव्य आयोजन केलं जातं. टिपेच्या स्वरात बोलणार्‍या डी.जे.कडून (डी म्हणजे दांडिया नव्हे तर डिस्को) या भावपूर्ण उत्सवाचा इव्हेंट बनतो. मग जाहिराती, सेलेब्रेटिज इ. सर्व ओघानं आलंच.
पूर्वीची सांस्कृतिक कोवळीक जाऊन आजकाल याला बाजारू स्वरूप आलंय. संस्कृती कुठे नि केव्हा निसटली हे सांगता येत नाही; पण कशी निसटली हे सांगता येईल. सध्याच्या मार्केटिंगच्या माहोलात असं घडणं अनिवार्य होतं. असो.

आपण दसरा-कोजागरीचा सांस्कृतिकदृष्ट्या विचार करू. हे स्मरणरंजन (नोस्टाल्जिया) ठरू नये एवढंच!
नवरात्री हा देवीशक्तीचा उत्सव. रोज रात्री देवीचं नवं रूप, नवा अवतार. वेशभूषा, केशभूषा सारं रोज नव्या नवलाईचं. खरं तर देवीचा त्वेष, आवेशसुद्धा तितकाच महत्त्वाचा. कारण नवव्या रात्री महिषासुराला कडोविकडीच्या युद्धात चारीमुंड्या चीत करणारी ही रणरागिणी दुर्गा आहे. चंडी, काली अशी उग्रस्वरूपा आहे. काही ठिकाणी पारंपरिक विभागणी केली जाते. तीन रात्री लक्ष्मीच्या, तीन रात्री कालीच्या तर तीन रात्री सरस्वतीच्या. त्याप्रमाणे उत्सव. लक्ष्मीच्या दिवसांत (खरं तर रात्री) घागरी फुंकणे म्हणजे घागरी, सुपं नाचवत त्यात प्राण फुंकणे. गृहिणीने आपल्या नित्य वापरात असलेल्या वस्तूंमध्ये फुंकर घालत प्राण फुंकून त्यांच्यात नवचैतन्य आणायचं असतं. अशा पाच वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे याला पंचयज्ञ म्हटले जाते. या पाच वस्तू म्हणजे चूल, झाडू, कळशी, जातं, मुसळ. पूर्वीची जीवनपद्धती लक्षात घेतली तर या वस्तूंचं- त्यांच्यातील संसारोपयोगी शक्तीचं महत्त्व कळून येईल. या सर्वांना गृहलक्ष्मी मानून, रोजच्या वापरापूर्वी हळदकुंकू वाहून मनोभावे नमस्कार केला जाई. अतिशय कृतज्ञभावनेनं त्यांचा आपले उपकारकर्ते म्हणून वापर केला जाई. काळाच्या ओघात हे संस्कार लुप्त झाले. काही कर्मकांडं मात्र उरलीयत. असो.
नवरात्री हा चैतन्याचा, शक्तिपूजनाचा उत्सव असतो. त्यानंतर येणारा दसरा हा तर विजयोत्सव असतो. विजयादशमीच म्हणतात त्याला. या दिवसाशी अनेक पौराणिक, ऐतिहासिक घटना जोडलेल्या आहेत.

रामाचं अयोध्येत आगमन
रामायणातील कथानकाबद्दल आम्हा भारतीयांना चांगली माहिती असते. चौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामाचं (विष्णूच्या सातव्या अवताराचं) अवतारकार्य बरंचसं पूर्ण झालं. परित्राणाय साधूनाम् म्हणून ऋषींचं रक्षण; विनाशाय च दुष्कृताम् म्हणून दुष्ट राक्षसांचं निर्दालन (विनाश); धर्मसंस्थापनार्थाय म्हणून संकटात सापडलेली यज्ञसंस्कृती राक्षसांच्या आतंकापासून मुक्त केली. वनवासाच्या अंतिम चरणात रावणाकडून सीतामैय्याचं अपहरण. सीतामुक्तीसाठी श्रीरामाचं लंकेकडे जाणं, रावणाशी युद्ध करून त्याला मारणं, नंतर चौदा वर्षं संपत आली म्हणून अयोध्येत परतणं. हा दिवस विजयादशमीचा म्हणजेच दसर्‍याचा. या दिवशी खूप प्राचीन काळी घडलेल्या रावणसंहाराची स्मृती म्हणून रावणाच्या दशमुखी पुतळ्याचे समारंभपूर्वक दहन केले जाते. असेच दहन काही ठिकाणी नरकासुराच्या पुतळ्यांचेही केले जाते. पण यातला प्रतीकात्मक संदेश विसरल्यामुळे समाजाच्या तसेच व्यक्तींच्या मनावर अपेक्षित संस्कार घडत नाहीत.

