थाप

0
28

क्षणचित्रं… प्राणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे त्या व्यक्तीसाठी किती सुखद असते! पण आजकाल साधी गोष्टही दुर्मीळ झालीय. कारण सारंच रिमोट कंट्रोल, व्हर्च्युअल, ऑनलाइन इ. इ. स्पर्श नि तोही प्रेमाचा, शांतवण्याचा, कौतुकाचा आज अनुभवायला मिळत नाही.

‘अमरत्वाच्या सारंगीवर होऊनिया तात। काळ होऊनी शाहिर गाइल तव गौरवगीत।’ तसेच ‘मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे। तुझ्या यशाचे पवाड गातिल काळाचे चौघडे।’
या अमर काव्यपंक्तीतले दोन शब्द महत्त्वाचे आहेत- शाहीर नि पवाड (पोवाडे). काही वर्षांपूर्वी दोन शाहिरांनी आसमंत दुमदुमवून सोडला होता. पहाडी आवाज, कोणता तरी संदेश लोकांना देण्याची तळमळ आणि ऐतिहासिक कार्य करणाऱ्या महामानवांच्या चरित्रगायनातून जनमानसात नवचेतना निर्माण करण्याचे व्रत असा त्रिवेणी संगम असायचा त्यांच्या सादरीकरणात. साथीला असायचा डफ नि त्याच्यावर पडणारी बुलंद थाप. ही थापच प्राण फुंकायची त्यांच्या जनसेवेच्या कार्यात! आधुनिक काळातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अहोरात्र लोकजागरण करून झालेला त्यांचा हजारो श्रोत्यांना खिळवून ठेवून मंत्रमुग्ध करणारा दमदार आवाज. जणू शीघ्रकाव्यासारखी उत्स्फूर्त रचना करत, जेव्हा ‘तुकड्या म्हणे’ (जसं तुका म्हणे) असा गजर करत प्रश्न विचारत ‘देव काय बाजारातला भाजीपाला हाय रे?’ त्यावेळी साथीला असे त्यांची खंजिरी नि तिच्यावर पडणारी तुकडोजींची आश्वासक थाप.

आणि ती हलगीवरली आनंदात मस्त थाप मारत शेतकरीबंधूंनी म्हटलेली गाणी- ‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रफुल्ल झाले’, ‘छन झुन खळ झुन ढुम्‌‍ ढुम्‌‍ पटढुम्‌‍ लेझिम चाले जोरात’- या समूह नृत्यगीतातील जोश जाणवायचा तो त्या हलगीवरच्या थापेतूनच.

सुंदर वाढलेले कुरळे केस मान हलवून पुन्हा पुन्हा मागे सारत तबल्यावरची बिजलीच्या गतीनं मारलेली झाकिर हुसेनची थाप तर एकाच वेळी असंख्य श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेते.
ही झाली चर्मवाद्यावर मारलेली मंतरलेली थाप!

अशीच थाप थरथरत्या हातानं क्षीण झालेल्या देहाच्या मातेनं समुद्राएवढ्या वात्सल्यानं आपल्या मुलाच्या पाठीवर मारली होती, जेव्हा तो उच्च शिक्षणासाठी आपल्या आईपासून दूर चालला होता. त्या थापेत असलेला मातेच्या ममतेचा आशीर्वाद आयुष्यातल्या आणीबाणीच्या प्रसंगात अखंड आधार देत राहिला समाजसुधारक, देशभक्त आगरकरांना. अशी थाप अतीव चैतन्यानं भरलेली नि भारलेली असते. त्याचवेळी ती थाप भावनांनी भारावलेलीही असते.

अशा थापेवरून दोन क्रियापदं तयार होतात. थापणं नि थापटणं. भाकरी थापणं ही तशी नित्याची बाब. पण रोजच्या कामासाठी निघण्यापूर्वी अनेक कामगारांच्या बायका जेव्हा भाकऱ्या थापतात, त्यावेळी असं वाटतं की अनेक तबल्याचे विद्यार्थी एकत्र रियाज करताहेत. त्या थापण्यात कमालीचा झिंग आणणारा ठेका असतो. अनुभव घेऊन पाहिला पाहिजे.

