दर बुधवारी सर्व मंत्र्यांचा जनतेशी संवाद

0
12

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; आठवड्याला एक मंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या जाणून घेणार अडीअडचणी

राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री दर बुधवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत पर्वरी येथील मंत्रालयात जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच, दर आठवड्याला एक मंत्री भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. मंत्री, आमदार आणि भाजप गाभा समितीच्या संयुक्त बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, भाजपचे आमदार आणि भाजप गाभा समिती यांची संयुक्त बैठक येथील एका हॉटेलमध्ये काल घेण्यात आली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हेही उपस्थित होते.

मंत्री, आमदार आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांनी दिली. त्यानुसार दर बुधवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत सर्व मंत्री मंत्रालयात जनतेशी संवाद साधतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दर मंगळवारी एक मंत्री पणजी येथील भाजप कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी मंत्र्यांकडून जाणून घेतल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

या संयुक्त बैठकीमध्ये ‘स्वच्छताही सेवा’ या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघ, पंचायत क्षेत्रात स्वच्छताही सेवा उपक्रमाचे आयोजन करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
भाजप मंत्री, आमदार आणि गाभा समितीच्या संयुक्त बैठकीत भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेवरही चर्चा करण्यात आली. भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

मंत्री, आमदारांना शिस्तपालनाची सूचना

एकमेकांविरुद्ध वक्तव्य करणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे. याशिवाय आपण सर्व मंत्री आणि आमदारांशी या विषयावर चर्चा करून एकमेकांविरुद्ध वक्तव्य करू नये. तसेच, शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.