काळाच्या ओघात राम-कृष्ण जशी दैवतं बनतात, तसेच रावण, कंस हे खलपुरुष बनतात. नरक तयार करून त्यावर अधिराज्य गाजवतो तो नरकासुर. आज समाजात अनेकानेक रावण, कंस, नरकासुर आहेत. त्यांच्या मूर्ती जाळण्याचा आपण केवळ दिखावटी समारंभच करून थांबलो नाही तर अशा सांस्कृतिक समारंभांना देशी-विदेशी पर्यटकांचं आकर्षण बनवलं. उत्तर भारतात रामलीलेच्या प्रमाणात अतिभव्य, क्वचित नेत्रदीपक असे पर्यटनस्नेही समारंभ साजरे केले जातात. यात राम, कृष्ण या अवतारी युगपुरुषांना दुय्यम महत्त्व असतं. ही चिंतेची तशीच चिंतनाची गोष्ट आहे.
आसुरी वृत्तींवर दैवी वृत्तींचा विजय (रावणदहन), अंधारावर प्रकाशाचा विजय (नरकासुर) हे विसरलं जातं नि विकृत उपभोग, पराभूत मनोवृृत्ती अशा परस्परविरोधी भावनांचे बळ वाढते.

पांडवांचा वनवास
खरं तर वनवास-अज्ञातवासाची अट पूर्ण केल्यावर लगेचच त्यांचं त्यांच्या इंद्रप्रस्थ नगरीत स्वागत व्हायला हवं होतं. पण स्वागत सोडाच, त्यांच्यावर युद्ध लादलं गेलं, जे अर्थातच त्यांनी जिंकलं. पण अज्ञातवासाच्या वर्षाच्या अखेरीस जेव्हा सेना घेऊन कौरव विराटनगरीतील गायी पळवून नेऊ लागले तेव्हा विराटपुत्र उत्तराबरोबर जाऊन बृहन्नडेच्या रूपातील अर्जुनाने कौरवांचा पराभव करण्यापूर्वी रथ एका शमीवृक्षाकडे नेला. त्याच्यावरील शस्त्रे काढली. बाणाच्या टोकानं देवीची आकृती काढून भूमिका (भूमी) पूजन केलं. शस्त्रपूजा केली. नंतर सीमोल्लंघन करून कौरवांचा पराभव केला. तो दिवस सीमोल्लंघनाचा, भूमिपूजनाचा, शमीवृक्षांचा, शस्त्रपूजेचा म्हणजेच दसर्‍याचा होता. अशाप्रकारे विजयादशमी साजरी झाली.

गुरुदक्षिणा
ही अशीच एक दसर्‍याशी जोडलेली कथा. वरतंतू ऋषींचा एक गरीब शिष्य- कौत्स. गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेचा प्रसंग आला. त्याची एकूण परिस्थिती गुरुदेवांना माहीत होती म्हणून त्यांनी त्याला एक साधी समिधा हातात घेऊन आर्त भावानं त्यांना अर्पण करायला सांगितली. कौत्साला हा आपला अपमान वाटला. त्याचा अहंकार दुखावला गेला. तो हट्ट करू लागला, ‘गुरुदेव, आपण काहीही मागा, ती गुरुदक्षिणा मी आपल्याला देईन!’ यावर गुरुदेव म्हणाले, ‘मला १४ कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा दे.’
आश्रमातून निघून कौत्स अनेक राजे, धनवान व्यापारी, श्रीमंत जमीनदार यांच्याकडे गेला, पण एवढ्या सुवर्णमुद्रा कुणाकडेही नव्हत्या. कोणीतरी रघुराजाचं नाव सुचवलं. कौत्साची परिस्थिती लक्षात घेऊन रघुराजानं कुबेरावर (देवांचा कोशाध्यक्ष) स्वारी करण्याचं ठरवलं. हे कळताच कुबेरानं नगरीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. सत्त्वशील राजा रघू म्हणाला, ‘तू मोजून हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा ने. मी त्यांना स्पर्शही करणार नाही.’ कौत्सानंही मोजून १४ कोटी सुवर्णमुद्रा घेऊन त्या गुरुदेवांच्या चरणी धन्यभावनेनं अर्पण केल्या. तरीही शमीच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा जो वर्षाव कुबेरानं केला, त्या उरलेल्या मुद्रा लोकांनी लुटून नेल्या. तो दिवस दसर्‍याचा होता. तेव्हापासून शमीवृक्षाचा दसर्‍याशी संबंध जोडला गेला नि सोनं लुटण्याचा प्रघात पडला. काळाच्या ओघात आपट्याची हृदयासारखी पानं आपण लुटू लागलो. आता तेही जवळजवळ अस्तंगत होत चाललंय. कालाय तस्मै नमः!