स्वतःची पदरमोड (खर्च) करून किंवा विनामोबदला बाहेरची किंवा दुसऱ्याची कामं करणं याच्यासाठी वाक्‌‍प्रचार आहे- ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.’ भाजण्यापूर्वी या भाकऱ्या थापाव्या लागतातच. बऱ्याचवेळा अशा कामाचा योग्य उपयोग होतोच असं नाही. उगीच उपद्व्याप नि मनस्ताप! पण एखाद्या निसर्गातील आपत्तीमुळे (पूर, भूकंप इ.) निर्वासितासारखं जीवन जगावं लागणाऱ्या आपल्याच बांधवांसाठी ज्यावेळी अशा भाकऱ्या थापल्या जातात त्यावेळी ती मानवतेची उदात्त सेवा असते.

आणि ती जनाबाईनं थापलेल्या शेण्यांची गोष्ट. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत जनी शेण्या थापायची. चमत्कार म्हणजे तिच्या शेण्या त्वरित खपत असत. तिच्या इतर सख्यांनी आपण थापलेल्या शेण्या जरी जनीच्या शेण्यात मिसळल्या तरी कसे कुणास ठाऊक, गिऱ्हाईकं बरोब्बर जनीच्या शेण्या अचूक निवडून घेत. जणू त्या शेण्यांभोवती विठूच्या अमृताहून गोड असलेल्या नामाचं अदृश्य वलय असायचं.

थापण्यात जशी थाप असते तशीच ती थापटण्यातही असते. गोरोबा कुंभाराचं लाकडी थापटणं मडकी कच्ची राहिलीयत की पक्की झालीयत हे पाहण्यासाठी वापरलं जायचं. अल्लड, चौकस मुक्ताईला हे कळल्यावर तिनं एक अजब कृती केली. जमलेल्या संतमंडळीतील प्रत्येकाचं डोकं (म्हणजे मडकंच की!) थापटून पाहायला सुरुवात केली. निवृत्तिनाथ, ज्ञानदेवाची डोकी थापटून पाहिल्यावर ती पक्की (म्हणजे परिपक्व) आहेत असं मुक्ताई म्हणाली. पण नामदेवाचं डोकं थापटताच ती उद्गारली, ‘हे मडकं मात्र अजूनही कच्चंच आहे.’ हे ऐकून नामदेवांना प्रचंड राग आलेला पाहून निवृत्तिनाथ हसून म्हणाले, ‘नामदेवा, या कालपरवाच्या मुलीनं तुझं डोकं थापटून फक्त ‘ते कच्चं आहे’ असं म्हटलं, तू मात्र रागावून ते सिद्ध केलंस.’ आहे किनई गंमत! नामदेवांना आपली चूक कळली नि ते अंतर्मुख झाले.

पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे त्या व्यक्तीसाठी किती सुखद असते! पण आजकाल साधी गोष्टही दुर्मीळ झालीय. कारण सारंच रिमोट कंट्रोल, व्हर्च्युअल, ऑनलाइन इ. इ. स्पर्श नि तोही प्रेमाचा, शांतवण्याचा, कौतुकाचा आज अनुभवायला मिळत नाही.
यासंदर्भात एक घरोघरी आढळणारा गमतीदार प्रसंग पहा- ‘मी जरा कामात आहे, तुम्ही आपल्या बाळाला थोपटून झोपवा.’ पिताश्री लगेच ते काम सुरू करतात. पण बाळ निजणं तर सोडाच पण जोरात रडायला लागतं. हे पाहून आई विचारते, ‘अहो, तुम्ही बाळाला थोपटताय की थापटताय? बघा कसा रडतोय तो? त्याला द्या माझ्याकडं.’ मग आई प्रेमानं थोपटून बाळाला झोपवते. जोडीला अंगाईसुद्धा म्हणते (किंवा मोबाईलवर लावते). तिकडे बाळ झोपण्यापूर्वी पिताश्री घोरायला लागलेले असतात हे सांगायला नकोच. असो.

आपल्या जीवनाचा भाग बनलेली आणखी एक थाप आहे. ती शब्दांनी मारायची असते. म्हणजे चक्क खोटं बोलायचं असतं. एकाला त्याचे सर्व मित्र म्हणत- ‘हा सारख्या थापा मारत असतो.’ यावर एकदा तो म्हणाला, ‘हो, मी थापाड्या आहे.’ त्याची हीही एक थापच नसेल कशावरून? बघूया विचार करून.