शिलंगणाचं सोनं
इतिहासातही दसर्‍याशी संबंधित प्रसंग आहेत. ज्याच्या नावानं सुरू केलेला शालिवाहन शक आपण आजही वापरत आहोत, तो शालिवाहन लहानपणी तो नि त्याची आई ज्याच्या आश्रयाला आली होती त्या कुंभाराकडे मातीची खेळणी बनवत असे. खेळणी तरी कसली तर घोडे, हत्ती यांच्यावर स्वार झालेले सैनिक, रथात बसलेले लढवय्ये, पायी लढणारे शेकडो सैनिक. त्यानं जणू एक मातीची सेनाच तयार केली होती. अशी आख्यायिका आहे की या मातीच्या सैन्यात प्राण फुंकून जिवंत सैन्य उभं केलं नि आपल्या वडिलांचं गेलेलं राज्य पुन्हा मिळवलं. असाच प्रसंग शिवाजी महाराजांच्या वेळी नाही का घडला? एरव्ही शेती करणारे भोळेबावळे शेतकरी घरात पीक म्हणजे धान्य आल्यावर रिकामेच असायचे. त्यांना लढाईचं शिक्षण देऊन, लढवय्ये बनवून साध्या भीमथडी तट्टांच्या (लहान घोड्यांच्या) साहाय्यानं एकेक किल्ला नाही का जिंकत गेले शिवराय? या साध्याभोळ्या भूमिपुत्रांच्या मनात स्वराज्याचा अंगार फुलवून त्यांच्याकडून पराक्रम नाही का करून घेतला? त्यांचा मंत्र होता- ‘हर हर महादेव.’ तर ही शिवसेना दसर्‍यानंतर सीमोल्लंघन (शिलंगण) करून किल्ला जिंकून सोनं लुटायची. ते हे शिलंगणाचं सोनं हळूहळू हिंदवी स्वराज्य बनलं.

दसर्‍याचा मुख्य संदेश आहे विजयोत्सव नि सीमोल्लंघन. महिषासुरासारख्या भयंकर असुराला मारून विजयी झालेली दुर्गादेवी विजयाचा उत्सव साजरा करणार. पण त्याचवेळी विजयाचा उन्माद चढून डोकी फिरू नयेत म्हणून आपल्या सीमांचं, मर्यादांचं, दुर्गुणांचं, वाईट सवयीचं उल्लंघन करून वरच्या अवस्थेत पोचण्याचा संकल्प करायला हवा, ही नवरात्रींच्या पराक्रमापेक्षा नि दसर्‍याच्या विजयोत्सवापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. उल्लंघन करायचं म्हणजे मर्यादा पार करायच्या- चांगल्या अर्थानं. अमर्याद, स्वैर उपभोगांवर आधारित जीवन ही मर्यादा पार करून मर्यादाशील, सुसंस्कृत जीवन जगायचा निर्धार करायचा. हाही दसर्‍याचाच संदेश आहे.

एका कवितेत कवी केशवसुतांनी खंत व्यक्त केलीय- ‘साध्याला विसरून लोक करिती भक्ती कशी साधनी?’ उदा. पैसा हे साधनच साध्य मानल्यामुळे आज अब्जाधीश, कोट्यधीश, लक्षाधीश अनेक लोक बनताहेत, पण आनंद, समाधान, शांती हे मानवी जीवनाचं साध्य मात्र दुर्लक्षित राहिलंय. नशा आहे फक्त श्रीमंत, सत्ताधीश, बलवान बनण्याची. हे करण्यात बळी मात्र जातोय शांत, स्वस्थ जीवनाचा, मनःशांतीचा. यासाठी आपल्या पूर्वीच्या ऋषिमुनी शास्त्रकारांनी सोय करून ठेवलीय. दसर्‍यानंतर येते ती-
पाशांकुशा एकादशी
दसर्‍याला ‘दशहरा’ असंही म्हणतात. दश म्हणजे दहा नि हरा म्हणजे हरण करणारा, दूर करणारा. ‘दश’ शब्द दशेंद्रियांचा निर्देश करतो. डोळे-कान-नाक-जीभ (रसना)- त्वचा या पाच बाह्य संवेदना, अनुभव आत आणणारी ज्ञानेंद्रिये आहेत. शिवाय हात-पाय-वाणी (जिव्हा)- मलमूत्र विसर्जनाची इंद्रिये आणि पुनरुत्पादनाची इंद्रिये (जननेंद्रिय) अशी पाच कर्मप्रधान कर्मेंद्रिये. या दहाही इंद्रियांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी ‘अंकुश’ आणि तरीही भटकणार्‍या इंद्रियांना ओढून पुन्हा योग्य मार्गावर ठेवण्यासाठी ‘पाश’ यांंचं स्मरण करून देणारी, सीमोल्लंघनातही स्वैराचार टाळण्यासाठी जागं, दक्ष ठेवणारी पाशांकुशा एकादशी जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. आपण चिंतन करून जीवनपरिवर्तन घडवलं पाहिजे.

आपल्या सणांचा आशय (कंटेंट) साजरा करण्याची पद्धत आपल्याला ठाऊक असते. पण या सार्‍यांमागच्या ऋषिमुनींच्या चिंतनाकडे आपण लक्ष देत नाही. आजच्या उपभोगांवर आधारित चंगळवादी जीवनशैलीला कल्याणाचं वळण द्यायला हवं. ‘कोणतं वळण’ हे पूर्वीच सांगितलं गेलंय. हे वळण प्रभावीपणे ‘कसं’ द्यायचं याचा विचार मात्र आपणच केला पाहिजे.
पाशांकुशा एकादशीनंतर रात्री अधिकाधिक तेजाळत जातात. हिमासारखं शीतल व धवल चांदणं हे शरदऋतूचं वैशिष्ट्य आहे. सध्या रात्री निरभ्र आकाश दिसणं दुर्मीळ झालंय. त्यामुळे आकाशातील चंद्रप्रकाशाचं मुक्त, शुद्ध दर्शन दुर्लभ झालंय.

कोजागरी पौर्णिमा
ही वर्षातली सर्वात शुभसुंदर पौर्णिमा. हिला देवी मानलंय- तीही आरोग्याची. या पौर्णिमेच्या रात्री ही कोजागरी देवी हातात अमृताचा कुंभ घेऊन निघते. घराघरांवर जाऊन विचारते- ‘को जागर्ति? को जागर्ति?’ म्हणजे कोण जागं आहे. जे साहित्य-शास्त्र-कला-विनोद अशा आत्मविकासाच्या सान्निध्यात आहेत त्यांना आपल्याकडचं अमृत देऊन वर्षभर आरोग्यवान ठेवायचं हेच देवी कोजागरीचं उद्दिष्ट आहे. पत्ते, जुगार खेळत, दारू, उन्मादक पेयं, उत्तेजक द्रव्ये (ड्रग्ज) घेत जागणार्‍या मंडळीना साहजिकच आरोग्यामृत दिलं जात नाही.

कोजागरीची यमुनेकाठची रासक्रीडा, सांस्कृतिक दांडिया नृत्य या गोष्टी सुरूच असतात. पण खरं अमृत मिळतं विचार-भावना-कृती यांचं! आज हे सर्वाधिक गरजेचं आहे.
अशाप्रकारे आश्‍विन मासाचा पहिला पंधरवडा सण-समारंभसंपन्न आहे. दुसर्‍या पंधरवड्यात तर दीपावली वाट पाहतेय. या सर्वांना कोरोना- कोविडच्या सावटानं ग्रासलंय. ते क्रमाक्रमानं दूर होऊ लागलंय. हा आशावाद बाळगायला हरकत नाही.
असं म्हणतात की प्रत्येक कोपर्‍यावर (राऊंड कॉर्नर) संकटांचा एक लांडगा थांबलाय. पण त्याचवेळी दुसर्‍या बाजूला एक संधीची सिंहीणही थांबलीय. नव्हे सिंहवाहिनीही (शेरोवाली) थांबलीय. आपण सिंहवाहिनी शक्तीचा जयजयकार करत प्रकाशपर्वाकडे वाटचाल करायला काय हरकत आहे?

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

कर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा

ज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...

बांधकाम उद्योगाला चालना

शशांक मो. गुळगुळे बांधून तयार असलेली पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही...

‘आयएसएल’चा थरार

सुधाकर रामचंद्र नाईक अखिल भारतीय ङ्गुटबॉल महासंघाच्या सहयोगात २०१४ पासून ‘हिरो आयएसएल’ या प्रतियोगितेस प्रारंभ झालेला असून सातवे...

बालपण दे गा देवा!

मीना समुद्र ही लहानगी सदासतेज, चैतन्याने रसरसलेली, कुतूहलानं टुकूटुकू सगळं पाहणारी, बोबड्या चिमखड्या बोलांनी सर्वांना रिझवणारी, गळामिठी घालून...

शेती-संस्कृतीचा दीपोत्सव

डॉ. जयंती नायक दिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने...